आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयबीएल’ का जादू चल गया! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या क्रीडा क्षेत्रात एखादी कल्पना रुजली तर त्या कल्पनेचा वृक्ष फोफावायला वेळ लागत नाही. समाजासाठी सोपा आणि गल्लीबोळात खेळला गेलेला क्रिकेट हा खेळ व्यावसायिक यशाची परिमाणे वेगात वर चढत गेला. क्रिकेटच्या त्या यशाने प्रेरित होऊन आयपीएलनंतर भारतात हॉकी, फुटबॉल, बॉक्सिंग, बुद्धिबळ, बिलियर्ड्स आदी खेळांच्या वेगवेगळ्या स्वरूपातील लीग सुरू झाल्या. परिवर्तनाच्या या प्रवाहापासून बॅडमिंटन हा खेळही स्वत:ला दूर ठेवू शकला नाही. बॅडमिंटन या खेळाची जागतिक स्तरावरील खेळाडूंच्या समावेशाची इंडियन बॅडमिंटन लीग ऊर्फ ‘आयबीएल’ ही संकल्पना यंदा प्रत्यक्षात साकारली गेली. जगातील टॉपचे बॅडमिंटन ‘स्टार्स’ भारतात खेळताना पाहणे ही गोष्ट काल-परवापर्यंत स्वप्नवत वाटत होती. चीनच्या खेळाडूंचा अपवाद वगळता जगातील सर्व नामवंत खेळाडू सलग 18 दिवस भारतात खेळले आणि क्रिकेटवेड्यांच्या देशात अन्य खेळांच्या विकासाच्या संकल्पनेला आशेची पालवी फुटली.

भारताच्या नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, लखनऊ, हैदराबाद या शहरांमध्ये सलग 18 दिवस जगातील सर्वोत्तम बॅडमिंटन कौशल्याचा महायज्ञ सुरू होता. सतत क्रिकेट हा खेळ दाखवणा-या ईएसपीएन या क्रीडा वाहिनीवर दररोज सलग साडेचार ते पाच तास बॅडमिंटन या खेळाच्या मेजवान्या झडत होत्या. तब्बल 45 देशांमध्ये विविध वाहिन्यांनी ‘आयबीएल’ लीगचे सामने थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवले. बॅडमिंटन कोर्टवर रंगणा-या लढती थेट घराघरांत पोहोचल्या. भारतीय क्रीडा रसिकांना या खेळाचे अनेक पैलू पाहायला मिळाले. एकेकाळी क्रिकेट हा खेळही गृहिणींना समजत नव्हता. सतत सामने पाहून आजीबाईंनाही क्रिकेट कळायला लागले होते. तोच बदल आयबीएलने घडवला. काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नेट लावून खेळणा-यांना या खेळातील बारकावे समजायला लागले. सचिन तेंडुलकरने जी किमया क्रिकेटच्या बाबतीत केली तोच चमत्कार सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये घडवून आणला. ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर तर सायना भारतातल्या प्रत्येक गृहिणीला ज्ञात झाली होती.

जेवढा उच्च दर्जाचा तिचा खेळ लोकांना आवडत होता तेवढीच तिची विनम्रता, खिलाडूवृत्ती लोकांना भावत होती. सायना बॅडमिंटनची राजदूत म्हणून वावरते आहे. आयबीएलदरम्यान छोट्या छोट्या मुलींनी तिला प्रोत्साहित करताना ‘कम ऑन सायनादीदी’ अशी दिलेली दाद बॅडमिंटन या खेळाने लोकांच्या हृदयात केलेल्या प्रवेशाची पोचपावती देत होती. सायना लोकप्रिय होत असतानाच तिच्यापाठोपाठ विश्वकप स्पर्धेतून कांस्यपदक घेऊन आलेली 19 वर्षीय सिंधूदेखील आयबीएलचे आकर्षण ठरली. नावाप्रमाणे भडक स्वभावाची आणि तिखट जिभेची ज्वाला गुट्टा प्रेक्षकांचे कायम आकर्षण होती. महिला दुहेरीचा या आयबीएलमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे ज्वालाला कोर्टवर येऊन आपली बॅडमिंटनमधील अदाकारी दाखवता आली नाही. मात्र, खेळाडूंच्या ‘डग आऊट’मधूनही तिने आपले अस्तित्व प्रेक्षक, आयोजक, संघटना आणि प्रसिद्धिमाध्यमांना सतत जाणवून दिले.

