आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक झुंज वादळाशी! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादळ, चक्रीवादळ, झंझावात या गोष्टींचे लोकांना एकीकडे विलक्षण भय आणि सुप्त आकर्षणही असते. त्यामुळेच की काय, वादळी व्यक्तिमत्त्व, झंझावाती दौरे, वादळातील दीपस्तंभ, एक झुंज वा-याशी, वादळवाट असे अनेक शब्दप्रयोग आपण हमखास करत असतो. दुस-या बाजूला वादळी व्यक्तिमत्त्वांपुढे लोक थेट आदराने बघतात किंवा आंधळेपणाने त्यांचे अनुयायी होतात. या भाषिक शब्दप्रयोगांचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू. मुळात वादळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम नसेल तर नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्याने जीवित व वित्तहानीचे प्रमाण कित्येक पटींनी वाढू शकते. या निष्काळजीपणाचा तडाखा भूतकाळात बसलेला भारत आता मात्र त्याबाबत शहाणा झाला आहे. याचे प्रत्यंतर ताशी सुमारे २०० किमी इतक्या वेगाने घोंगावत रविवारी हुदहुद या चक्रीवादळाने आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टी भागाला जो तडाखा दिला त्या वेळी दिसून आले. या चक्रीवादळामुळे दोन्ही राज्यांमध्ये काही जणांचा बळी गेला आहे.
हुदहुदच्या हाहाकारामुळे दोन्ही राज्यांत अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. रस्त्यांवरील वाहने, तसेच रेल्वेची वाहतूकही काही काळ बंद पडली. ओडिशा, आंध्र प्रदेश, गुजरातला आजवर थडकलेल्या चक्रीवादळांचा इतिहास बघितला तर या राज्यांना ख-या अर्थाने ‘वादळे अंगावर घेणारी राज्ये’ असेच म्हणावे लागेल.
हिंदी महासागर हे चक्रीवादळांचे आगारच आहे. आजवर झालेल्या ३५ तुफानी चक्रीवादळांपैकी २७ चक्रीवादळांनी बंगालच्या उपसागरावरून घोंगावत भारत किंवा बांगलादेशच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. १९७१ साली भारतात व १९९१ साली बांगलदेशमध्ये चक्रीवादळाने जो हाहाकार माजवला होता, त्याच्यापेक्षा विध्वंसक असे ०५ बी किंवा पॅराडिप नावाचे चक्रीवादळ २८ ऑक्टोबर १९९९ रोजी ओडिशाच्या किना-यावर थडकले होते. त्याच्या तडाख्याने ओडिशातील १० हजारांच्या वर नागरिक मृत्युमुखी पडले होते व वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यानंतर २०१३ साली फेलिन नावाचे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर आले. त्यानंतर तितक्याच तीव्रतेचे वादळ हुदहुदच्या रूपाने येऊन थडकले होते.
नैसर्गिक आपत्तींचा उद्भव झाल्यास त्यामुळे होणा-या जीवित व वित्तहानीचे प्रमाण सक्षम आपत्ती निवारण व व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून कमी करता येऊ शकते, याची जाणीव झाल्याने त्यासंदर्भात विचार करण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट १९९९ मध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमली. त्यानंतर ०५ बी वादळाने ओडिशाला दिलेल्या तीव्र तडाख्याने केंद्र सरकार आपत्ती निवारणासाठी अधिक सजग झाले. २६ जानेवारी २००१ साली गुजरातच्या कच्छ भागामध्ये झालेल्या भीषण भूकंपात सुमारे वीस हजार लोक ठार झाले व ४० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली होती. या भूकंपानंतर मात्र आपत्ती व्यवस्थापन धोरण बनवण्यासाठी सरकार कामाला लागले. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे २३ डिसेंबर २००५ रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला. या कायद्यातील तरतुदींनुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए)ची स्थापना करण्यात आली.
रविवारी ओडिशा व आंध्र प्रदेशला थडकलेल्या हुदहुद चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीएमए सज्ज झाली होती. या दोन राज्यांच्या किनारपट्टी भागातील काही लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम शनिवारपासूनच एनडीएमएने सुरू केले होते. त्यांच्यासाठी निवा-याची तात्पुरती व्यवस्थाही दोन्ही राज्य सरकारांच्या सहकार्याने करण्यात आल्याने हुदहुद चक्रीवादळाच्या तडाख्यात मोठी जीवितहानी झाली नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने असेच उत्तम मदतकार्य जम्मू काश्मिरमध्ये अलिकडेच आलेल्या महापुराच्या वेळी केले होते.

हुदहुदच्या तडाख्याने ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन संकटात अजून थोडी भर पडली. मात्र आंध्र प्रदेशवरून घोंगावत पुढे गेल्यानंतर रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास या वादळातील तीव्रता ब-यापैकी कमी झाली. हुदहुदचे भारतात आगमन झाले त्याच दिवशी जपानमध्ये ओकिनावा व क्युशू या भागांना व्हाँगफाँग या चक्रीवादळाने तडाखा दिला. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी तेथील दीड लाख नागरिकांना जपान सरकारने सुरक्षित स्थळी हलवले होते. त्यामुळे जपानमध्येही फारशी जीवित व वित्तहानी झालेली नाही. जपानने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत नेमक्या कोणत्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, याचा तुलनात्मक आढावा या निमित्ताने भारताने घ्यायला हवा. हुदहुद नावाचा पक्षी असून त्याचे नाव भारतात रविवारी घोंगावलेल्या चक्रीवादळाला देण्यात आले होते. हे चक्रीवादळ आता मंदावले असले तरी भविष्यात येणा-या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचा इशाराही देऊन गेले आहे!