आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाती छप्पन सेंटिमीटर्सचीच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारी तयारी, सारी आखणी व्यवस्थित झालेली… वीस षटकांच्या सहाव्या राष्ट्रकुल चषक ऊर्फ विश्वचषक स्पर्धा भारतात; म्हणजे खेळपट्ट्या बनवण्याचे सर्वाधिकार नव्हे, तरी बरेचसे अधिकार भारतालाच. डेल स्टेन, ट्रेंट बोल्ट, साऊथी, अामीर प्रभृतींच्या तोफा थंडावणाऱ्या, फिरणाऱ्या खेळपट्ट्या बनवण्याचा अनधिकृत परवाना मिळाल्यासारखाच. त्याआधी ऑस्ट्रेलियन भूमीवर कांगारूंच्या प्रायोगिक संघांना अन् त्यापाठोपाठ भारतात श्रीलंकेच्या दुसऱ्या फळीला भारतानं हरवलेलं आणि त्या ओघात जागतिक रँकिंगच्या शिखरावर भरारी मारलेली. क्रिकेटमध्ये हजारो कोटी रुपये ओतणाऱ्या पुरस्कर्त्यांना आणखी काय हवं होतं? त्यांनी व थोर देशभक्त अनुराग ठाकूर यांनी भारतीय संघासाठी ऑर्डर दिली छप्पन्न इंच छातीच्या ब्लेझर्सची!
तरीही काही जणांनी सांगून पाहिलं : याआधी ज्यांनी ज्यांनी छप्पन्न इंची छातीच्या जॅकेटची ऑर्डर दिली, तिचं काय झालं ते दिसतंय ना? जेमतेम वर्षभरात ते देशभक्त आता गुपचूप छप्पन्न इंची नव्हे, तर छप्पन्न सेंटिमीटर्स छातीची जॅकेट्स मागवत आहेत. देशभक्त अनुराग ठाकूर यांनी या साऱ्या संशयात्म्यांवर ‘देशद्रोही’ असा शिक्का मारल्यास आश्चर्य वाटू नये! हीच आहे कहाणी वीस षटकांच्या सहाव्या ‘विश्व’चषकाची…
छप्पन इंची ब्लेझर्सवाल्यांसाठी नियतीचा असाच वरदहस्त होता : विराट कोहलीनं खातं उघडताक्षणी विंडीजकडून एकाच चेंडूवर त्याला चक्क दोन जीवदानं लाभली. आणि त्याआधी भारताला हरवण्याकरिता शेवटच्या तीन चेंडूंत अवघ्या दोन (एकेरी!) धावांची गरज असताना, बांगलादेशच्या जमलेल्या जोडीने गॅलरी गेम केला, हाराकिरी केली. आपल्या तोंडाशी आलेला विजयाचा घास धोनीला भरवला. केवढी दैवाची साथ! ड्वेन ब्रावोने मोठ्या चलाखीने हलकेच सोडलेला मंदगती चेंडू, हा कोहलीच्या वाट्यास आलेला तिसराच चेंडू. त्याचा स्वाइप फसलाच. पण कसा कोण जाणं, उघड्या यष्टींचा वेध न घेता, यष्टिरक्षक रामदिनकडे गेला. कोहलीचं स्वत:वरील नियंत्रण सुटलेलं. धाव काढण्यासाठी वेड्यासारखी त्यानं धाव घेतली. कोहली क्रीझबाहेर, पण रामदिनचा अंडरआर्म थ्रो यष्टींच्यावरून ब्रावोकडे गेला. अन् त्यानं फेकलेला चेंडू डाव्या यष्टीच्या अगदी जवळून रामदिनकडे गेला! यष्टी अभेद्यच्या अभेद्य! मग कोहलीची झेप ४७ चेंडूंत नाबाद ८९ वर! त्याआधी बांगलादेशची लढत नजरेसमोर आणा. तो सामना भारताने गमावला असता तर त्यानंतर कांगारूंवरील विजयही निरर्थकच ठरला असता. कारण सरस नेट रन-रेटवर कांगारू भारताला मागेच ठेवणार होते व स्पर्धेबाहेर फेकणार होते. पंड्याने बांगला देशच्या रहिमसाठी गुड लेंग्थऐवजी उजव्या यष्टीबाहेरचा यॉर्कर, भारतीय योजनेनुसार वापरला. दोन चौकारांच्या अपेक्षित थपडा बसल्या. मग रहिम तर चौकार-षटकाराने चमचमीत विजयोत्सवास उन्मादास सज्ज झाला. प्रथम त्याने, मग महमदुल्लाने सीमारेषेवरील क्षेत्ररक्षकांकडे उंच झेल दिले.
सामन्यातील शेवटचा फलंदाज मस्तफिझूर व साथीदार शुगवाना किमान एकेरी धावेसाठी, वेड्यासारखे व पूर्वनियोजित धावणार, ही गोष्ट जगजाहीर होती. त्यांना रोखण्यासाठी यष्टिरक्षकाने जास्तीत जास्त यष्टींजवळ उभं राहायचं व उजव्या हातातील ग्लोव्हज काढायचं, हे डावपेच चावून चोथा झालेले. यष्टिरक्षक धोनीनं तसं केलं, तर त्याला ‘मास्टर-स्ट्रोक’ ठरवणाऱ्यांना हसावं की (रडावं नाही) पण अडाण्यांच्या दुनियेत चूप बसावं, जे ज्याचं त्यानं ठरवावं! आता छप्पन्न सेंटिमीटर्स छातीवाल्यांचा पंचनामा करूया : (१) एकट्या कोहलीखेरीज कुणाचेही अर्धशतक नाही. (२) चार-चार डावांत धवन ५२ चेंडूंत ४३. रैना ३३ चेंडूंत ४१ व युवराज ४२ चेंडूंत ५२, तर रोहित पाच डावांतील ८२ चेंडूंत ८८ : बस्स! (३) क्षेत्रव्यूह फटकेबाजीस अनुकूल असणाऱ्या पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत भारत ४ बाद २९, वि. न्यूझीलंडच्या २ बाद ३३. भारत ३ बाद २३ वि. पाक बिनवाद २४. भारत १ बाद ४२, वि. बांगलादेशच्या १ बाद ४५. भारत २ बाद ३७ वि. ऑस्ट्रेलियाच्या १ बाद ५९. आणि भारत बिनबाद ५५ वि. विंडीजच्या ४४. चार प्रमुख फलंदाज सतत अपेशी, तरी दुराग्रही कर्णधारामुळे संघात कायम. (४) फिरकीस अनुकूल खेळपट्ट्यांवर न्यूझीलंडचे सोधी, सँटनर व मॅकलम अन् विंडीजचा बद्री खूपच प्रभावी. याउलट प्रभावहीन अश्विन व जडेजा या दोघांना मिळून फक्त ९ बळी. तरी ते कायम संघात. हरभजन कायम प्रेक्षकांत.
अशी कहाणी छप्पन सेंटिमीटर्सच्या आणखी काही, अशाच काही जॅकेटची वा ब्लेझरची! हाइप खूप झाली, पण वस्तुस्थिती वेगळीच होती. तीच उजेडात येणार होती व अटळपणे आलीही!