आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संवेदनांचा परीघ केवढा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळीच्या तीन दिवस आधी सोसायटीच्या बोर्डावर होलिकोत्सवाची नोटीस लागली. त्या नोटिसीत भेगाळलेल्या शेतात बसलेल्या दीनवाण्या दुष्काळग्रस्त शेतक-याचे आणि कोरड्याठाक विहिरीभोवती दोन थेंब पाण्यासाठी गोळा झालेल्या बायाबापड्यांचे फोटो आणि खाली महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात होरपळणा-यांप्रति सहवेदना प्रकट करण्यासाठी, ‘यंदा आपण साधेपणाने, म्हणजेच पाण्याची अवाजवी नासाडी न करता, सोसायटीच्या एकाच भागात होळी खेळणार आहोत’ असे विनंतीवजा आर्जव. ते बघून शहरी, सुखवस्तूंमध्ये अजूनही माणुसकीच्या जाणिवा शिल्लक आहेत, अशी समाधान देणारी भावना मनात निर्माण होते; पण क्षणभरच. प्रत्यक्ष रंगपंचमीच्या दिवशी सोसायटीच्या एका कोप-यात मोठा मांडव उभारलेला, सोसायटीतल्या मध्यमवयीन बाया-पुरुष-उत्साहाने फसफसणारे तरणेताठे त्यात एकवटलेले.


सोबत डीजेचा कानठळी धमाका, पण एवढ्यानेच रंगपंचमी साजरी होणार नसते. सोसायटीने दुष्काळग्रस्त गावातल्या किमान शंभर घरांची तहान भागवू शकतील, असे एक नव्हे तर तीन पाण्याचे टँकर आॅर्डर केलेले असतात. एक संपला की दुसरा आणि दुसरा संपला की तिसरा. या टँकरद्वारे आणलेल्या पाण्याचा उपस्थितांवर दीड-दोन तास मारा होत राहतो. नेहमीच्या उत्साहात-नेहमीच्याच जोशात रंगपंचमी साजरी होत राहते. मग यात संवेदनशीलता कसली, सोसायटीने केवळ एकाच भागात रंगपंचमी खेळली ही? की पालिकेच्या पाण्याऐवजी स्वतंत्र पैसे देऊन टँकरचे पाणी उधळलेही?


तिकडे अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागात यापेक्षा वरताण परिस्थिती निर्माण झालेली असते. धिंगाणा असह्य होतो म्हणून शेजारील सोसायटीत राहणारे अभिनेते-कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर संबंधितांना आटोपते घेण्याची विनंती करण्यास जातात, तेव्हा बेधुंद होत नाचणारे लोक अमरापूरकरांनाच धक्काबुक्की-शिवीगाळ करतात. ज्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली, ते वलयप्राप्त अमरापूरकर असतात, म्हणून या प्रकरणाला वाचा फुटते, पण ज्या सोसायटीत ही घटना घडलेली असते, तिथेही कदाचित दुष्काळात होरपळणा-यांविषयी संवेदना प्रकट करणारी नोटीस लागलेली असू शकते. डिसेंबर 2012 च्या मध्यावर घडलेल्या दुर्दैवी दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर अशाच प्रकारे सहवेदना प्रकट करणारी नोटीस मुंबई-पुण्यातल्या असंख्य सोसायट्यांमध्ये लागली होती, नाही असे नाही; पण प्रत्यक्षात मात्र 31 डिसेंबरची रात्र बहुसंख्यांनी सामिष आहार आणि मर्यादित मद्याचा आस्वाद घेत साजरी केली होतीच की. त्याला तरी संवेदनशीलता कसे म्हणावे? दिल्लीत झालेल्या उच्चवर्णीय बलात्कारपीडितेसाठी सबंध देश निषेधासाठी रस्त्यावर उतरतो, पण असाच अत्याचार दलित-आदिवासी महिलांवर झाला तर किती जण निषेधाचे सूर आळवतात? संवेदनशीलता प्रकट करताना हा भेदभाव कसा? म्हणजेच समूहाच्या संवेदनांचा स्वत:चा असा परीघ असतो का? असेल तर तो केवढा? या परिघाचा आकार कोण निश्चित करते? विकार-वासनांनी लडबडलेली मानवी वृत्ती, मानवी व्यवहारांच्या गुंत्यातून आकारास येणारी परिस्थिती की ‘मी’पणाची अखंड जाणीव? त्या परिघातही असंवेदनेला जन्माला घालणारे कप्पे असतात का? प्रगती आणि समृद्धीच्या जोडीने संवेदनांचा हा परीघ विस्तारत जातो की आकुंचन पावतो? असे असंख्य प्रश्न संवेदनशीलतेचे वठवलेले ढोंग अनुभवताना एखाद्याला पडत जातात. मुळात सर्वसामान्य माणसाच्या इच्छा-आकांक्षा मर्यादित असतात, तोवर तो समाज आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत नसला तरीही विशिष्ट प्रकारचे मानसिक-भावनिक स्थैर्य अनुभवत असतो. एकसमान पातळीवरील अर्थस्थितीमुळे अस्तित्वासाठी तो एकमेकांना धरूनही असतो. म्हणूनही हा समाज अनेक पातळ्यांवर स्वमग्न असला तरीही दृष्टी आणि नात्यांपलीकडच्या जगाबद्दल सीमातीत अशी आत्मीयता, करुणा जपून असतो, परंतु इच्छा-आकांक्षांना बदलती अर्थव्यवस्था धग देते, तेव्हा अकस्मात आलेल्या समृद्धीचे सुख अनुभवणारा हाच समाज ‘मी’पणात गुरफटत जावून एकमेकांपासून तुटत जातो.


आर्थिक समृद्धी न पेलवल्यामुळेच कदाचित आत्मीयता आणि करुणेच्या जागी आत्ममग्नता मूळ धरू लागते. एका क्षणी हा आत्ममग्न समाज नात्यापलीकडच्या जगाची दखल घ्यायचे नाकारू लागतो आणि इथेच संवेदनांचा परीघही त्यांच्यापुरता निश्चित झालेला असतो. क्वचितप्रसंगी वैषयिक प्रलोभन वा सामूहिक दबावापोटी तो नात्यापलीकडच्या वेदनेला प्रतिसाद देण्यासाठी सरसावतो, पण त्यात प्रामाणिकपणापेक्षा ढोंगच अधिक असते. कालांतराने हे ढोंग त्याच्यामध्ये असे काही मुरत जाते की, बलात्कारपीडितेच्या स्मरणार्थ आयोजित कँडलमार्च संपवून थर्टी फर्स्ट साजरी करण्यात त्याला काही वावगे वाटत नाही. अखेर आत्ममग्नतेपायी माणूसपणालाच मर्यादा आलेल्या असतात. ज्ञानेश्वर-तुकारामांपासून विनोबा-जे. कृष्णमूर्तीपर्यंतच्या महानुभवांनी ‘मी’पणाच्या जाणिवांतून जन्माला येणा-या मर्यादा भेदण्याचे मार्ग वारंवार सुचवूनही संवेदनांचा परीघ काही केल्या विस्तारलेला नसतो...