आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराधारांच्या समस्येकडे दुर्लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शहरातील बेघर लोकांना कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, याचा अंदाज कदाचित सर्वसामान्यांना नसेल. दिल्लीमध्ये रस्त्यावर दररोज कमीत कमी दहा तरी निराधार लोकांना मृत्यूने गाठलेले असते, असे आढळून आले. देशाच्या राजधानीतच किती निराधार काळाच्या दलदलीत लुप्त होतात, याची पडताळणी करण्यासाठी निघालो असता ही आकडेवारी समोर आली. सन 2009-10 च्या कडाक्याची थंडी पडलेल्या मोसमात ही पाहणी करण्यात आली होती. कडाक्याच्या थंडीत घरदार नसलेल्यांच्या मृत्यूच्या घटना माध्यमात तेव्हा झळकत होत्या. मरणा-यांत बहुतांश लोक तरुण कामगार होते. यामध्ये फुगे विकणारे, रिक्षाचालक, रोजंदारी कामगार तसेच फेरीवाल्यांचा समावेश होता.

दिल्ली प्रशासनाने त्या थंडीच्या मोसमात 3 टक्के बेघर लोकांच्या निवासाची सोय उपलब्ध करून दिली होती; परंतु गेल्या थंडीच्या मोसमात तर अशी निवारागृहे आणखी कमी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. कडाक्याच्या थंडीत रात्रीतून एक निवारागृह नगरपालिकेने तोडल्यानंतर ही वस्तुस्थिती निदर्शनास आली. अधिका-यांच्या मते, हे निवारागृह पार्कच्या जागी उभारण्यात आले होते. हे निवारागृह तोडल्यानंतर काही बेघरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

केवळ थंडीने यांचा मृत्यू झाला असावा का? या माणसांवर अशी वेळ का येते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सरकारकडे याबाबत माहितीच उपलब्ध नाही. यासंदर्भात माझे तरुण सहकारी स्मिता जेकब आणि असगर शरीफ यांनी अनेक स्मशानभूमी, कब्रस्तान आणि पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या. तेथे त्यांना विविध धक्कादायक माहिती मिळाली. शिवाय निर्विकार उत्तरे मिळाल्याने अनेक प्रश्नही उपस्थित झाले.

आम्हाला त्यात असे आढळून आले की, ज्यांचे रस्त्यावर अथवा अपघाती निधन होते, अशा ‘बेवारस प्रेतांच्या’ पोलिसांकडे नोंदी असतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू पावलेल्या अशा व्यक्ती सहसा बेघरच असतात. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास कोणीही नातेवाईक येत नाही. अशा अवस्थेत मोठ्या संख्येने मरणा-या बेवारस लोकांच्या आकडेवारीवरून आम्हाला काही माहिती हाती लागू शकते, अशी आशा निर्माण झाली. दिल्ली आणि शेजारील राज्याच्या पोलिस अधिका-यांच्या प्रादेशिक पातळीवरील एका वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 2009 दरम्यान 12,143 अज्ञात लोकांचे मृतदेह आढळून आले. 60 महिन्यांच्या आकडेवारीनुसार दररोज सरासरी 7 अज्ञात मृतदेह आढळले. रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडणा-यांच्या नोंदी पोलिसांत होतातच असेही नाही. ज्या ठिकाणी बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात, अशा दिल्लीतील एका मोठ्या विद्युतदाहिनी आणि कब्रस्तानात, माझे सहकारी स्मिता आणि असगर गेले होते. तेथे त्यांनी 2010 मधील प्रारंभीच्या चार महिन्यांच्या लेखी नोंदी पाहिल्या. त्यानुसार पोलिसांच्या नोंदींपेक्षा अधिक नोंदी तेथे असल्याचे आढळून आले. यात दरमहा सरासरी 306 मृतदेह मिळाल्याचे लिहिलेले होते. म्हणजे दिवसाकाठी 10 बेवारसांचे मृतदेह.

पण ही गोष्ट येथेच संपत नाही. अनेक वर्षांपासून निराधार लोकांच्या बाबतीत काम करत असताना मला असे दिसून आले की, निराधार व्यक्तींचे निधन झाल्यानंतर आपसात वर्गणी गोळा करून इतर निराधार त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात. त्यांना बेवारसाच्या नोंदीमध्ये घेण्यात येत नाही. काही निराधारांच्या नोंदी तर कोठेच नसतात, तर काही बेवारस मृतदेह वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या अ‍ॅनॉटॉमी टेबलवर पोहोचलेले असतात. म्हणून दिल्लीच्या रस्त्यावर दहाहून अधिक बेवारस व्यक्ती मृतावस्थेत आढळतात, असे म्हणणे गैर ठरणार नाही. पोलिसांच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर असे दिसते की, आपल्या अंदाजानुसार, बेवारस लोकांच्या मरण्याचे प्रमाण थंडीपेक्षा उन्हाळ्यात जास्त आहे. मे-जून महिन्यातील उन्हाळा त्यांना दिवसरात्र त्रस्त करत असतो. यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे काही उपाययोजनाही नसते.

त्यामुळे केवळ थंडीतच नव्हे, तर वर्षातील 24 तास त्यांना निवारा हवा आहे. मरणा-यांत 94 टक्के पुरुष, ज्यांचे सरासरी वय 42 असल्याचे दिसले. याचा अर्थ हे सर्व सक्षमपणे काम करणारे होते. म्हणजे जे मरताहेत ते केवळ वृद्ध अथवा निराधार नाहीत.

त्यांच्या मृत्यूची कारणे जाणून घेण्यासाठी आम्ही काश्मिरी गेटच्या एका पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड काळजीपूर्वक तपासले. केवळ 8 टक्के लोकांचा मृत्यू एखाद्या दुर्घटनेत अथवा आत्महत्या किंवा हत्येमुळे झाल्याची नोंद होती. इतर 92 टक्के लोकांचा मृत्यू कित्येक दिवसांपासून उपाशी असल्याने, कडक उन्हाने किंवा थंडीमुळे तसेच टीबीसारख्या गरिबांच्या आजाराने झालेला होता. यात मृतांची ‘भिकारी टाइप’ ही अजब श्रेणीही होती. एवढ्या मोठ्या संख्येने मध्यमवयीन पुरुषांचा मृत्यू केवळ उपासमार आणि बेघर असल्याने होत आहे.
सामान्य जीवन जगत असताना आपल्यामध्ये दयाबुद्धी आणि करुणावृत्तीचा किती अभाव आहे, याचे प्रत्यंतर आपल्या दारासमोर दररोज किती लोक प्राण सोडत आहेत, यावरून दिसून येते. या लोकांच्या राहण्यासाठी सुविधा, स्वस्त घरकुल योजना आणि स्वस्त पण पौष्टिक आहार देणारी सार्वजनिक सुविधा पाहिजे. ते आपण करत नाही. त्यामुळे रोज होणा-या अशा मृत्यूच्या घटना टाळता येतील. पण त्या चालूच राहणार आहेत, कारण त्याने आपल्याला काहीच फरक पडत नसतो.

(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकांचे व्यक्तिगत मत आहे)
manderharsh@gmail.com