Home | Editorial | Agralekh | india- pakistan cricket relation

क्रिकेट व्यापारधर्म! (अग्रलेख)

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 17, 2012, 10:34 PM IST

मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर खंडित झालेली भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतींची परंपरा पुन्हा सुरू होत आहे.

 • india- pakistan cricket relation

  अखेर बर्फ वितळला. मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर खंडित झालेली भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतींची परंपरा पुन्हा सुरू होत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डांनी डिसेंबरअखेर मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळायला अनुकूलता दर्शवली. भारत सरकारची या प्रस्तावाला मंजुरी मिळायची आहे. सरकारातील राजीव शुक्ला, विलासराव देशमुख, अरुण जेटली, लालूप्रसाद यादव आणि शरद पवार ही क्रिकेट बोर्डातील मंडळी असताना या प्रस्तावाला हिरवा कंदील अपेक्षित आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट खेळाच्या बंद झालेल्या सीमा कायमच्या बंद राहणार नाहीत, हे निश्चित होते. दोन देशांमध्ये दोन धर्म आहेत. एक परंपरेनुसार आलेला आणि दुसरा क्रिकेट धर्म. आता याउपर एक तिसरा धर्म निर्माण झाला आहे तो म्हणजे क्रिकेट व्यापारधर्म. ‘आयपीएल- पाच’चे अपयश भारतीय क्रिकेट बोर्डाला स्वस्थ बसू देत नव्हते. सीमेपलीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तर कोणताही परदेशी संघ खेळायला न आल्यामुळे कंगाल झाले आहे. अशा वेळी भारत-पाक मैत्रीचे, देशभक्तीचे आणि खिलाडू वृत्तीचे नारे देत या दोन क्रिकेट बोर्डांनी अखेर बाजी
  मारलीच. कोणत्याही गोष्टीचा अचूक लाभ उठवण्याची वृत्ती सध्या वाढतेय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने म्हणजे एक प्रतियुद्धच. या युद्धाचे पडसाद उभय देशांमध्ये कायम उमटत आले. वाळवंटातील, दुबई, शारजाहमधील क्रिकेट निकालांना निश्चितीचा गंध येताच क्षणी केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट संघाला तेथे जाण्यास मनाई केली. तो लाल सिग्नल आजही तसाच आहे. मुंबईवरील आक्रमणानंतरची कटुता कमी होताक्षणी भारतीय क्रिकेट बोर्डाने सर्वप्रथम चॅम्पियन क्रिकेट लीगच्या निमित्ताने पाकिस्तानातील एका क्लबला निमंत्रित करण्याचा प्रस्ताव पाठवून चाचपणी केली. सरकारकडून त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, हे लक्षात येताच क्षणी बीसीसीआयने डिसेंबर-जानेवारी महिन्यात पाकिस्तानबरोबर 3 एक दिवसीय आणि 2 ट्वेंटी-20 सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव पुढे केला. भारत-पाकिस्तानातील क्रिकेट संबंधाचे पुनरुज्जीवन करण्याचा राग भारतीय क्रिकेट बोर्डाने आळवला आहे. असे जरी असले तरीही त्यापाठचे छुपे कारण आहे, भारत-पाक क्रिकेट सामन्यांसह संघर्षाच्या सहानुभूतीचा अचूक लाभ उठवण्याचे.
  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तिजोरीत सध्या खडखडाटच आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाची आवकही सध्या घटली आहे.
