आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळता येईना, मैदान वाकडे...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2011च्या विश्वविजेतेपदाच्या गैरसमजुतीच्या आणि उन्मादाच्या लाटेवर स्वार झालेले क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेटरसिक यांच्या भ्रमाचा भोपळा ऑस्ट्रेलियात फुटला. इंग्लंड दौ-याने भारतीय क्रिकेटपटूंच्या मर्यादेचे संकेत दिले होते. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांच्या त्या मर्यादांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. कागदावर ‘नंबर वन’ झाल्यामुळे जनमानसात किंवा क्रिकेटविश्वात भारतीयांची जगज्जेते असल्याची प्रतिमा नव्हती. अव्वल क्रमांकावरचा ऑस्ट्रेलियन संघ जडणघडणीच्या प्रक्रियेतून चालला असताना खाली आला आणि त्यानंतरच्या चार देशांनी पुढे सरकायला सुरुवात केली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन 3-1 असे हरवले. ते निर्विवाद वर्चस्व होते. भारतीय संघाला मात्र पहिल्या क्रमांकावर असूनही गतवर्षी कोणतीही मालिका निर्विवादपणे जिंकता आली नव्हती. वर्षानुवर्षे भारतीय संघाच्या बाबतीत असेच चालले आहे. देशात संथ आणि फिरकी गोलंदाजीच्या आखाड्यात आपण ‘शेर’ असतो. परदेशात किंचित वेगवान, चेंडूला उसळी देणा-या खेळपट्ट्यांवर आपण ‘ढेर’ होतो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकाच नव्हे तर झिम्बाम्बेसारख्या दुबळ्या संघाकडूनही आपण परदेशात मार खाल्लेला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय क्रिकेटमध्ये नव्या विचारसरणीची गरज आहे. स्पोर्टिंग खेळपट्टी हा केवळ शब्द आपण उच्चारतो. प्रत्यक्षात तशा खेळपट्ट्या कुणी कधीही करीत नाही. तसा प्रयत्न कुणी केला की सर्वप्रथम भारतीय संघातील सीनियर खेळाडू तशी खेळपट्टी बनवणा-या क्युरेटरची हजामपट्टी करतात. खेळपट्टीवर किंचित गवत ठेवले, खेळपट्टीवर चेंडू वाजवीपेक्षा अधिक उडाला तर भारतीय खेळाडूंचे डोळे मोठे होतात. त्या क्युरेटरविरुद्ध तक्रारी केल्या जातात. खेळाडूंची जशी मानसिकता तशीच आपल्या क्रिकेट बोर्डाचीही आहे. भारतात होणा-या मालिकेच्या वेळी सर्व केंद्रांना संथ, कोरड्या, फिरक्या, चेंडू कमी उसळेल अशा खेळपट्ट्या तयार करण्याचे आदेश दिले जातात. त्या आदेशाचे पालन करण्यात येत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी माणसे नियुक्त केली जातात. शेवटी सर्वांना हवी तशी खेळपट्टी केली जाते, भारतीय संघ जिंकतो, भारतीय क्रिकेटची खोटी प्रतिमा निर्माण होते. ही मानसिकता बदलण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पोर्टिंग खेळपट्ट्या तयार करण्याचे मनावर घेतले पाहिजे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर चेंडू पहिल्या दिवशी वळला नाही म्हणून आर. आश्विनने ‘‘आमची फसवणूक केली’’ असे विधान पत्रकार परिषदेत केले होते. धोनीनेही ज्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून चेंडू वळत नाही, अशी खेळपट्टी काय कामाची, असा सवाल त्या वेळी उपस्थित केला होता. खेळपट्टीप्रमाणेच भारतीयांच्या मुळावर आयपीएल आणि एकदिवसीय क्रिकेटही आले आहे. आयपीएलने भारतीय क्रिकेटपटूंना प्रचंड पैसा दिला. मात्र उदयोन्मुख भारतीय खेळाडूंचे भवितव्यही या क्रिकेटने हिरावून नेले आहे. आजच्या नव्या भारतीय पिढीला तीन दिवसांचे, पाच दिवसांचे क्रिकेट सामने खेळणे कठीण होऊन बसले आहे. 