आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातली ‘अमेरिका’ (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया दोन दशकांपूर्वी सुरू झाली आणि आपल्याला एक नवा चेहरा गवसला. अलिप्त राष्ट्र चळवळीचा महत्त्वाचा घटक म्हणून आपण स्वत: विकसनशील देश म्हणवून घेत होतो हे खरे; परंतु जगाला आपली ओळख ही एक गरीब देश अशीच होती. तसे वाटणेही स्वाभाविकच होते. कारण आपल्या कौशल्याचा ठसा आपण जगावर अजून उमटवलेला नव्हता. स्वातंत्र्यानंतरची एक गरज आणि जागतिक परिस्थितीचा एक भाग म्हणून आपण संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. मात्र 1991 मध्ये अर्थमंत्रिपदी आरूढ झाल्यावर विद्यमान पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपली अर्थव्यवस्था खुली करण्यास प्रारंभ करून देशाला एक नवी दिशा दिली. यातून देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट झाली. सरकारी संरक्षण छत्र हळूहळू दूर होत गेल्याने त्या काळी विशीत असलेल्या तरुणांना व्यापक व्यासपीठ गवसले. त्यांच्यातील उद्यमशीलता बहरून आली. भांडवल नसतानाही केवळ बौद्धिक संपत्तीच्या जिवावर आपण उद्योग उभारू शकतो, हा विश्वास आयटी उद्योगाने तरुणांना दिला. पुढच्या दशकात मध्यमवर्गीयांची एक नवी पिढी यातूनच जन्माला आली. आज या मध्यमवर्गीयांची लोकसंख्या अमेरिकेएवढी किंवा संपूर्ण युरोपाच्या लोकसंख्येएवढी म्हणजे 30 कोटींच्या वर गेली आहे. आताच्या बाजारपेठीय संस्कृतीत खर्च करण्याची क्षमता असलेल्या या मध्यमवर्गीयांच्या बाजारपेठेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्यमवर्गीयांची ही जशी मोठी बाजारपेठ आहे तशीच श्रीमंत, नवश्रीमंतांचीही अवाढव्य म्हणजे सुमारे सात कोटी लोकांची बाजारपेठ आहे. आपल्याकडे आर्थिक उदारीकरणापूर्वीही श्रीमंत होते, परंतु गेल्या वीस वर्षांत ही संख्या झपाट्याने वाढली आणि नवश्रीमंतांचा एक जाड थर देशात तयार झाला. यात नवउद्योजक, आयटीतले वरिष्ठ अधिकारी, ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ ज्यांना म्हणतात तो कॉर्पोरेट क्षेत्रातला अधिकारी वर्ग, एमबीए शिकून करोडोंचे वार्षिक पॅकेज घेणारा ‘टायवाला’ वर्ग यांचा समावेश आहे. यातील बरेच जण मध्यमवर्गातून वाढलेले आहेत. आता त्यांचे वार्षिक उत्पन्न करोडोत गेले आहे आणि या वर्गाची नाळ पूर्णत: अमेरिकेशी जोडली गेली आहे. गर्भश्रीमंत म्हणून पूर्वी जो एक वर्ग अस्तित्वात होता, त्याचा तर एक पाय अमेरिकेतच असे. उदारीकरणाच्या अगोदर आपल्याकडे ज्या वेळी विदेशी वस्तू मिळत नव्हत्या, त्या वेळी कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना अमेरिका हा स्वर्गासमान वाटे. त्या काळी भारतात लक्झरी (आलिशान-महागड्या) वस्तू विक्रीला उपलब्ध नसत. आता मात्र या वस्तू आपल्याकडे सहज उपलब्ध होऊ लागल्या आणि अनपेक्षितपणे लक्झरी वस्तूंची एक मोठी बाजारपेठ विकसित झाली. जगात मंदी असली तरीही आपल्याकडे या बाजारपेठेला फारसा धक्का लागलेला नाही. आपल्या देशात लक्झरी वस्तूंची बाजारपेठ यंदा सुमारे नऊ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. येत्या तीन वर्षांत ही बाजारपेठ 15 अब्ज डॉलरवर पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे लक्झरी वस्तूंचे जगातील उत्पादक भारताकडे आकर्षित झाले आहेत. यातील बहुतांश वस्तू आयात केल्या जातात आणि वर्षभरात रुपयाचे अवमूल्यन सुमारे 23 टक्क्यांनी झाल्याने या वस्तू आणखीनच महाग झाल्या आहेत. असे असले तरीही लक्झरी वस्तूंची विक्री यंदा 30 टक्क्यांनी वाढली. ही वाढती बाजारपेठ काबीज करण्यासाठी जगभरातील आघाडीच्या 50 लक्झरी ब्रँडपैकी 19 ब्रँडने आपली दुकाने येथे थाटली आहेत. लक्झरी ब्रँडची ही बाजारपेठ मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांपुरती मर्यादित नाही; तर देशातील अनेक लहान, मध्यम आकारातील शहरातही लक्झरी उत्पादनांची विक्री होऊ लागली आहे. अलीकडेच इंदूरसारख्या लहान शहरात ‘ज्युडिट लिबर’ या लक्झरी ब्रँडच्या 30 पर्सची विक्री झाली. देशभरात या पर्सची विक्री 300 झाली होती आणि याची किंमत एक ते तीन लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ‘ज्युडिट लिबर’ने जिकडे बीएमडब्ल्यू विकली जाते त्या शहरात म्हणजे आग्रा, मिरत, कर्नाल, फरिदाबाद येथेही आपल्याला ग्राहक मिळवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. लक्झरी वस्तू या शब्दाची व्याख्या काळानुसार बदलत गेली आहे. सुमारे 25-30 वर्षांपूर्वी नोकरदार मध्यमवर्गीयाच्या दृष्टीने (त्या काळी मध्यमवर्गीय हा चाळीत राहत होता) फ्रिज, फोन व स्कूटर या वस्तूही लक्झरी वर्गात मोडणा-या होत्या. आता या वस्तूच काय, मोबाइल फोनही लक्झरी नव्हे तर ती गरज झाली आहे. श्रीमंतांची मात्र बाजारपेठ ही वेगळीच आहे. सर्वसामान्य लोक ज्या वस्तू घेतात त्याच वस्तू लक्झरी प्रकारातल्या असल्यास त्याची किंमत दहा ते शंभरपट महाग असते. लक्झरी प्रकारातील वस्तूंत पर्सपासून ते आलिशान मोटारी मोडतात आणि यांच्या किमती लाखो-करोडो असतात. भारतात आता या वस्तूंसाठी खरेदीदार असल्याने बहुतांशी अमेरिका, युरोपातून आयात होतात. पूर्वी आपल्याकडे आलिशान प्रकारातल्या गाड्या मोजक्याच होत्या. आता मात्र त्यांचे उत्पादनही आपल्याकडे सुरू झाले. बीएमडब्ल्यू जग्वार, लॅँड रोव्हर हे ब्रँड आता आपल्याकडे चीनच्या खालोखाल विकले जातात. आपल्या 110 कोटी लोकसंख्येत अनेक ‘बाजारपेठा’ विसावल्या आहेत. यात चीनच्या स्वस्त वस्तूंपासून अमेरिका, युरोपातल्या महागड्या वस्तू असा सर्व प्रकारचा माल विकला जातो. लक्झरी वस्तूंची ही बाजारपेठदेखील आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदतकारक ठरते. त्यामुळे त्याकडे डोळेझाक करता येणार नाही.