आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक विम्बल्डन विजेता( अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी तमाम क्रीडाविश्व 77 वर्षांनंतर ब्रिटनच्या टेनिस साम्राज्यावर उगवलेल्या नव्या विम्बल्डन विजेत्याला कुर्निसात करीत होते. एका स्कॉटिश-ब्रिटिश युवकाने अँडी मरेने 1936पासून इंग्लंडला हुलकावणी देत असलेल्या विम्बल्डन पुरुषांच्या विजेतेपदाच्या चषकाचे दर्शन घडवले. टेनिसपटूंचा आयुष्यातील ‘चार धाम’ म्हणजे अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या स्पर्धा. या चार स्पर्धा जिंकणारा टेनिसपटू त्याच्या कारकीर्दीच्या पूर्णत्वाला जातो. त्यातही बिम्बल्डन म्हणजे एक आगळीवेगळी ब्रिटिश- टेनिस परंपरा जपणारी स्पर्धा. 1936मध्ये फ्रेड पेरी या ब्रिटिश टेनिसपटूने ही स्पर्धा जिंकल्यानंतर विजेतेपदाच्या कपाला ब्रिटिश खेळाडूचा हात लागण्यासाठी चक्क 2013 साल उजाडले. जगातल्या सर्वोत्तम टेनिस खेळाच्या मेजवानीच्या आयोजनात मात्र दरम्यानच्या 77 वर्षांच्या काळात कधीच कसर झाली नाही. एक वैभवशाली शिस्तीची परंपरा कायम जपली गेली.

जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटूंना मानवंदना देताना त्यात ब्रिटिश चॅम्पियन नाही, याची खंत कधीच वाटली नाही. उलट स्ट्रॉबेरी आणि क्रीम्सच्या स्वादाबरोबर दर्जेदार टेनिसचा आस्वाद घेण्यात या ब्रिटिश क्रीडा रसिकांनी धन्यता मानली. ब्रिटिशांच्या या संयमी खिलाडू वृत्तीवर कळस चढवताना अँडी मरेने नोवाक योकोविकला सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. विजयानंतरचा उन्माद नव्हता, चित्कार नव्हते. नवा इतिहास आपण रचला आहे, हे सत्य स्वीकारायलादेखील त्याला वेळ लागला. विजेतेपदानंतर तो मान हलवत होता. तब्बल 77 वर्षांनंतर आलेल्या विम्बल्डन विजेतेपदावर तमाम ब्रिटिशांचाही विश्वास बसत नव्हता. वर्षापूर्वी याच विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर तो फेडररबरोबरची लढत हरला होता. कारकीर्दीतील तो कठोर क्षण होता. महिनाभरातच नव्या विश्वासाने तो पुन्हा विम्बल्डन कोर्टवर उतरला होता. या वेळी लढत होती ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी. ऑलिम्पिकच्या यजमानांना लंडन ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या पदकांपेक्षाही काळजी होती टेनिस सुवर्णपदकाची.

अँडीने ते जिंकले. एक नवा आत्मविश्वास त्याच्यात संचारला. त्या क्षणापासून तो बदलला. ब्रिटिशांमधील भीती, नकारात्मक भावना त्याने दूर केली. या वेळी त्याला नदाल, फेडरर हे आडवे आले नाहीत. मात्र, अन्य तरुण प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून तो योकोविकसमोर उभा राहिला. पहिला सेट सहज जिंकला असला तरी दुस-या सेटमध्ये तो 2-4 असा मागे पडला होता. त्या मोक्याच्या क्षणी योकोविकने आपली सर्व्हिस गमावली. त्यामुळे अँडीला दुस-या सेटमध्ये सावरण्याची संधी मिळाली. 7-5 असा सेट जिंकून अँडी नव्या इतिहासाकडे वाटचाल करीत होता. तिस-या सेटमध्ये 3 मॅचपॉइंटवरून अँडीने योकोविकला परतण्याची संधी दिली होती. तो निर्णायक गेम कसा खेळलो ते आठवतच नाही, अशी विजयानंतरची अँडीची प्रतिक्रिया होती. सातवा ब्रेक पॉइंट वाचवून अँडीने 20 मिनिटे रंगलेला तो गेम, सेट आणि मॅच जिंकली. सेंटर कोर्टवरील 15 हजार, बाहेरच्या ‘हिल’वर स्क्रीनवर सामना पाहणारे तेवढेच प्रेक्षक यांनी ब्रिटिशांच्या कडव्या शिस्तीची साखळी त्या क्षणी तोडली.

सारी बंधने झुगारून त्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद ब्रिटिशांनी लुटला. त्या वेळी प्रसिद्धिमाध्यमांच्या रोखाने अँडी पाहत होता. आपली ती प्रतिक्षिप्त क्रिया होती, असे तो बोलून गेला. फ्रेड पेरीनंतर ब्रिटनला पुन्हा एकदा पुरुष एकेरीचा विजेता मिळाला. एकेकाळी टेनिस या खेळात अग्रेसर असणा-या या देशाला विजेत्यांची वानवा का भासायला लागली, हा प्रश्न आहे. अमेरिका आणि युरोपनंतर विभक्त रशियाने या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि टेनिसमध्ये वर्चस्व असणा-या ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलिया व अन्य देशांच्या वर्चस्वाला ओहोटी लागायला लागली. तरीही विम्बल्डन स्पर्धांचे ब्रिटिशांचे आदरातिथ्य कमी झाले नाही. अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धांपेक्षा सर्वच दृष्टीने आगळीवेगळी अशी ही स्पर्धा. हिरवळीच्या कोर्टपासून पुरस्कार प्रदान समारंभापर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली ही स्पर्धा. गेली कित्येक वर्षे विजेत्यांचे बदललेले चेहरे आपण पाहतो.

