आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Rights Mentioned Centuries Ago Via Shilalekh

शिलालेखातील मानवाधिकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या प्राचीन इतिहासात सम्राट अशोकाचे स्थान अद्वितीय आहे. सम्राट अशोकाच्या या शिलालेखांपासून भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग सुरू होते. मानवतावादी धर्माच्या प्रसारासाठी आणि बौद्ध धर्माच्या विस्तारासाठी अशोकाने विविध प्रकारचे लेख कोरून घेतले. हे शिलालेख म्हणजे अशोकाचे कोरीव आत्मचरित्र आहे. तत्कालीन पाली भाषा आणि वाङ्मयीन वैशिष्ट्यांची ओळख त्या शिलालेखांमधून दिसते.


मानवतेची साक्ष देणार्‍या धर्माज्ञा त्याने अनेक शिलालेखात कोरविल्या. गिरणार येथील सम्राट अशोकाचे 14 प्रस्तरलेख अत्यंत प्रसिद्ध आहेत. हे शिलालेख वाचताना त्यात ज्या धर्माज्ञा आहेत, त्याचा साक्षात्कार झाल्यावाचून राहत नाही. हे अशोकाचे धम्ममंगल म्हटले आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, परधर्मसहिष्णुता, प्राणिमात्रावर दया, वाकसंयम, अहिंसा या मानवाधिकारांची बीजे अशोकाच्या शिलालेखात सापडतात. याबरोबर अन्यायाची दाद मागण्याचे स्वातंत्र्य, संस्कृती रक्षणाचे स्वातंत्र्य, कायिक-वाचिक-मानसिक अहिंसा आणि महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य या मानवाधिकारांची ओळख प्रस्तरलेखातून होते.


गिरणारच्या पहिल्या प्रस्तरलेखात अहिंसा या तत्त्वाचे दिग्दर्शन सम्राट अशोकाने केले आहे. कोणत्याही प्राणिमात्राचा वध करू नये आणि यज्ञात बळी देऊ नये, असे म्हटले आहे. पूर्वी चार प्राणी मारले जात असत. त्या धर्मलेखानंतर दोन मोर व एक हरीण असे तीन प्राणीच मारले जाऊ लागले. तिसर्‍या व चौथ्या प्रस्तरलेखात अशोकाने माता-पिता यांची सेवा आणि व्यक्तिसन्मान यांचा विचार केला आहे. पाली लिपीतील वाचन याप्रमाणे आहे-ओळ 4-साधु मातारि च पितरि च सुस्त्रूसा मित्र संस्तुतजाती नं ब्राहमण........


ओळ 5 पुढीलप्रमाणे- समणानं साधु दानं प्राणानं साधु अनारंभो अपव्ययता अपभाउता साधु........म्हणजे मातापित्याची सेवा करणे चांगले आहे. मित्र,परिचित,नातेवाईक, ब्राहमण,श्रमण,यांचा मान राखणे स्पृहणीय आहे. चौथ्या प्रस्तरलेखात धर्माची शिकवण हे सर्वश्रेष्ठ कार्य मानले गेले आहे. त्या कार्याची वृद्धी पुत्र-पौत्र-प्रपोत्र करतील असे सांगितले आहे. सहाव्या प्रस्तरलेखात अन्यायाची दाद मागण्याच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. या सर्वामध्ये प्रजा कल्याणाची तळमळ दिसून येते.

काही ओळींचे अर्थ असे- मी सर्व ठिकाणी हेर नेमले आहेत. मी जेवत असलो, जनानखान्यात असलो, अंतर्गृहात, गोशालेत, पालखीत किंवा उद्यानात असलो तरी हेरांनी लोकांच्या अडचणी मला तातडीने येऊन सांगाव्यात. तसेच हा एक अर्थ पहा. मी कोठेही लोकांच्या अडचणींचे निवारण करीन. लोककल्याण हे माझे कर्तव्य आहे, असे मी समजतो. पालीभाषेतील ही ओळ पाहा- सर्वलोकहितत्या य य किंचि पराक्रमामि अहं किंति भूतानं आनंणं गच्छेय.म्हणजे लोककल्याणाची वृद्धी यासारखे श्रेष्ठ कर्तव्य नाही.

सातव्या प्रस्तरलेखात अशोकाने संचार स्वातंत्र्याचा उद्घोष केला आहे. सर्वपंथीय लोक सगळीकडे राहावेत अशी देवाच्या लाडक्या प्रियदर्शी राजाची इच्छा असल्याचे तो म्हणतो. पाली भाषेत ही ओळ अशी आहे- देवानंपियो पियदसि राजा सर्वत इच्छति सवे पासंडा वसेयु .

