आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुजबुज : कसोटी क्षमता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसोटी क्षमता - नेहमीच दबावाखाली वावरताना दिसणारे पंतप्रधान प्रथमच कणखर झाल्याचे वाटू लागले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. आधी सीनियर पवारांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता वाहिल्या. त्यामुळे पवार साहेबांना ‘बॅकफूट’वर जाऊन खेळावे लागले. त्यानंतर ताबडतोब अण्णांचा नंबर लागला. सुरुवातीला तेही जोशात आले ‘बॅटिंग’ करायला. त्यांनी स्वत: मैदानावर येण्याआधी रन घेण्यासाठी केजरीवाल यांना रनर म्हणून पाठवले. पण अण्णांनी बॅट फिरवल्याशिवाय रनर केजरीवाल तरी काय करणार? परंतु या वेळस यूपीए सरकारही तटस्थ अंपायरच्या भूमिकेत होते. पाहिजे तेवढे खेळा, परंतु रन होऊ दिला नाही. याला टेस्ट मॅचचे रूप आले. मॅच ड्रॉ होणार असे चित्र स्पष्ट दिसू लागले. पण अण्णांची अडचण झाली ती धावाही होईनात व क्रीजही सोडता येईना. एकाच वेळी अण्णा व पवारांची ही अवस्था झाल्याने दोघांचेही ग्रहच काय, पत्रिकासुद्धा सारख्या आहेत की काय, अशी शंका सर्वसामान्य जनतेला येऊ लागली आहे.
समाजकंटकावर महागाईचे संकट - देशाचे गृहमंत्री बदलले आणि पुण्यात चार ठिकाणी कमी क्षमतेचे स्फोट झाले. सारा देश या घटनेमुळे पुन्हा हादरला. तर्कवितर्क, चर्चा, हाय अलर्टला उधाण आले. चर्चेच्या फे-या झडल्या, विचारवंतांना पुन्हा मेंदूला चालना देण्याचे काम मिळाले. सामान्य नागरिक पुन्हा एकदा असुरक्षित असल्याची जाणीव झाली. जमेची बाजू म्हणजे कमी शक्तिशाली स्फोट झाले. कित्येकांना शंका आली, हा महागाईचा तर परिणाम नव्हे! कारण स्फोटकांचा वापर कमी झाला, म्हणजे तीही महागली की काय? दुसरे म्हणजे सीमेपलीकडून अतिरेकी आल्याचा पुरावा नाही. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन महागल्याचा हा परिणाम तर नाही ना? तिसरे म्हणजे स्फोटासाठी सायकलचा वापर झाला. त्यामध्ये पेट्रोल, डिझेलसारखे ज्वलनशील पदार्थ नसल्यामुळे हानी कमी झाली. दहशतवाद्यांची ही जर्जर अवस्था महागाईमुळेच झाली असेल तर यूपीए सरकारचा जयजयकार करण्यावाचून गत्यंतर नाही, असे सामान्य जनतेला एव्हाना जाणवलेच असेल. आणखी थोडी महागाई वाढवली तर कदाचित दहशतवादी हल्ले संपुष्टात येतील, अशी आशा करायला हरकत नाही. सामान्य माणसाचे कंबरडे नेहमीच मोडते, पण समाजकंटकाचेही कंबरडे मोडले असल्यास यूपीए सरकारच्या दूरदृष्टीची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे!
फ्रायडे ब्लॉकब्लस्टर - तीन ऑगस्टचा शुक्रवार हा दोन अर्थांनी ब्लॉकब्लस्टर ठरला. अण्णांनी राजकारण प्रवेशाची केलेली घोषणा...त्याने तमाम भ्रष्टचा-यांना सुखद धक्का दिला. अचानक आंदोलनाची दिशा बदलली. दुसरीकडे पोर्नस्टार सनी लिओनचा जिस्म-2 प्रदर्शित झाला. अभूतपूर्व गर्दी खेचत पहिल्याच दिवशी पाच कोटींचा गल्ला जमवला. तिकडे जंतरमंतरवरची गर्दी अदृश्य झाली. राजकारण म्हणजे चिखलफेक असेच समजले जाते. म्हणजे अण्णांनी स्वच्छ कपडे घालून चिखलफेकीला तयार व्हायचे असे ठरवले आहे की काय, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे अण्णा खरे हीरो झाले, पण त्यांनी राजकारण प्रवेशाचा निर्णय घेऊन उलटा प्रवास का सुरू केला, त्यांचे त्यांनाच ठाऊक! दुसरीकडे पोर्नस्टार हा कलंक धुऊन काढण्यासाठी चिखलातून बॉलीवूडमधील वळलेली सनी ही स्वच्छ कपडे घालून सुपरस्टार होण्यासाठी सज्ज झाली आहे. अण्णांसारखे सुपरस्टार चिखल उडवून घेण्यास सज्ज झाले आहेत तर त्याच्या विरुद्ध दिशेने सनीचा प्रवास सुरू झालाय! या दोन्ही घटना एकाच दिवशी घडणे म्हणजे योगायोग की जंतरमंतर!