पुरस्कार वितरणासाठी मात्र ब्रिटनची राणी येते, प्रिन्स चार्ल्स येतो. या स्पर्धेच्या कोर्टवरील हिरवळीवर अनेक कथा लिहिल्या गेल्या. कुणाला हवीहवीशी वाटणारी हिरवळ, कुणाच्या लेखी चरण्यासाठी वाढवण्यात आलेले गवत होते. यंदा तर गवताची पाती किंचित वाढल्याने घसरून पडणा-या खेळाडूंचे प्रमाणही वाढले होते. या गवतावर बूट वापरताना, बुटाच्या तळाला लोखंडी खिळे नसावेत, ही अटही काहींना जाचक वाटली. अशा अनेक जाचक गोष्टी विम्बल्डनच्या पठारावर खपवल्या गेल्या. टेनिस या खेळाची दर्जेदार मेजवानी, सुटाबुटातील प्रेक्षक, स्ट्रॉबेरी क्रीमची लज्जत आणि सोबतीला लहरी ब्रिटिश हवामान यांनी या स्पर्धेला वेगळेपणा प्राप्त करून दिला. दर्जेदार टेनिस पाहताना प्रत्येक विजेत्यामधील मानसिक कणखरताही या स्पर्धेने अनुभवली.

मानसिक सक्षमतेचे कणखर बांधही अचानक कसे तुटतात आणि खेळाडू ओक्साबोक्शी रडतानाचे दृश्य पाहिले. महिला एकेरी स्पर्धा जिंकणा-या मॅरिऑन बार्टोलीने सहा वर्षांपूर्वी अनुभवलेले दु:ख तिच्या प्रतिस्पर्ध्याच्या, सबीनच्या रूपात तिने पाहिले. 2007मध्ये 22 वर्षीय बार्टोलीला व्हीनस विल्यम्सने अंतिम फेरीत चिरडून टाकले, तेव्हा ती अश्रू ढाळत उभी होती. या वेळी तोच अनुभव तिच्या प्रतिस्पर्ध्याला आला. बार्टोलीने या वेळी बघ्याची भूमिका घेतली नाही. तिने सबीनला जवळ घेतले. सांत्वन केले. हा अंतिम सामना म्हणजे सर्व काही नाही. इतर सामन्यांसारखाच एक सामना होता, तेव्हा फारसे दु:ख करू नकोस. सहा वर्षांपूर्वी तुझ्या जागी मीही अशीच रडत उभी होते, असे बार्टोली सबीनला म्हणाली. दोन प्रतिस्पर्ध्यांमधील व्यावसायिकता आपण पाहतोच; परंतु त्यापलीकडे लपलेली मानवी संवेदनाही आपण या स्पर्धेत अनुभवली. प्रत्येक खेळाडू कोर्टवर उतरताना आपल्यासोबत आपला गर्विष्ठपणा, विजिगीषू वृत्तीही घेऊन येतो. टेनिसमधील कौशल्याला त्यांची जोड लाभते आणि विजेत्यांबाबतच्या चर्चाही रंगायला लागतात. वैयक्तिक आयुष्यातील घटना, चढउतार खेळावर भलेबुरे परिणाम करणारे ठरतात. त्यातून काही जण सावरतात, तर काही उद््ध्वस्त होतात. विम्बल्डन विजेत्यांच्या अशा अनेक कहाण्या इतिहास बनून राहिल्या आहेत. 13 मार्च 1996 हा दिवस आपल्या नव्या विम्बल्डन विजेत्याच्या हृदयावर खोलवर जखम देऊन गेला आहे. डनब्लेन प्रायमरी स्कूलचा अँडी विद्यार्थी.

1996ला थॉमस हॅमिल्टनने या शाळेच्या 16 विद्यार्थी व शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा संदर्भ जरी निघाला तरी अँडी भावुक होतो. ते हत्याकांड सुरू असताना अँडी आपल्या वर्गातून जिमकडे निघाला होता. त्या घटनेनंतर आपल्या मुलांना जिवंत पाहण्यासाठी आलेल्या मातांमध्ये अँडीची आई ज्युडीही होती. हत्याकांड झालेल्या जिमकडे पाहण्याचेदेखील धाडस अँडी करीत नाही. कारण हत्याकांडास जबाबदार असलेला हॅमिल्टन अँडीसोबत कधी कधी प्रवास करायचा. त्या भूतकाळाभोवती विस्मृतीचे कठीण कवच अँडीला लावावे लागले. कदाचित त्यामुळेच, ब्रिटनला 77 वर्षांनंतर विम्बल्डन जिंकून देण्याचा मानसिक कणखरपणा असणारा युवा खेळाडू मिळाला असावा.