आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-फ्रान्स संबंध : सोन्याची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांदे यांच्या बुधवारी सुरू झालेल्या दोन दिवसांच्या भारतभेटीच्या निमित्ताने दोन्ही देशांना द्विपक्षीय संबंधांना नव्याने बळकटी देण्याची संधी प्राप्त होते आहे. ओलांदे यांनी आपल्या शिष्टमंडळात, त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सदस्य आणि फ्रान्सचे आघाडीचे उद्योजक यांचा समावेश करत ही भारतभेट त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे सूचित केले आहे. फ्रान्सचे शिष्टमंडळ नवी दिल्ली आणि मुंबई या भारताच्या राजकीय आणि आर्थिक राजधान्यांना भेट देणार असून यातून द्विपक्षीय संबंधांतील राजकीय आणि आर्थिक पैलूंची व्यापकता लक्षात येते. आंतरराष्‍ट्रीय शिष्टाचारानुसार, एका देशाच्या कार्यप्रमुखाने दुस-या देशाला भेट दिल्यानंतर, त्या दुस-या देशाच्या कार्यप्रमुखाने पहिल्या देशाला भेट देणे अपेक्षित असते. यानुसार खरे तर, भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची फ्रान्स भेटीची पाळी होती. मात्र दोन्ही देशांनी या राजनैतिक परंपरेला फाटा देत राष्‍ट्राध्यक्ष ओलांदे यांच्या भारत दौ-या ला अंतिम स्वरूप दिले आणि दोन्ही देशांतील वाढत्या विश्वासार्हतेचे उदाहरण सादर केले.

फ्रान्सवा ओलांदे यांच्यापूर्वी फ्रान्सच्या अध्यक्षपदाची धुरा वाहणारे, निकोलस सार्कोझी डिसेंबर 2010 मध्ये भारतभेटीवर आले होते. आंतरराष्‍ट्रीय राजकारणात सार्कोझी-मनमोहनसिंग यांचे मेतकूट चांगलेच जमले होते. त्या दोघांनी 2009 मध्ये इटलीत झालेली जी-8+5 परिषद, लंडन आणि पिट्सबर्ग येथे भरलेल्या जी-20 परिषदा आणि 2010 मध्ये टोरंटो आणि सेउलमध्ये झालेल्या जी-20 परिषदांमध्ये परस्पर सामंजस्य प्रस्थापित करत द्विपक्षीय आणि बहुराष्‍ट्रीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती.सन 2009 मध्ये फ्रान्सने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ‘बैस्तिले डे परेड’ म्हणून ओळखल्या जाणा-या त्यांच्या राष्‍ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून सन्मानित केले होते.

‘बैस्तिले डे परेड’ ही संपूर्ण युरोपमधील सर्वाधिक भव्यदिव्य लष्करी कवायत म्हणून प्रसिद्ध आहे.डॉ. सिंग यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराच्या 400 जवानांनी या परेडचे नेतृत्व केले होते. या कालावधीत भारत आणि फ्रान्सदरम्यानचे सामरिक आणि संरक्षण बंध मजबूत होत गेले.शिवाय सांस्कृतिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण इत्यादी क्षेत्रातील सहकार्य वाढीस लागले. याच कालावधीत गाजलेल्या भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्य कराराचा खरा फायदा भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा मिळण्यास झाला. भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्य कराराच्या आधारे भारताला अणुऊर्जेच्या शांततापूर्ण विकासासाठी आंतरराष्‍ट्रीय सहकार्याची परवानगी मिळताच फ्रान्स हे पहिले राष्‍ट्र होते, ज्यांनी भारताशी यासंबंधी तत्काळ करार केला होता. तत्पूर्वी, 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने फ्रान्सशी केलेला सामरिक भागीदारीचा करार हा द्विपक्षीय संबंधांतील मैलाचा दगड ठरला आहे. हा करार घडवून आणणारे फ्रान्सचे तत्कालीन पंतप्रधान निओनेल जॉस्पिन हे सध्याचे राष्‍ट्राध्यक्ष ओलांदे यांच्याच सोशलिस्ट पक्षाचे होते आणि त्या वेळी ओलांदे हेच पक्षाचे प्रमुख होते. त्यामुळे फ्रान्समध्ये सत्तांतर होऊन राष्‍ट्राध्यक्षपद सार्कोझी यांच्याकडून ओलांदे यांच्याकडे आले असले तरी त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होणार नाही, अशी आशा आहे.