20 षटकांच्या क्रिकेटमुळे नवी पिढी ‘शॉर्ट आणि स्वीट’ क्रिकेटमध्ये ‘एक्स्पर्ट’ झाली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी पॅचेसमध्ये चांगली होती. कसोटी क्रिकेट अशा पॅचेसच्या कामगिरीवर खेळता येत नाही. क्रिकेटपटूंच्या विश्रांतीचा, शारीरिक आणि मानसिक झीज भरून काढण्यासाठीचा जो कालखंड राखून ठेवण्यात आलेला असतो, त्याच कालखंडात आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोंबली आहे. त्यामुळे खेळाडूंची दमछाक झाली आहे. आयपीएलइतकाच खेळाडूंच्या वाढत्या वयाचा विचारही केला गेला पाहिजे. दुर्दैवाने आपल्या देशात एखाद्याला देवत्व दिले की सर्व जण आंधळ्यासारखे त्याच्या चरणी नतमस्तक होत असतात. क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट रसिकही असेच भारताच्या सीनियर खेळाडूंपुढे नतमस्तक झाले आहेत. सचिन तेंडुलकरला निवृत्त हो म्हणून सांगण्याची हिंमत कुणातही नाही. एकदिवसीय क्रिकेटपासून दूर जात असलेला ‘सचिन आला रे आला’ अशा बातम्या छापून सीनियर खेळाडूंच्या उणिवा पाठीशी घालणारी प्रसिद्धिमाध्यमेही या अपयशाला तेवढीच जबाबदार आहेत. दिलीप वेंगसरकर यांनी वाढत्या वयाच्या राहुल द्रविड, लक्ष्मण, गांगुली यांना अर्धचंद्र देऊन नव्या रक्ताला वाव देण्यास सुरुवात केली होती. परंतु वेंगसरकर निवड समितीवरून जाताच क्षणी सीनियर खेळाडूंची कारकीर्द लांबली. शंभरावर कसोटी खेळल्यानंतर हे खेळाडू तंत्र, अनुभव, परिपक्वता याच्या बळावर 3-4 डावात एकदा तरी मोठी धावसंख्या उभारणारच. मात्र त्यांच्या भारतातील संथ खेळपट्ट्यांवरील अशा कामगिरीमुळे नवोदितांसाठी भारतीय संघाचे दरवाजे कधी उघडलेच नाहीत. सध्याच्या निवड समितीलाही दूरदृष्टी नाही. जगमोहन दालमिया यांनी निर्माण केलेली ‘टॅलंट रिसर्च डेव्हलपमेंट ऑफिसर’ ही संकल्पनाच नंतरच्या अध्यक्षांनी बासनात गुंडाळली. त्या योजनेमुळे धोनी, विराट कोहली, ईशांत शर्मा, पार्थिव पटेल यांच्यासारखी लपलेली गुणवत्ता झपाट्याने पुढे आली होती. आज तळागाळातील, दुर्गम भागातील गुणवत्ता शोधण्यासाठी बोर्डाकडे योजनाच नाही. बोर्डाने तयार केलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीवर खर्च प्रचंड होत आहे. मात्र त्यातून देशासाठी खेळलेला एकही क्रिकेटपटू मिळाला नाही हे कटू सत्य आहे. सचिन, द्रविड, लक्ष्मण यांच्याआधीच धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा करू शकतो. भारताचे दिग्गज खेळाडू मात्र त्यांची हकालपट्टी होईपर्यंत खेळत राहण्याची चिकाटी दाखवू शकतात. याबाबत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्टची कृती या खेळाडूंनी अनुकरण्याजोगी होती. ऑस्ट्रेलियात इंग्लंडविरुद्ध मालिकेत गिलख्रिस्टच्या हातून एक झेल सुटला. आपले द्रविड, धोनी, लक्ष्मण, असे कितीतरी झेल सोडतात. पण गिलख्रिस्टला तो झेल सुटताच क्षणी आपली नजर कमी होत असल्याची जाणीव झाली. त्याच सायंकाळी, खेळ संपल्याबरोबर गिलख्रिस्टने निवृत्तीची घोषणा केली. भारतीय क्रिकेटपटूंची स्वत:चे मूल्यमापन करण्याची क्षमता नाही. त्यांची तशी इच्छाही नाही. भारतीय क्रिकेट रसिकांपेक्षाही जाहिराती आणि जाहिरातदार यांच्यासाठी खेळणा-यांची मानसिकता गिलख्रिस्टच्या मानसिकतेशी जुळू शकत नाही. सुनील गावसकर यांनीही सीनियर खेळाडूंना निवृत्तीचा आता सल्ला दिला आहे. मात्र भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कृपाछत्राखाली याआधी असलेल्या सुनील गावसकरांना त्या वेळी हा कंठ का फुटला नव्हता, असा सवाल सर्व जण करीत आहेत. भारतीय क्रिकेट अव्वलस्थानी खरोखरच असावे यासाठी आयपीएल आणि एकदिवसीय क्रिकेटचा अतिरेक थांबला पाहिजे. निवड समितीने सीनियर खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याची धमक दाखवणे गरजेचे आहे. भारतीय क्रिकेटचा ‘ढाचा’ बदलण्याची गरज आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाबरोबर दारुण पराभव झाल्यामुळे नाही, तर भविष्यात अन्य दुबळ्या संघांनीही हरवू नये यासाठी भारतीय क्रिकेटला काही बदल करावेच लागतील.