आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी, ग्रेस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 26 मार्चला कुणी दाढीवाला कवी पृथ्वीच्या पल्याड गेला, तेव्हा सगळे काही सुन्न झाले होते. ‘ग्रेस’ नावाची पोकळी आजही खुणावत आहे, आकर्षित करत आहे.
खरंच हा ‘ग्रेस’ कोण होता?
अभिमानाने सांगायचा ‘मी, ग्रेस!’
मानवी मन जेव्हा शब्दातून व्यक्त होते तेव्हा त्याचे स्वरूप पार बदलून जाते. त्याला एक वेगळाच स्वीकारार्ह आकार येतो. परंतु ग्रेसचे असे नव्हते. तो शब्दात तोच होता, विचारात तोच होता. म्हणून आपण सतत ग्रेस त्याच्या लेखनातून शोधण्याचा प्रयत्न करतो. पण हाती काय लागते? एखादी ओळ हाती लागते न लागते तोच परत येरे माझ्या मागल्या. ग्रेसला खूप वेळा ऐकले, वाचले; पण जितके जवळ जावे तितका तो दूर जात होता, हे खरे ग्रेसच्या लेखनाचे
वैशिष्ट्य. इतर कलाकृती पुन्हा पुन्हा वाचताना नवीन काही मिळते. पण ग्रेसच्या बाबतीत तसे होत नाही. नवनवीन मिळत जाते, पण मागचे जे मिळालेले असते ते मोडत जाते, मोडीत काढले जाते.


ग्रेस हा वरकरणी खूपच साधा दिसणारा माणूस आतून जबरदस्त. ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’मध्ये त्यांनी आत्मनिवेदन केले आहे. त्यात ते म्हणतात,
‘कलता दिवस, त्यापुढे बावरलेली
संध्या आणि रात्रीचे पालाण
पडण्याअगोदर गाठायला गाव!
अशीच ‘वैष्णवी’ नित येत राहिली...
मलाही नेत राहिली, नेत राहील
एकतारीवर.’


या चार-सहा ओळी नुसत्या पाहिल्या तर ग्रेसची अवस्था कविता लिहिताना कशी असते, हे जाणवते. हा परकाया प्रवेश झाल्यानंतर ग्रेस हा ग्रेस राहत नाही. डॉ. माणिक गोडघाटे; डॉ. माणिक राहत नाही. मानवी मन हे सतत परकाया प्रवेश करत असते. परंतु हा परकाया प्रवेश शब्दांतून तीव्रपणे प्रकट करताना अशी निर्मिती होते, की ती निर्मिती त्याची स्वत:ची राहत नाही. कारण निर्मितिप्रक्रियेनंतर ती वेगळी होते आणि ती जेव्हा तो बघतो तेव्हा तोही विस्मयचकित होतो. त्याचा स्वत:चा विश्वास बसत नाही की हे मी केले, ही निर्मिती माझी आहे.


ग्रेसना त्यांच्या कवितेबद्दल विचारले असता ते बोलता बोलता कवितेपासून वेगळे होताना दिसायचे. कविता लिहिल्यानंतर मी तिचा राहत नाही. ग्रेससारख्या कवींबाबतीत असे घडताना दिसते. कारण कवितेच्या प्रक्रियेनंतर ती संपूर्णपणे वेगळी राहते, पार नाळ तुटते त्यांच्या स्वत:पासून. आरती प्रभूदेखील आपल्या एका कवितेत म्हणाले होते, ‘माझ्या कवितेच्या वाटेला जाल तर मोडून पडाल.’ कारण कविता ही वाचकाला झेपेलच असे नाही. ग्रेसच्या कवितेबाबतीत आपले असेच होते. ती झेपत नाही, मग काही जण दुर्बोधतेची लेबले लावताना दिसतात. पण ग्रेसची प्रत्येक कविता दुर्बोधतेचा टिळा लावूनच जन्माला येते. ती आपल्याला दुर्बोध वाटते, कारण आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, हे आपले दुर्दैव किंवा आपल्या अक्षमतेचे द्योतक आहे.

ग्रेसचे लेख वा कविता वाचताना त्या कवितेच्या नाळेमध्ये आपण पार गुरफटून जातो. त्या नाळेचे वेढे आपल्याला पार जायबंदी करतात, जखडून टाकताना दिसतात. हे मुद्दाम वगैरे नाही. कारण प्रत्येक माती, प्रत्येक वस्तू, प्रत्येक निर्मितिक्षम गोष्ट स्वत:चा एक अभेद्य आकार घेऊन निर्माण होते. अशीच ग्रेसची कविता आहे. ही अभेद्य तटबंदी फोडताना मानसिक क्लेश होतात, असे वाटते. हे मानसिक क्लेश आपल्याला गुंता सोडवताना होतात. कारण एखादी गोष्ट हाती लागत नाही असे वाटल्यानंतर मानवी मनाची अस्थिरता, तडफड अतिशय तीव्रपणे जाणवते. ग्रेस यांची कुठलीही कविता आत्मक्लेश देणारी असते. मग तो आत्मक्लेश कोणत्याही स्वरूपाचा असो, तो होतोच होतो.
ग्रेसची प्रत्येक कविता आपल्याला नेहमीच जवळची वाटते.


मराठी सारस्वतांनी जी. ए. कुलकर्णींना जी काही वागणूक दिली ती त्यांना खूप खटकली. त्यांनी एका मुलाखतीमध्ये तसे बोलूनही दाखवले. स्वत: ग्रेस कधीही या सारस्वतांच्या कंपूमध्ये वावरले नाहीत. त्यांची स्वत:ची जगण्याबद्दलची एक वेगळीच आस्था होती. शेवटी शेवटी त्यांना एक मोठा पुरस्कार दिला गेला. परंतु तो पैसा मला माझ्या पद्धतीने उपभोगता येणार नाही, याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. एका वेगळ्याच ‘अहं’मध्ये जगलेला हा ग्रेट दाढीवाला कवी आपल्या चश्म्यातून बघताना बरेच काही न्याहाळत होता, अनुभवत होता. पण सामान्यांची नाळ काही त्यांची तुटली नाही. परंतु अनेक ठिकाणी स्वत:च्या अस्मितेनेच ‘अहं’ ही तितक्याच तीव्रतेने फडा काढून असे. एक साधा प्रसंग सांगतो : मी ग्रेससमोर एक टी शर्ट ठेवला व म्हटले, ‘सही द्या टी शर्टवर.’ ते म्हणाले, ‘पुढे नाही देणार, पाठीवर देईन. छातीवर मिरवू देणार नाही...’ असे म्हणून त्यांनी स्वाक्षरी केली, ‘मी, ग्रेस!’