  टेलिव्हिजन वाहिन्यांचा क्रिकेट सामन्यांचा, स्पर्धांचा टीआरपी खाली घसरला आहे. अशा वेळी क्रिकेटला ‘बूस्ट अप’ करण्यासाठी परिणामकारक रसायन हवे होते. भारत-पाक संघर्षाच्या लाभापेक्षा अन्य प्रभावी गोष्ट असूच शकत नाही. दोन्ही देशांच्या सरकारांपेक्षाही क्रिकेट मालिकांच्या आयोजनात त्यांच्या क्रिकेट बोर्डांना म्हणूनच अधिक रस आहे. आर्थिक लाभ हे यापाठचे प्रमुख कारण आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट लढती लावल्या की दोन्ही देशांना खो-याने पैसे ओढता येतील. या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणावर जाहिरातदारांच्या उड्या पडतील. टेलिव्हिजनच्या क्रिकेटचा घसरलेला टीआरपीही आपोआप वाढेल. याच वेळी बेटिंग रॅकेट चालवणा-यांच्या तोंडालाही पाणी सुटले असेल. कारण भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांवर अधिक बेटिंग होते. उभय देशांतील क्रिकेट रसिक एकीकडे आपापल्या संघाच्या लढतीची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. त्याच वेळी दोन्ही देशांच्या पाठीराख्यांना आपला संघ हरायलाही नको असतो.
  सामन्याचे ठिकाण मँचेस्टर असो, बर्मिंगहॅम असो, सिडनी असो, मुलतान असो किंवा चंदिगड असो. प्रत्येक गावातला भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक आपापल्या संघाला ‘दिलो जानसे’ पाठिंबा देत असतो. क्रिकेट रसिकांच्या मनातील चंचलता, अस्वस्थता, संघर्ष आणि मानसिकतेचे एक अभूतपूर्व द्वंद्व स्टँडमध्ये पाहावयास मिळते. त्याच भावनांचा लाभ उठवण्यासाठी दोन्ही क्रिकेट बोर्ड सध्या तत्पर झाले आहेत. क्रिकेटचे संबंध पुन्हा सुरू होण्यापाठची धार्मिक भावना एकमेव आहे. ती भावना, तो धर्म आहे व्यापारधर्म. क्रिकेटच्या आर्थिक आवकीच्या अडखळत चालणा-या गाडीने वेग पकडावा यासाठी भारत-पाक लढतींना दिलेला हा हिरवा सिग्नल आहे. भारतीय क्रिकेटसाठी कदाचित हा धोक्याचा सिग्नलही ठरू शकेल. गेल्या कित्येक वर्षांत प्रचंड लोकसंख्या आणि टेलिव्हिजन टीआरपी आणि त्यायोगे जाहिरातींद्वारे मिळणारे प्रचंड आर्थिक उत्पन्न हीच भारतीय क्रिकेट बोर्डाची ताकद होती. या ताकदीच्या बळावर भारताने क्रिकेट विश्वावर दादागिरी दाखवली. मात्र, भारतीय क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या मैदानावर अशी हुकमत गाजवता आली नाही. अगदी कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुस-या स्थानावर असतानाही आपला संघ निर्विवाद यश मिळवत नव्हता. 120 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असल्याचा फायदा, भारतीय क्रिकेट बोर्डाने टेलिव्हिजन प्रसारणाचे हक्क विकताना पुरेपूर उचलला. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत दर्जेदार क्रिकेटपटूंची फौज उभी करण्यात हेच क्रिकेट बोर्ड अपयशी ठरले. तोच तेंडुलकर, द्रविड, धोनी आदींचा संघ कायम खेळवला. या संघाकडे राखीव फळीदेखील नव्हती. 120 कोटींच्या आणि क्रिकेट या खेळाला धर्म मानणा-या देशाचे खरे तर दर्जेदार असे किमान 4 ते 5 संघ असायला हवे होते. मुंबईची क्रिकेटची मक्तेदारीही अद्याप पूर्णपणे मोडली गेली नाही. एवढा मर्यादित विकास संपूर्ण देशातील क्रिकेटच्या दर्जात झाला आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड वर्षाकाठी देशातील सर्व क्रिकेट बोर्डांवर, खेळांडूंवर क्रिकेटच्या विकासासाठी करोडो रुपयांची खैरात करत आहे. 120 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत क्रिकेट बोर्डाने तयार केलेले क्रिकेटपटूंचे प्रमाणही अगदीच अल्प आहे. याचाच अर्थ, आपण क्रिकेट या खेळातील मैदानावरची उभी केलेली ताकद तुटपुंजी आहे. क्रिकेट हा धर्म असल्याची आवई दिली जाते ती जाहिरातींच्या दृष्टिकोनातून. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करतानाही याच जाहिरातींच्या आधारे मिळणा-या अर्थिक लाभाकडेच अधिक लक्ष आहे. आयपीएल फंडही फ्लॉप होत असताना भारतीय क्रिकेट बोर्डाला अशाच नव्या आधाराची गरज होती.

Trending