ओलांदे आणि डॉ. सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक साम्ये आहेत, ज्यामुळे दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून भारत आणि फ्रान्स एकमेकांच्या अधिक जवळ येण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ शकतो. डॉ. सिंग यांच्याप्रमाणेच ओलांदे हे अभ्यासू आणि मितभाषी आहेत. दोघांचेही विरोधक त्यांच्यावर दुबळे असल्याचा आरोप सातत्याने करत आले असले तरी दोघांनीही वेळोवेळी आपापल्या राष्‍ट्र हिताचे कणखर निर्णय घेतलेले आहेत. कोणत्याही समस्येवर लघुकालीन तोडगा काढण्याऐवजी दीर्घकालीन समाधान शोधण्याकडे दोघांचाही कल असतो. आपले व्यक्तिगत आयुष्य राजकारणाचा चौकटीबाहेर ठेवण्याबाबत डॉ. सिंग यांच्याप्रमाणे ओलांदे देखील आग्रही असतात. त्यामुळे डॉ. सिंग यांच्याप्रमाणे त्यांची प्रतिमादेखील स्वच्छ चारित्र्याचे राजकारणी अशी आहे. ओलांदे यांच्या भारतभेटीत दोन्ही नेत्यांना मोकळ्या मनाने एकमेकांशी हितगुज करण्याची संधी मिळणार आहे. डॉ. सिंग यांच्याशी अधिकृत चर्चेशिवाय, ओलांदे हे काँग्रेस आणि सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीसुद्धा चर्चा करतील. मुंबईमध्ये ते उद्योग जगतातील प्रमुखांशी संधान साधतील.
या वेळी फ्रान्सच्या राष्‍ट्राध्यक्षांच्या भारतभेटीत उच्च शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण या क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांना मजबुती, तसेच अफगाणिस्तान आणि म्यानमारसंबंधी बहुराष्‍ट्रीय प्रयत्नांना वेग आणण्यासाठी भारत-फ्रान्सदरम्यान ताळमेळ प्रस्थापित करण्यावर भर असण्याची शक्यता आहे. फ्रान्सने अलीकडेच अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानचे प्रतिनिधी यांच्या दरम्यान संवाद प्रस्थापित करण्यात पुढाकार घेतला होता. या संदर्भात सन 2014 नंतर अफगाणिस्तानात स्थैर्य टिकवण्यासाठीच्या पाश्चिमात्य योजनेसंदर्भात खोलवर जाणून घेणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. दोन्ही देशांतील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारताने लवकरात लवकर 10 बिलियन युरो रकमेची बहुउद्देशीय राफेल लढाऊ विमाने विकत घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, असा फ्रान्सचा आग्रह असणार आहे. या संदर्भात, राफेलची निर्मिती करणा-या ‘डसौल्त एव्हिएशन’ या फ्रेंच कंपनीने भारताच्या जवळपास सर्व मागण्या- ज्यात तंत्रज्ञान हस्तांतराचासुद्धा समावेश आहे - मान्य केल्याचे फ्रान्सच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे. सध्या फ्रान्समधील आर्थिक मंदीचा दोन्ही देशांतील व्यापारावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. फ्रान्स सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, सन 2011मध्ये द्विपक्षीय व्यापारात फक्त 5.8% इतकीच वाढ झाली, जी 2010 मध्ये 30% होती. भारतासाठी चांगली बातमी ही आहे की भारताची फ्रान्सला होणारी निर्यात 13 टक्क्यांनी वाढलेली आहे. मात्र, फ्रान्सकडून होणारी आयात 4.5 टक्क्यांनी घटलेली आहे. भारतात प्रत्यक्ष गुंतवणूक करणा-या देशांमध्ये फ्रान्सचा क्रमांक आठवा असून, सुमारे 700 फ्रेंच कंपन्या भारतात कार्यरत आहेत. मात्र, भारतीय गुंतवणूकदार अद्याप फ्रान्सबाबत उदासीन आहेत. त्यांनी भारताबाहेर केलेल्या अंदाजे 75 बिलियन युरोच्या गुंतवणुकीपैकी फ्रान्सच्या वाट्याला फक्त 1 बिलियन युरो एवढीच गुंतवणूक आलेली आहे. फ्रान्समधील क्लिष्ट कामगार नियम याला जबाबदार आहेत, असे अझीम प्रेमजींसारख्या भारतीय उद्योजकांचे म्हणणे आहे, तर लक्ष्मी मित्तलसारखे भारतीय उद्योजक कामगारहिताकडे संपूर्ण दुर्लक्ष करत प्रचंड नफाखोरी करतात, असा फ्रान्सचा आरोप आहे. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचे आव्हान ओलांदे यांच्या भारतभेटीत दोन्ही देशांना पेलायचे आहे. संपूर्ण युरोपीय संघाशी व्यापक संबंध स्थापन करायचे भारताचे धोरण असले तरी तो मार्ग ग्रेट ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या युरोपमधील तीन सर्वात शक्तिशाली देशांमधून जातो, याची भारतीय नेतृत्वाला जाण आहे. या दृष्टीने फ्रान्सवा ओलांदे यांची भारतभेट महत्त्वपूर्ण आहे.


rparimalmayasudhakar@gmail.com