लिलावातील रकमेच्या वादापासून बंगळुरू येथील प्रतिस्पर्धी संघाने जायबंदी खेळाडू बदलल्यानंतरच्या वादापर्यंत संघर्षाची ज्वाला सतत धगधगत राहिली. सरळ, सुरळीत, अडथळ्यांचे फारसे खाचखळगे न ओलांडता सुरू असलेल्या या लीगला अशा चटकदार गोष्टींचीही गरज होती. ती फोडणी ज्वालाने दिली. तरीही जागतिक बॅडमिंटनमधील हा अनोखा प्रयोग पहिल्याच प्रयत्नात कमालीचा यशस्वी ठरला. या यशामुळे मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकाँग, चीन, काही युरोपीय देश, ब्रिटन या देशांच्या बॅडमिंटन संघटनांनाही आपल्या देशात अशा लीगचे आयोजन करण्याची स्वप्ने पडायला लागली आहेत. आयबीएलचे हे यश आहे. त्यापेक्षाही मोठे यश म्हणजे या खेळाबाबतचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलला आहे. या खेळातही क्रिकेटप्रमाणे करिअर करता येते याची भारतीय पालकांना या वेळी प्रथमच जाणीव झाली आहे.

ठाण्याला बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर चालवणा-या श्रीकांत वाड यांना या वेळी आपल्या प्रशिक्षण शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आयबीएलच्या क्षमतेची खात्रीच पटली आहे. जेथे प्रवेशासाठी 600 ते 700 अर्ज यायचे तेथे या वेळी अडीच ते तीन हजार अर्ज आले आहेत. शिबिरार्थींचीही यापुढे चाचणी घेऊन निवड करण्यात येणार आहे. हा बदल स्वागतार्ह आहे. त्यापेक्षा आयबीएलने केलेला मोठा बदल म्हणजे जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची भारतीयांना उपलब्ध झालेली संधी. सायना नेहवालचा अपवाद वगळता अन्य भारतीय खेळाडूंची नावे लोकांना ज्ञात नव्हती. आयबीएलमुळे पी. व्ही. सिंधू, अरुंधती पानतावणे, तन्वी लाड, पी. कश्यप, गुरुसाईदत्त, अजय जयराम, के. श्रीकांत, साईप्रणीत ही नावे लोकांच्या जिभेवर सातत्याने आली.

भारतीय खेळाडू फक्त देशवासीयांमध्ये नव्हे, तर परदेशी क्रीडा शौकिनांमध्येही लोकप्रिय ठरले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जगातील अव्वल खेळाडूंना पराभूत करणारे किंवा विजयासाठी झुंजायला लावणारे भारतीय खेळाडू. ही संधी आयबीएलमुळे साध्य झाली. सहा संघांतील जागतिक बॅडमिंटनमधील अव्वल खेळाडूंसह सराव करताना, खेळताना त्यांची अनेक गुपिते भारतीयांना कळली. जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू ली चाँग वेई सामन्याआधी कशी तयारी करतो, त्याचा आहार काय आहे, फिटनेससाठी तो काय करतो, तो सल्ला कुणाचा घेतो आदी गोष्टी भारतीयांनी जवळून पाहिल्या. बॅडमिंटन हा खेळ वैयक्तिक कर्तृत्वाची कदर करणारा खेळ आहे. एकेरीच्या विजेत्यांना डोक्यावर बसवणा-या या खेळात आयबीएलने सांघिक कर्तृत्वाला कुर्निसात करण्याची सवय लावली. वैयक्तिक हीरो असणा-या या खेळातील बदललेला हा दृष्टिकोनही लक्षात राहण्याजोगा आहे. असे करोडो प्रेक्षक क्षमतेच्या भारत देशात बॅडमिंटन लीगचे रोप तर रुजले आहे. एका दशकाचा करार संघटना आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार यांच्यात झाला आहे. आगामी स्पर्धेत यंदाचे दोष दूर करून आणखी आकर्षक स्वरूपातील आयबीएल पेश केले जाणार आहे. बॅडमिंटन व्यावसायिकाच्या नव्या बदलास भारत कारणीभूत ठरला आहे,
हेही नसे थोडके!