आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिक, संवेदनशील व्यक्तिमत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैला लोहिया यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्वभावगुणांविषयी त्यांच्या मैत्रीण प्रा. कुंदबाला खांडेकर यांनी केलेले हे विवेचन...


माझे वडील निवृत्त झाले आणि धुळ्याला राहण्याचे त्यांनी ठरवले. मी त्या वेळी अकरावीला (मॅट्रिक) होते, त्या वर्गात वडिलांनी कल्याणहून धुळ्याला बोलावून एका शाळेत घातले. पहिल्या दिवशी कमलाबाई कन्या शाळेत प्रवेश घेतला होता, (ही शाळा अभ्यासात उत्तम होती) तेथे वर्गात जागा शोधत होते. इतक्यात वर्गातील तिस-या बाकावरून एक गोरीपान कुरळ्या केसांची मुलगी मला हाताने खूण करून, आपल्या बाकावर शेजारी बसण्यासाठी बोलावत होती. मी तेथे जाऊन बसले. ती मला म्हणाली, तुझं नाव काय गं? ‘कुंदबाला जोशी’ ‘वा! तुझं नाव जरा वेगळं पण छान आहे हं!’ पहिल्याच दिवशी इतका प्रेमळ अभिप्राय मिळाला आणि आमची मैत्री गुळपाकासारखी घट्ट झाली. हीच माझी मैत्रीण शैला परांजपे. म्हणजे लग्नानंतरची शैला लोहिया.


माझी मैत्रीण 24 जुलैला माझ्या काळजात दु:ख भरून गेली. मॅट्रिक ते ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही बरोबरच शिकलो. आमच्या सात आठवणीच्या मैत्रीचा गु्रप हुशार आणि जरा हटकेच होता. शैलाच्या मनात रोज नवनव्या कल्पनाचा फुलोरा फु लायचा! आठवड्यातून एक दिवस आम्ही शाळा सुटल्यावर एक तास कुठेही मोकळ्या मैदानावर तासभर बसत होतो. तेथे कविता करत होतो. विषय सुचवायला शैलाचा पुढाकार होता. तर काव्यरचनेतील सुंदर शब्दांची पखरण सगळ्यांच्या सहकार्याने व्हायची. शैला आणि मी जरा जास्तच भावूक होतो. कवितेतल्या भावनांनी डोळ्यातील अश्रूसकट चिंब होऊन जात होतो.


प्रामाणिकपणा, हा शैलाच्या जीवनातला अविभाज्य भाग होता. जीव ओतून कोणालाही मदत करायची, हे ठरलेलेच असायचे. आमची मॅट्रिकची परीक्षा दोन दिवसावर आली तेव्हा मुख्याध्यापकांनी आमच्या वर्गासाठी एक सभा घेतली. त्या वेळी आम्हाला निक्षून सांगितले की, चांगले अक्षर काढा, सोपे वाटणारे प्रश्न अगोदर सोडवा, प्रश्नांचे क्रमांक योग्य लिहा आणि मुख्य म्हणजे, कोणाच्या पेपरातील बघून लिहू नका. कॉपी करू नका. आपल्या शाळेचा चांगला नावलौकिक आहे. त्याला बट्टा लागू देऊ नका. शाळा हीसुद्धा शहाणे करणारी दुसरी आईच आहे! सरांच्या तळमळीच्या सूचनांमुळे आम्ही भारावलो होतो. परीक्षा चालू झाली आणि तिस-या दिवशी शैलाच्या समोरचा एक मुलगा पुस्तक काढून त्यातील उत्तरे कॉपी करत होता. शैलाच्या खरेपणाच्या वृत्तीने उसळी घेतली. ती म्हणाली, सर हा मुलगा कॉपी करतोय. त्या मुलाची कॉपी पकडली गेली. तो परीक्षेला बसू शकला नाही. त्याने शैलाला धमकावण्याचा प्रयत्न केला, पण ‘लबाडीने वागायचे नाही, कोणाला वागू द्यायचे नाही’ हा तिचा बाणा होता. त्यामुळे तिने मनावर फारसे घेतले नाही. वयाच्या 15-16 वर्षांपासूनच गैर वागायचे नाही हे जीवनाचे सूत्रच तिला सतत मोठेपणाकडे घेऊन गेले.


लग्नानंतर शैला शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्यपदापर्यंत पोहोचली. कविता लिहिता-लिहिता तिने कथा आणि वैचारिक लेख लिहिले. मुख्य म्हणजे घरातील लेकुरवाळी, विद्येच्या जगातील प्राचार्या सीमित क्षेत्रातून बाहेर पडून निराधार, उपेक्षित स्त्रियांसाठी सावली बनली. मनस्विनी आश्रमात या महिलांच्या जीवनाला तिने दिशा दिली. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला. तर काहींचे संसार मार्गी लावले. डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या सामाजिक कार्याला नेहमी सहकार्य करता-करता कितीतरी स्त्रियांच्या आयुष्याला नवे जीवन देऊन जगण्याचा मार्ग दाखवला.
नोकरीच्या बदलीमुळे आम्ही औरंगाबादला आलो आणि मधल्या काळात माझी आणि शैलाची भेट तुरळकपणे व्हायला लागली होती. ती पुन्हा लवकर लवकर होऊ लागली. मी औरंगाबादला महिला कॉलेजमध्ये होते आणि शैला अंबाजोगाईला कॉलेजमध्ये होती. एकदा विद्यापीठाने मराठी शुद्धलेखनासाठी शिबिराचे आयोजन केले होते. सर्वांनाच सोयीचे जावे म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये हे शिबिर घेण्यात आले. शैला आणि मी तीन दिवस एक मेकींच्या सहवासात राहिल्याने आनंदित होतो. तिस-या दिवशी तिच्या हातात एक भलीमोठी पिशवी दिसली. मी सहज विचारले, इतकं काय करून आणलेले आहेस? ‘माझ्या मनस्विनीत गरीब बायका आहेत. त्यांना हळद, तिखटांची पूड करण्यास मी शिकवलेले आहे. चारदोन पैसे त्या विक्रीतून कमावत आहेत.’ मी म्हटले, इकडे आण, त्यातील दोन पुडे मी विकत घेते. त्याचे तिला पैसेही दिले. हे सारं पाहून आठवले की वाटतं... शैलाला गरीब स्त्रियांचा किती कळवळा आहे, त्यांचं भलं व्हावे म्हणून प्राध्यापक असूनही तिने पुडे विकण्याचे काम स्वीकारले. त्यात कमीपणा मानला नाही.


कविता लेखन वैचारिक लेखन, अभ्यास आणि नृत्य सगळं करता करता, निराधारांचा आधार बनलेली शैला माझी मैत्रीण... आता पुढे डोळ्यास दिसणार नाही. तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, समाजसेवेचे व्रत सगळं काही माझ्या मनात कायम राहील.