आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताठ कणा हाच बाणा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगावातील भैरू हुंदरे या किराणा दुकानदारांना तीन मुले. यातील सुरेश पहिल्यापासून दुकानात काम करणारा. चांगल्या पद्धतीने प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर बेळगावच्या जी. एस. एस. महाविद्यालयातून त्यांनी शिष्यवृत्तीच्या आधारे शिक्षण घेतले. सुरतकल येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून हुंदरे हे 1972 मध्ये गुणवत्ता यादीत 9 व्या क्रमांकाने म्हैसूर विद्यापीठाची बी.ई. मेकॅनिक पदवी मिळवून उत्तीर्ण झाले. याचवर्षी त्यांनी बेळगावातील एका कारखान्यात नोकरीला सुरुवात केली; परंतु आठवीपासूनच उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिलेल्या हुंदरे यांनी 15 महिन्यांतच ही नोकरी सोडली. याच काळात त्यांनी आॅटो गॅरेजमधील कामाचाही अनुभव घेतला. विश्वनाथ सामंत आणि दिलीप चिटणीस या दोन मित्रांच्या सहकार्याने तिघांकडेही केवळ 300 रुपये असताना हायलॉक हायड्रोटेक्निक या कंपनीची स्थापना केली.

1981 मध्ये तिघांनी पॉलिहैड्रान कंपनीची स्थापना केली. तोपर्यंत कोणत्याही व्यवहाराच्या नोंदी नव्हत्या. शक्य तेवढा कर चुकवण्याकडे कल असायचा; परंतु स्वामी विवेकानंदांपासून ते जेआरडी टाटा यांच्यापर्यंतच्या अनेक व्यक्तिमत्त्वांचा हुंदरे यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी या कंपनीला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला. 1986-87 मध्ये या तिघांनी स्वतंत्र पूरक व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला आणि हुंदरे यांनी पॉलिहैड्रानची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केल्यानंतर मात्र सुरेश हुंदरे यांनी अध्यात्मातून मिळालेल्या शिकवणुकीचा पुरेपूर वापर करण्याचा निर्धार केला. आपल्या स्वार्थासाठी पैसे दाबून काम करून घेण्याचा राजमार्ग सर्वत्र चोखाळला जात असताना त्या वाटेवरून न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आतापर्यंतच्या वाचनाने, चिंतनाने त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट सोसण्याची त्यांनी तयारी केली होती. केवळआपणच नव्हे तर कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारीही याच वृत्तीने काम करतील असे वातावरण त्यांनी तयार केले. 1986 मध्ये ज्या पॉलिहैड्रानची वार्षिक उलाढाल 36 लाखांची होती तेव्हापासून बेळगावच्या औद्योगिक वसाहतीत हुंदरे पॅटर्न आकार घेऊ लागला. चूक झाली तर चूक दुरुस्त करेन, त्यासाठीचा दंड भरेन, पण लाच देऊन तडजोड करणार नाही या भूमिकेतून केलेल्या संघर्षाला आणि गुणवत्तापूर्ण कामाला यश येतच गेलं. यंदा या कंपनीची वार्षिक उलाढाल 85 कोटींवर पोहोचली, तर त्यांच्या सर्व उद्योगांची उलाढाल 150 कोटींवर गेली. अनेक खटपटी करून सरकारचा कर कसा चुकवता येईल याचा विचार बहुतांशी उद्योजक करत असताना हुंदरे हे कामाच्या दर तासाला 50 हजार रुपये म्हणजेच रोज 4 लाख रुपयांचा कर शासनाला भरत होते. वर्षाला 12 कोटींचा कर ते भरत आले.
आपल्याच कारखान्याजवळ बिझनेस आश्रम ही संकल्पना राबवणाºया सुरेश हुंदरे यांनी आपले कार्यालय सर्वांसाठी खुले ठेवले होते. स्वामी विवेकानंदांचा पुतळा, गं्रथ आणि पुस्तकांसाठी कपाट आणि टेबल, खुर्च्या असे त्यांचे साधे कार्यालय. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असल्याचा बडेजाव कुठेच तिथे दिसत नाही. कोणताही कर्मचारी त्यांना कधीही भेटू शकतो. त्यांना ज्या कंपन्या पुरवठा करतात त्यांच्यावरही विश्वास एवढा की, त्या वस्तूची तपासणीही होत नाही. याच वेळी लार्सन अँड टुब्रो, जॉन डिअर, टेल्कॉन यासारख्या अनेक कंपन्यांना आपल्या उत्पादनांची तितकीच खात्री हुंदरे यांनी दिली होती. त्यामुळेच त्यांच्या कंपनीला राष्टÑपती पुरस्कार मिळाला. अन्य अनेक पुरस्कारांनी हुंदरे यांना गौरवण्यात आले. हे सर्व करत असताना त्यांनी सामाजिक भानही बाळगले. कर्नाटकात आलेल्या पुरावेळी एक खासदार त्यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी घरे बांधण्यासाठी देणगी मागायला गेले. तेव्हा त्यांनी देणगी देण्यापेक्षा घरेच बांधून देतो म्हणून सांगितले. ते अध्यक्ष असलेल्या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून निधी उभा करून त्यांनी गोकाकजवळ 74 रायचूरजवळ 300 घरे बांधून दिली. बेळगावातील एका अपंग जलतरण प्रशिक्षकाला हुंदरे यांनी मदत केल्यानंतर तो परदेशी जाऊन आला. नंतर हुंदरे यांनी त्याला मानधन सुरू केले व तो बेळगावात प्रशिक्षक म्हणून काम करू लागला. काही कारणांनी चार महिने तो कामावर नव्हता, तर त्याने चार महिन्यांचे मानधन हुंदरे यांना परत आणून दिले.

प्रामाणिक माणूस तयार करण्याचा हा हुंदरे पॅटर्न होय. नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील निवडणुकीत बेळगावातील मराठी भाषिक नेत्यांच्या एकीसाठी हुंदरे यांनी अटीतटीचे प्रयत्न केले. मराठी भाषा, संस्कृती आणि अध्यात्म याच्या माध्यमातून आपले वेगळेपण दाखवून देणारे सुरेश हुंदरे आज आपल्यात नाहीत; परंतु त्यांचा हुंदरे पॅटर्न सर्वांनाच प्रेरणा देत राहील यात शंका नाही.