आठव्या प्रस्तरलेखात राज्याभिषेकानंतर दहा वर्षांनी अशोकाच्या धर्मयात्रेचा प्रारंभ झाल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये सर्व वयस्क मंडळी, धर्मगुरू , धर्मोपदेशक, प्रजेचे प्रतिनिधी यांच्या पोषणाची व दानाची व्यवस्था केली असल्याचे उल्लेख येतात. नववा प्रस्तरलेख हा अनेक अर्थांनी अशोकाच्या दयाळू मानवतावादी व दानशूर वृत्तीचे द्योतक आहे. त्यात समानतेचा आविष्कार दिसतो. धर्माचरण हेच महाफलदायी आचरण असल्याचे यात म्हटले असून दास व सेवक यांना योग्य वागणूक, वडिलधार्‍यांचा आदर, प्राणिमात्रांवर दया,प्रजेचे हित,धर्मदान,धर्मानुग्रह,मित्र,सगेसोयरे यांनी धर्माचे आचरण करावे असे म्हटले आहे. केवळ यशप्राप्ती व कीर्ती मिळवणे हा धर्माज्ञा कोरविण्याचा हेतू नाही, असे दहाव्या प्रस्तरलेखात म्हटले आहे. वर्तमानकाळ व भविष्यकाळ अशा दोन्ही काळात प्रजेने धर्माचरण करून संकटमुक्त व्हावे, हा एक सद्हेतू अक्षराअक्षरातून दिसून येतो.

अशोकाचा अकरावा प्रस्तरलेख म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे धर्मस्वातंत्र्य जपण्याच्या मानवाधिकाराची ओळख आहे, असे वाटते. प्रत्येकाला धर्ममैत्री करण्यास त्याने सांगितले आहे. या धर्ममैत्रीमध्ये मातापित्यांचा आदर, अहिंसा, दास व सेवक यांना चांगली वागणूक व दान हा सुखाचा मार्ग सांगितला आहे. धर्मदानासारखे दुसरे दान नाही व धर्ममैत्रीसारखी दुसरी मैत्री नाही,धर्मसंबंधासारखे दुसरे नाते नाही. ही पूर्ण ओळ अशी आहे. नास्ति एतासिसं दानं यारिसं धंमदानं धंमसंस्तवो वा धंमसंविभागो वा धंमसंबधो व. बाराव्या प्रस्तरलेखात अशोकाने सर्व धर्मातील संप्रदायांच्या तत्त्वप्रणालींचा आदर केला आहे. भाषणस्वातंत्र्य सांगत असताना स्वधर्मस्तुती व परधर्म निंदा असू नये, असे त्याने सांगितले आहे. प्रत्येक वेळी दुसर्‍या संप्रदायाचा आदर झाला पाहिजे, असे त्याने म्हटले आहे. त्याने समन्वयाचे तत्त्वज्ञान सांगून सर्वधर्माचा पराकोटीचा आदर केला आहे. सातव्या ओळीत तो म्हणतो- एवं हि देवानंपियस इच्छा किति सवपासंडा बहुस्त्रुता च असु कलाणगमा च असु. तो म्हणतो, परस्परधर्माची तत्त्वे ऐकावीत,त्यांचे पालन करावे, सर्वधर्मसंप्रदाय हे बहुश्रूत व कल्याणकारी सिद्धांत सांगणारे असावेत,अशी देवाच्या लाडक्या राजाची इच्छा आहे.

कलिंगदेश जिंकल्यानंतर लाखो लोक मारले गेल्यानंतर राजाला झालेला पश्चात्ताप तेराव्या प्रस्तरलेखात आहे. या गोष्टी त्याला अत्यंत दु:खदायक व क्लेशदायक वाटल्या आहेत. कलिंगदेश जिंकल्यानंतरच तेथे धर्माचरणाची वृद्धी केली असा उल्लेख त्याने केला आहे. ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढीस लागते, तो खरा विजय होय. ती प्रीती विजयामध्ये प्राप्त होते, हा हेतू समोर ठेवून अशोकाने एताय अथाय अयं धम्मल,अशी धर्मलिपी लिहिली. अशा पद्धतीने सम्राट अशोकाने गिरणार येथील 14 प्रस्तरलेखात ही धर्मलिपी कोरून मानवाधिकाराची बीजे पेरली आहेत.