Home »Editorial »Columns» Hope Kusmagraj Not Forgeting

कुसुमाग्रजांचा विसर न व्हावा...

मनोज दलीचंद जांगडा | Feb 15, 2013, 02:00 AM IST

  • कुसुमाग्रजांचा विसर न व्हावा...


जब्बार पटेल,
अध्यक्ष, कुसुमाग्रज प्रतिष्ठान,

सप्रेम नमस्कार,
कुसुमाग्रजांनी नाशिकमध्ये सुरू केलेल्या जनस्थान पुरस्काराची आपण मुंबईतून घोषणा केली व त्यामुळे काही दिवसांनंतर हा पुरस्कारसुद्धा मुंबईतून दिला जाणार नाही ना, अशी शंकेची पाल आम्हा नाशिककरांच्या मनात चुकचुकली.त्यामुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून या शंकानिरसनाची जबाबदारी आपणावरच येते. मुळातच हा पुरस्कार नाशिककरांचा पुरस्कार असल्याने त्याची घोषणाही नाशकातूनच व्हावी,अशी आम्हा नाशिककरांची रास्त अपेक्षा आहे.
कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर 1991मध्ये त्या पैशातून त्यांनीच या पुरस्काराची सुरुवात केली. प्रथम पुरस्कार विजय तेंडुलकर यांना व गेल्या वेळी दिलेला पुरस्कार महेश एलकुंचवार यांना दिला गेला.

या सर्व पुरस्कार सोहळ्यांचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक पुरस्काराच्या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आठवण ठेवतात व आठवण करून देतात की कुसुमाग्रजांनी जी आचारसंहिता बनवून दिली आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व गोष्टी करतो व त्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच पुरस्कारार्थींची निवड होते. हे आजपर्यंत दिलेल्या पुरस्कारार्थींच्या यादीवरून सिद्ध होतेच आहे. मार्च 2012च्या गोदागौरव पुरस्कार निवडीमध्येही हे तत्त्व तंतोतंत पाळले गेले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवड ही अतिशय योग्य होती. मात्र, आयोजनात आपण लोकांना पूर्णत: गृहीत धरले आणि कुसुमाग्रजांनी आखून दिलेल्या महत्त्वाच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला. ते तत्त्व म्हणजे या कार्यक्रमाला नाशिकचा महापौर सोडून दुस-या कोणत्याही राजकारणी व्यक्तीला व्यासपीठावर बोलावले जाऊ नये.

स्वत: कुसुमाग्रज मागील खुर्चीवर बसत असत. दोन मोठ्या राजकारण्यांना मागील गोदागौरव पुरस्काराच्या कार्यक्रमात बोलावल्यामुळे पुरस्काराची मूळ संकल्पना कुठेतरी हरवल्यासारखी झाली व त्यामुळे पुरस्कारार्थी पूर्णत: झाकोळले गेले. कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे झाले तर हा पुरस्कार नव्हे, हा तर मान्यवरांच्या कृतज्ञतेचा नमस्कार आहे. त्यामुळे ज्यांना आपण कृतज्ञतेचा नमस्कार करतो, ते या पुरस्काराच्या रूपाने कुसुमाग्रजांचा आशीर्वादच मिळत आहे, या भावनेने भारावलेले असतात. त्यामुळे त्यांना नाशिककरांबरोबर संवाद साधण्याची खूप इच्छा असते व नाशिककरांनाही त्यांना ऐकण्याची मनापासून इच्छा असते, म्हणून ते अलोट गर्दी करतात. मात्र, शरद पवारांनी जवळपास 40 मिनिटांहून अधिक आणि छगन भुजबळांनी 30 मिनिटांहून अधिक वेळ घेतल्यामुळे पुरस्कारार्थींना अत्यंत थोडा वेळ मिळाला; किंबहुना दिला गेला. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला.

राजकारण्यांच्या मदतीशिवाय काही शक्य नाही व काही पैशांची मदत होत असेल तर त्यासाठी आपली कुचंबणा करून घेण्याची गरजच नाही, कारण ते त्यांचे कर्तव्यच आहे व कोणीही राजकारणी आपल्या घरातून पैसे देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मदतीने बुजून जाण्याची अजिबात गरज नाही. माझे व राजकारण्यांचे काही वाकडे आहे, असे अजिबात नाही. मात्र, काही विशिष्ट कार्यक्रमांना त्यांना बोलावून त्याचा विचका करणे किती योग्य आहे याचा विचार व्हावा, म्हणून हा पत्रप्रपंच.

पुढील मुद्दा आपल्या निदर्शनास आणून द्यावासा वाटतो, तो म्हणजे, गोदागौरव पुरस्कार हा सहा विभागांतील सहा मान्यवरांना दिला जातो व आतापर्यंत त्यांचा परिचय करून देण्याची जी पद्धत आपण अवलंबत होता, ती अतिशय योग्य होती. म्हणजेच, शिल्पकाराची ओळख स्थानिक शिल्पकार करून देत. यामुळे दोन कलाकार एकत्र येत. तसेच त्या ओळख करून देणा-या कलाकाराला त्या कलेची जाण असल्याने तो ती ओळख करून देताना त्यात जीव ओतत असे. मात्र, गेल्या वेळी हा पायंडा पूर्णपणे बदलून सर्व पुरस्कारार्थींची ओळख कवी किशोर पाठक यांनी करून दिल्यामुळे तो एक सोपस्कार झाला व सहाही मान्यवरांची ओळख अत्यंत एकसुरी झाली. किंबहुना असे निदर्शनास आले की, पुरस्कारार्थीपेक्षा अधिक वेळ पाठकांनाच दिला गेला. शिवाय राजकारण्यांनी घेतलेला वेळ, त्यामुळे पुरस्कारार्थींनी बोलावे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. नाशिकचे श्रोते, वाचक आणि नागरिकांचे आदरणीय कुसुमाग्रज हे आशास्थान आहेत. त्यांनी आखून दिलेली तत्त्वे, पुरस्कार सोहळ्याबद्दलची आचारसंहिता ही आमच्याच काय तर साहित्यरसिक आणि कुसुमाग्रजप्रेमींच्या मनामनात असल्याने हा पत्रप्रपंच केला. तशी कार्यवाही झाल्यास पुन्हा नव्या जोमाने, आनंदाने यंदाचा 27 फेब्रुवारी 2013चा जनस्थान पुरस्कार सोहळा अनुभवता येईल. कारण ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा पुरस्कार देऊन आपण आदरणीय कुसुमाग्रजांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याचे जाणवले. आता केवळ कुसुमाग्रजांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक आचारसंहितेचे पालन व्हावे, असे आम्हा नाशिककरांना; श्रोत्यांना वाटते.


आपला,
मनोज दलीचंद जांगडा (कुसुमाग्रजप्रेमी, नाशिककर)

Next Article

Recommended