आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Increasing Accident Over Mumbai Pune Express Highway

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पीडगन निकामी ठरवणारा ‘स्पीड’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पुणे यातील अंतर कमी करणारा 99 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग अनेकांच्या जिवाची शंभरी भरवणारा ठरत आहे. अवघ्या दोन तासांत पोहोचण्याची कालमर्यादा झाली तरीही अनेक जण त्यापेक्षाही कमी कालावधीत इच्छित स्थळी जाण्यासाठी 80 किलोमीटर प्रतितास ही वेगमर्यादा 140 किलोमीटरपेक्षा अधिक वाढवून बेशिस्तीने सुसाट सुटतात आणि स्वत:बरोबर दुस-यांचाही बळी घेतात. अशा या जीवघेण्या ‘धावपट्टीवर’ कुणी चुकून थांबला तर त्यांच्या आयुष्याचे गणितच चुकते. याचीच परिसीमा ओलांडणारी दुर्घटना या आठवड्यात घडली आणि खालापूरनजीक लग्नाच्या व-हाडातील 27 जणांना काही क्षणांतच लाखमोलाचे जीव गमवावे लागले. जेथे थुंकले जाते तिथे येथे थुंकू नये, असे फलक लावावे लागतात तसेच फलक या महामार्गावर जागोजागी दिसतात. ‘लेनची शिस्त पाळा’ या इशा-याचा बोजवाराच उडतो. त्याकडे अगदी डोळेझाक केली जाते आणि लेन कटिंगच्या हव्यासापायी मृत्यू तसेच अपंगत्वाला निमंत्रण धाडले जाते. कोण किती जोरात पळतो या मोहाच्या स्पर्धेत वेगमर्यादेचे भान ठेवले जात नाही. वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडे असलेल्या डझनभर ‘स्पीडगन’ खेळण्यासारख्या ठरल्या आहेत. मुंबई आणि पुण्याच्या प्रवासासाठी लागणारा वेळ निम्म्याहून कमी करणारा हा द्रुतगती महामार्ग 2002 मध्ये वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला. अगदी सुरुवातीपासूनच या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू झाले. त्याची एकूण संख्या आजतागायत दहा हजारांच्या घरात जाते. सुमारे दोन हजार दुर्घटना त्यातल्या त्यात मोठ्या स्वरूपाच्या होत्या. गेल्या तीन वर्षांत झालेल्या सुमारे 1,500 अपघातात चारशे जणांचा बळी गेला आहे, तर जवळजवळ दीड हजार जखमी झाले आहेत.
रस्ते विकास महामंडळाने या अपघाताच्या अनुषंगाने अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षानुसार 84 टक्क्यांपेक्षा अधिक अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत आहेत. त्यांचा निष्काळजीपणा नडतो. लेनची शिस्त न पाळणे, वेगमर्यादा ओलांडणे, वाटेत वाहने थांबवणे, अकस्मात ब्रेक लावणे अथवा ब्रेक फेल होणे, गाडीच्या इंजिनने पेट घेणे, टायर बर्स्ट होणे अशा बाबी अपघातास कारणीभूत आहेत. कित्येकदा वाहनचालकाला डुलकी आल्यानेही अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी 27 अपघातांत 58 जणांचा बळी गेला. आता या आठवड्यात झालेला अपघात हा सर्वात भीषण ठरला आहे. व-हाडाच्या मिनीबसेसवर धडकलेल्या मालवाहू ट्रकने 27 जणांचा जीव घेतला, तर 29 जणांना जखमी केले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा महामार्ग कमीत कमी धोकादायक होण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.
सर्वात भयाण ठरलेल्या अपघाताच्या दुस-याच दिवशी द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी तपासमोहीम सुरू केली. या कारवाईत सुमारे 200 वाहनचालक त्यांच्या कचाट्यात सापडले. त्यांनी वाहतूक नियम धाब्यावर बसवले होते. भयानक अपघातापासूनही त्यांनी बोध घेतलेला नव्हता. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडे बारा स्पीडगन आहेत. त्याचा वापर काही ठिकाणी केला जातो. तथापि स्पीडगन अपघात रोखण्यासाठी तशी उपयुक्त ठरलेली नाही. बोगदे अथवा अन्य ठिकाणी एकाच वेळी अनेक गाड्या सुसाट धावत असतात. त्यांच्या वेगाची नोंद घेऊन ती पुढील तपासणी नाक्यावर असलेल्या पथकाला दिली जाते. तथापि वेगमर्यादेचा भंग नेमका कोणी केला ते स्पष्ट होत नाही. कुणास ताब्यात घेतलेच तर ते आमच्याच गाडीने वेगमर्यादा ओलांडली हे कशावरून, असा प्रश्न करतात. त्याचे उत्तर पोलिसांकडे नसते.
महामार्गावरील वेगाला नियंत्रण घालण्यासाठी ‘संगणकाचा ब्रेक’ घालण्याचाही विचार पंधरवड्यापूर्वी पुढे आला. इंग्लंडमध्ये वापरण्यात येणाºया सॉफ्टवेअरचा येथे वापर करण्याचा विचार चालला आहे. त्याचे लवकरच प्रात्यक्षिक केले जाणार आहे. हा नवा प्रयोग यशस्वी झाला तर अपघात कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उपकरणे आणि मनुष्यबळाअभावी स्पीडगनचा प्रयोग फसल्याने कॉम्प्युटर नेटवर्किंग माध्यमाचा विचार केला जात आहे. द्रुतगती महामार्गावरील सर्वात भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेला वाहनचालक सोमनाथ फडतरे हा पंचविशीतील आहे. सतत सात दिवस वाहन चालवून मी थकलो होतो, द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या बसेस अंधारामुळे मला दिसल्याच नाहीत, अशी कारणे तो सांगत आहे. अशा कारणांचाही विचार व्हायला हवा. महामार्गावर वाहतुकीचे नियम तोडले की दोनशे रुपये दंड भरून मोकळे होता येते. या रकमेत दहापट वाढ करावी असे संबंधित पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षाही अपेक्षित आहे. अशा प्रकारची तरतूद संसद पुढील सत्रात संमत करेल, अशी आशा पोलिस महासंचालक (हायवे) विजय कांबळे यांना वाटत आहे. मानवी चुका करणा-यांसाठी अशाच प्रकारची ‘स्पीडगन’ असणे आवश्यक वाटते. नियम चुकवणा-याचा वाहन परवाना जप्त केला की त्याला दुस-या मार्गाने डुप्लिकेट लायसन्स प्राप्त होते. अशी असंख्य जप्त केलेली लायसन्स महामार्ग पोलिसांकडे पडून आहेत. प्रशासकीय यंत्रणेतच नसलेला ताळमेळही नियम धाब्यावर बसवण्यासाठी उपकारक ठरत असतो. याचाही ‘द्रुतगती’ने विचार व्हायला हवा.