आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होर्डिंग्ज, कलाम अन् अखेर कमाई...!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दहा दिवसांपासून शहरभर भाऊ, दादा, साहेब यांच्या मोठमोठ्या होर्डिंग्जचीच चलती होती. त्यामुळे 52 दरवाजांचे शहर असलेल्या औरंगाबादची ओळख होर्डिंग्जचे शहर म्हणूनच होते की काय, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक त्याकडे बघून न बघितल्यासारखे करून पुढे जात होता. मात्र, शहरास विद्रूप करणारे व वाहतुकीस अडथळा ठरणारे हे होर्डिंग्ज कुणी लावले, का लावले, कधी लावले याबद्दल कुणीही काहीही बोलण्यास तयार नव्हते.

महापालिकेला या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचा अधिकार असतानाही महापालिकेने कारवाई न करता हात वर केले. त्यामुळे दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त संजयकुमार यांनीच अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारला अन् भाऊ, दादा, साहेब असे होर्डिंग्ज झळकवणार्‍यांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांअंतर्गत गुन्हे दाखल केले, तरीही सुस्त महापालिका प्रशासन जागे झाले नाही. शेवटी पोलिस आयुक्तांनी न्यायालयीन कारवाईची धमकी दिल्यानंतर मनपा प्रशासन जागे झाले अन् शहरातील प्रमुख चौकांसह गल्ली-बोळात लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पुढे आले.

शहरात कोणत्याही पक्षाचा नेता येणार असेल, एखद्या नेत्याचा वाढदिवस असेल, निवड, नियुक्ती झाली असेल तर शहरभर होर्डिंग्ज झळकवले जातात. होर्डिंग्जच्या माध्यमातून कमीत कमी पैशात जास्तीत जास्त प्रसिद्धी असे एक समीकरणच तयार झाले आहे. त्यातही ज्या नेत्याच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज लावले जाते त्या नेत्याच्या बरोबरीने आपलीही छबी झळकावी, यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. होर्डिंग्जच्या माध्यमातून आपल्या मागे किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत, हे दाखवून दहशत व दबाव निर्माण करण्याचा धोकाही आहे. भविष्यात एखादी निवडणूक लढवायची असेल तर लोकांमध्ये आतापासूनच आपली छबी जावी, एक चांगली प्रतीमा निर्माण व्हावी, यासाठीही होर्डिंग्ज लावले जात आहेत. या प्रकाराला नेतेही आडकाठी घालण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. उलट अप्रत्यक्षपणे होर्डिंग्ज लावणार्‍यांना त्यांचा पाठिंबाच असल्याचे दिसते. त्यामुळे उच्च न्यायालयाने ज्या नेत्याचा होर्डिंग्जवर फोटो असेल, त्या नेत्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता तरी नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यापासून धडा घेऊन शहर वाहतुकीस अडथळा ठरणार नाहीत, शहर विद्रुप होणार नाही, असे होर्डिंग्ज लावू नयेत.

अनधिकृत होर्डिंग्ज ही औरंगाबाद शहराचीच समस्या आहे, असे नाही तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये ही समस्या आहे. त्यामुळे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयालाच हस्तक्षेप करण्याची वेळ आली. मुंबई, ठाण्यासह सर्वच शहरांतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

भाऊ, दादा, साहेब हे सर्वच कुठल्या ना कुठल्या कम्युनिटी अथवा पक्ष-संघटनेशी संबंधित होते. त्यामुळे त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ शहरभर होर्डिंग्ज लावले होते. एवढेच नव्हे तर अगदी गल्ली-बोळातही होर्डिंग्ज लावण्यता आले. दरम्यानच्या काळात मिसाइलमॅन म्हणून ओळख असलेले माजी राष्ट्रपती व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम हेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभासाठी शहरात येऊन गेले. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी कुठल्याही व्यक्ती, पक्ष अथवा संघटनेने एकही बॅनर अथवा होर्डिंग शहरात लावले नाही, हे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या ‘अखेर कमाई’ या कवितेची आठवण झाली.

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे
एका चौथर्‍यावर बसले आणि टिपं गाळू लागले.
जोतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरलाआणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेर्‍यातील भिंती !

अशीच अवस्था अब्दुल कलामांचीही झाली आहे. त्यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, बोलण्यासाठी भलेही विद्यापीठात सर्वच समुदायांच्या लोकांची गर्दी झाली असेल. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी शहरात एकही होर्डिंग, पोस्टर, बॅनर लावलेले निदर्शनास आले नाही. त्यामुळे भाऊ, दादा, साहेब यांना त्या-त्या पक्ष, संघटना अथवा समुदायाने वाटून घेतले असले तरी अब्दुल कलामांसाठी कुणीही पुढे आले नाही...!