आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलूच बनेल दुसरे इस्रायल (मुजफ्फर हुसेन)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम भारत आणि त्या जवळील भागात पाकिस्तान सातत्याने अतिरेकी कारवाया करत आहे. खुद्द पाकिस्तानच्या काही भागांतही अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात सर्वकाही आलबेल आहे अशी स्थिती नाही. पाकिस्तानातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र आहे बलुचिस्तान. पाकिस्तानच्या अत्याचारामुळे तेथील जनता त्रस्त आहे. “मरता क्या नहीं करता’ या म्हणीप्रमाणे कसेही करून पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी तेथील जनता सक्रिय झाली आहे.
तेथील नेते दीर्घकाळापासून भारताच्या संपर्कात आहेत. भारताने बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून द्यावे, यासाठी बलूच नेते आर्जवं करत आहेत. इतके दिवस भारत संकोच करत होता; पण पाकिस्तानचे वाढते दुःसाहस पाहता भारत आता स्वस्थ बसणार नाही, याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. भारत आणि बलुच जनतेने मिळून पाकिस्तानला धडा शिकवल्यास या भागात कायमची शांतता नांदू शकेल.गेल्या काही दिवसांपासून भारताच्या वायव्य भागात पाकिस्तानने जी परिस्थिती निर्माण केली आहे ती पाहता भारताला आता कणखर भूमिका घ्यावीच लागेल आणि भारत तशी भूमिका घेईल अशी आशा आता वाटायला लागली आहे. भारतीय उपखंडातील पाकिस्तानचे कंबरडे मोडून त्याच देशात पाकिस्तानच्या अत्याचारांनी त्रस्त भागाला स्वतंत्र करणे हे भारतासाठी आवश्यकच होऊन बसले आहे.
आताची परिस्थिती म्हणजे भारतासाठी एक महान संधी आहे. पाकिस्तानमुळे त्रस्त झालेली बलूच जनता स्वत:च्या मुक्तीसाठी भारताकडे विनवण्या करत आहे, ही संधी भारतासाठी वरदान आहे. बलुचिस्तानच्या इतिहासावर एक धावता दृष्टिक्षेप टाकल्यास १६६६ पासूनची माहिती मिळते. बलुचिस्तानला सुरुवातीपासूनच शेजारील देशांची मान्यता मिळाली आहे. १८ व्या शतकात बलुचिस्तानचे शासक नसीर खान बलूच यांना नूरी नसीर या नावाने ओळखले जात हाेते. या सार्वभौम देशावर १८३९ मध्ये ब्रिटिशांनी हल्ला केला. यात बलूच सेनेचा पराभव झाला.
येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की तोपर्यंत तेथील सेना आणि सरदार हे सर्वच जण हिंदू होते. तेथील महत्त्वाची शहरे मकरान आणि लासबेला ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. तोपर्यंत हा प्रांत हिंदूबहुल होता. त्यामुळे हिंदू धर्म हीच त्या प्रांताची मुख्य ओळख होती. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले तेव्हा ११ ऑगस्ट १९४७ राेजी हा भाग ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. त्या वेळी तेथील जनता आणि तत्कालीन शासनाने त्या प्रांताला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. त्या वेळी बलुचिस्तान संसदेचे दोन सभागृह होते. स्वातंत्र्य मिळताच स्वतंत्र आणि सार्वभौम बलुचिस्तानची घोषणा झाली. भारताला स्वातंत्र्य मिळताच सप्टेंबर १९४७ मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला, त्याच प्रकारे २७ मार्च १९४८ रोजी पाकिस्तानने बलुचिस्तानवर हल्ला करून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह लावले. तेव्हापासून बलुचिस्तानने स्वतंत्र होण्याचा वेळोवेळी संघर्ष केला. १९९६ पासून तेथे पाकिस्तानच्या घुसखोरीत वाढ झाली. त्या वेळी नवाब रोज खान यांनी बलूच लिबरेशन आर्मी तयार केली. त्यांनी स्वतंत्र होण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण पाकिस्तानचा विळखा घट्ट होत गेला. ३० हजार बलूच नागरिकांची हत्या आणि २४ हजार बलूच नागरिकांचे गायब होणे आजही एक रहस्य बनले आहे.
चीनने १९६२ मध्ये भारतावर हल्ला केला. लडाख आणि अक्साई चीन या भागावर ताबा मिळवला. इतकेच नाही तर पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट आणि बाल्टिस्तानच्या काही भागावरही ताबा मिळवला. पाकिस्तानने यासाठी पुढाकार घेतला. आता चीनने लडाख, अक्साई चीन, गिलगिट व्हाया बाल्टिस्तान आपली सेना अफगाणिस्तानपर्यंत पोहोचविण्याची तयारी केली आहे. आता येनकेनप्रकारेन भारताच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे चीनचे षड््यंत्र आहे. भारताला घेरण्याची ही रणनीती आहे. इतकेच नाही, तर चीनने हिमालयाच्या दुर्गम पर्वतराजीत बोगदे तयार करून रेल्वे लाइन टाकली आहे. थोडक्यात सांगायचे तर चीनने बलुचिस्तानच्या आधारे भारताची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या या घुसखोरीमुळे बलुचिस्तानातील स्थानिक लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. चीनच्या अधिक जवळ जाणे कदाचित पाकिस्तानसाठी आत्मघात ठरू शकतो.आता प्रश्न असा आहे की अलीकडेच बलुचिस्तानची अधिक चर्चा का होत आहे? याचे उत्तर आहे भारताने इराणशी केलेली मैत्री. तेथील ग्वादर बंदर विकसित करण्याचे काम भारताने सुरू केले आहे. भारताच्या या रणनीतीने चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताने या बंदराचा आधार घेतला तर चीन आणि पाकिस्तान दोन्ही देश अडचणीत येतात. इराण भारताच्या बाजूने आल्याने अमेरिकाही चकित झाला आहे. कारण हा तोच भाग आहे की जेथे रशियाची सीमा जवळ आहे. रशियाने भारताला समर्थन दिल्यास पाकिस्तान आणि चीनची कोंडी ठरलेली आहे. रशिया आणि भारताचे जवळ येणे शत्रू देशांसाठी अडचणीचे आहे. पंतप्रधान मोदी यांची ही रणनीती जागतिक समीकरणांत बदल घडवून आणणारी आहे. पाकिस्तानने वेळीच आपले वर्तन सुधारले पाहिजे, अन्यथा आशियातही एक इस्रायल उदयास येणे अशक्य नाही. तसे झाले तर इस्लामच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना नव्याने उदयास आलेले इस्रायल (बलुचिस्तान) धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
(लेखक राजकीय विश्लेषक आहे, )
m_hussian1945@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...