आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Is Rated One Of Worst Place To Live For Woman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाल रेघोट्यांचे प्रगतिपुस्‍तक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

11 जुलै या आंतरराष्ट्रीय लोकसंख्यादिनी सर्वत्र जगाची लोकसंख्या किती हा आकडा झळकत असतो. लोकसंख्येचा 600 कोटींचा आकडा जगाने केव्हाच पार केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरनिराळ्या संस्था (युनिसेफ, युनिफेम, यूएनएफपीए, यूएनडीपी इ.) देशोदेशीची आकडेवारी गोळा करतात. त्याचे सांख्यिकी विश्लेषण करून निरनिराळ्या क्षेत्रांत प्रत्येक राष्ट्राने काय प्रगती केली आहे याची माहिती प्रसिद्ध केली जाते. आकडेवारी जमा करण्यासाठी बहुतेक सर्व राष्ट्रांच्या स्वत:च्या सांख्यिकी संस्था असतातच, पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीतून जगात कोणत्या क्षेत्रात कोणत्या राष्ट्राचे का नामांकन आहे ते कळते. त्या आकड्याच्या अनुषंगाने आपण कुठे आहोत, याचा प्रत्येक राष्ट्र वेध घेत असते. लोकसंख्येमध्ये आपला नंबर चक्क दुसरा! आपल्या पुढे फक्त चीन! आपण आजमितीस 122 कोटी 2 लाख इतके आहोत. चीन आहे 135 कोटी 44 हजार 605. पण चीनची जमीन आहे आपल्या तिप्पट, म्हणजे 95 लाख 98 हजार 86 चौरस किलोमीटर. भारताची जमीन आहे फक्त 32 लाख 87 हजार 590 चौरस किलोमीटर. मात्र चीनची लोकसंख्या भारतापेक्षा फक्त 13-14 कोटींनी जास्त आहे. याचा अर्थ असा की लोकसंख्या आणि उपलब्ध जमीन या गुणोत्तरात भारतच पहिल्या क्रमांकावर येईल. आता भारत आणखी कशाकशात पहिला क्रमांक पटकावतो ते पाहू.
जून 2012 मध्ये जी 20 राष्ट्रांची परिषद झाली, त्यानंतर जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार भारत स्त्रियांसाठी सर्वात कष्टप्रद व सर्वात त्रासदायक राष्ट्र आहे. या बाबतीत आपल्यापुढे फक्त सौदी अरेबिया आहे. (तेथे स्त्रियांना वाहन चालवायलासुद्धा परवानगी नाही.) तेव्हा भारत स्त्रियांसाठी फार कष्टप्रद देश आहे हे आम्हाला लगेच पटले. हुंडाबळी, स्त्रीगर्भ हत्या, लैंगिक अत्याचार, रोजगार व वेतनातील असमानता, पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य सेवा, स्वच्छतागृहे, शिक्षण व आरोग्य, कायद्यांची अंमलबजावणी... एक ना दोन! स्त्रीचे जिणे अवघड आहे हे कळायला आकडेवारी कशाला पाहिजे? ती पाहिजेच. कारण त्यायोगेच स्त्री सक्षमीकरणाबाबत आपण शेवटून दुस-या क्रमांकावर आहोत हे कळले. पण आम्ही शक्य त्या सर्वच क्षेत्रांत अधिकृत आकड्यांनिशी भारताचे प्रगतिपुस्तक बघायचे ठरवलेच होते. लिंगविषमता निर्देशांकानुसार सर्व दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचा लिंगविषमता निर्देशांक सर्वात उच्च आहे 0.601, तर चीनचा आहे 0.2. म्हणजेच भारतामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत सर्व आघाड्यांवर पराकोटीची विषमता सहन करावी लागते, तर चीनमध्ये या विषमतेचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. म्हणजे इथेही आपला क्रमांक शेवटचा! माता मृत्यू दर भारतात सर्वात जास्त म्हणजे 19 टक्के! नायजेरिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे अविकसित देश आहेत. पण त्यांचा माता मृत्यू दरसुद्धा आपल्यापेक्षा कमी आहे. जगात दरवर्षी सुमारे 1 कोटी स्त्रिया गर्भारपण व प्रसूतिकाळात मृत्युमुखी पडतात. त्यातही सुमारे 20 लाख 10 हजार भारतातल्या असतात. शिवाय स्त्रीगर्भहत्येपोटी जन्मालाच न येणा-या स्त्रियांचे प्रमाण भयावह आहे. हुंड्यापोटी जळणा-या स्त्रिया हे तर खास भारतीय भीषण वास्तव आहे. (2010 मध्ये भारतात सुमारे सव्वा लाख स्त्रिया जळून मेल्या.) ही सगळी दु:खद आकडेवारी सा-या जगाला अस्वस्थ करणारी आहे. पण भारतात स्त्रियांमध्ये काम करणा-या संघटना सोडल्या तर कोणीही त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. (म्हणजे राज्य सरकारे, केंद्र सरकार, राजकीय पक्ष, शासकीय यंत्रणा, न्याययंत्रणा, पोलिस यंत्रणा वगैरे वगैरे.) तेव्हा जरा खेळ वगैरेसारख्या आल्हाददायक विषयांकडे वळायचे ठरवले, तर तेथेही निराशाच पदरी पडली.
भारत हा जगात सर्वात तरुण देश आहे. येथील 50 टक्के लोक 25 वर्षांच्या आतील आहेत. ही एक आशादायी वस्तुस्थिती असूनही जगातील सर्वात जास्त निरक्षर भारतात आहेत. याआधी आपण लिंगविषमता निर्देशांक पाहिला. त्याच्या बरोबर उलटा असा जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स (लिंगसमानता विकास निर्देशांक) असतो. त्यानुसार 1 म्हणजे आदर्श स्थिती मानली जाते. स्वीडन, नॉर्वे, कॅनडा यासारख्या देशात तो 0.9 किंवा 0. 8 आहे, तर भारताचा तो निर्देशांक 0. 4 पेक्षाही खाली आहे. चीनचा 0.7 आहे.
एकंदरीत आमच्या लक्षात आले की भारताचे प्रगतिपुस्तक लाल रेघोट्यांनी भरले आहे. ज्या राष्ट्राचा स्त्रीविकासाचा निर्देशांक खालावलेला ते राष्ट्र भौतिक प्रगतीत कितीही पुढे गेले तरी मानव संसाधन विकासात मागेच राहते. शिक्षण, पायाभूत सोयी, जलव्यवस्थापन, सिंचन, सार्वजनिक आरोग्य सुविधा, साक्षरता, राहणीमान आणि एकंदरीत वैयक्तिक/सामाजिक जीवनाची गुणवत्ता (यालाच ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवी विकास निर्देशांक असे म्हणतात. भारताचा तो 0.549 आहे.) याचाच अर्थ असा की याही बाबतीत भारत जेमतेम काठावर पास किंवा नापासच आहे.
आपल्याकडे काय कमी आहे? बुद्धी नक्कीच कमी नाही. जागतिक बुद्धिबळ खेळात भारत पहिल्या सातात आहे. भारत ही बुद्धिबळाची राजधानी होऊ घातली आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र यांच्या ऑलिम्पियाड्समध्ये भारतीय मुलांची कामगिरी पहिल्या अव्वल पाचात असते. भारतीय महानगरांमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया भारतीय डॉक्टर्स सातत्याने करत असतात. भारतातील चित्रपटसृष्टी एवढी अवाढव्य आहे की जगभरच्या सिनेव्यावसायिकांना तिची दखल घ्यावीच लागते. जगातील उत्तमोत्तम विद्यापीठांत शिक्षण घेणा-या परदेशी विद्यार्थ्यांत सर्वात जास्त संख्या भारतीय विद्यार्थ्यांची असते. तिथेही ते चमकत असतात. गॉड पार्टिकलच्या महाप्रचंड प्रयोगात भारतीय वैज्ञानिकांची संख्या वाखाणण्याजोगी आहे. भारत सुजलाम् सुफलाम् आहे. भारताकडे विपुल नैसर्गिक संपत्ती आहे. शीत कटिबंधातील सफरचंद, लिची, चेरीपासून उष्ण कटिबंधातील आंबे, फणस व मसाल्यांचे पदार्थ पिकवता येतात इतके नैसर्गिक वैविध्य भारतभूमीत आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात आपण स्वावलंबी झालो आहोत. तरी पण भारतीय शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो आहे. भारताचा विकास दर अगदी दोन आकड्यांवर पोहोचला तरी सर्वाधिक दरिद्री लोक भारतात आहेत. आज गरज आहे आकाशात झेप घेतानाच जमिनीवरील माणसांच्या गरजांकडे बघण्याची. विषमतेला चटावलेल्या मानसिकतेला समानतेची कडू गोळी देण्याची. त्यासाठी आवश्यक आहे राजकीय इच्छाशक्ती, सामाजिक न्यायबुद्धी, विकासाचा सम्यक दृष्टिकोन आणि स्वार्थनिरपेक्ष कार्यसंस्कृती. तरच ‘विरोधाभासांनी भरलेला देश’ ही आपली ओळख आपण पुसून टाकू शकू आणि प्रगतिपुस्तकावरील लाल रेघा कमी होतील.