आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय कर्मचा-यांची कार्यक्षमता जास्त!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कर्मचारी त्यांच्या कामाच्या तासांच्या व्यतिरिक्त म्हणजेच अधिक तास काम करत असून त्यासाठी मोबाइल, संगणक यासारख्या उपकरणांचा वापर हे कर्मचारी करतात, असे आढळून आले आहे.‘केली सर्व्हिसेस’ या जागतिक स्तरावर उमेदवारांची निवड करण्याचे काम करणा-या कंपनीतर्फे करण्यात आलेल्या एका व्यापक सर्वेक्षणात भारतीय कर्मचारी, त्यांचे कामकाज व मुख्य म्हणजे कामाचे तास या संदर्भात पुढील मुद्दे प्रामुख्याने आढळून आले आहेत.
* भारतातील 55% कर्मचारी आठवड्याला सुमारे 5 तास अधिक काम करतात.
* 16% कर्मचारी 6 ते 10 तास, तर 18% कर्मचारी दर आठवड्यात सुमारे 10 तास अतिरिक्त काम करत असतात.
* सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वाधिक म्हणजे 61% कर्मचा-यांच्या मते, मोबाइल व संगणक यासारख्या विकसित तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा होत असून या उपकरणांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामकाजावर झाला आहे.
* तर 35% टक्के कर्मचा-यांनी असेही नमूद केले आहे की, विकसित तंत्रज्ञान वा मोबाइलमुळे त्यांच्या कामाच्या संदर्भातील ताणतणाव वाढला आहे.


सर्वेक्षणानुसार भारतीय आणि भारतीय कंपन्यांच्या संदर्भात अतिरिक्त काम, काम करण्याचे सर्वाधिक प्रमाण आणि टक्केवारी मध्यम व उच्चस्तरीय अधिकारी, व्यवस्थापकांमध्ये असून या कर्मचा-यांच्या कामकाज आणि उत्पादकतेवरच संबंधित कंपनी वा कार्यालयाचे यशापयश ख-या अर्थाने अवलंबून असते. याशिवाय या मंडळींची भूमिका, निर्णय क्षमता फार महत्त्वाची असल्याने त्यांना गरज म्हणून पण अतिरिक्त काम करावे लागणे अपरिहार्य ठरते. वाढत्या कामाच्या तासांच्या संदर्भात मोबाइल, ई-मेल, संगणक यासारख्या संवाद उपकरणांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असून त्याचे साधकबाधक परिणाम पण या निमित्ताने स्पष्ट झाले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश म्हणजेच 61% कर्मचा-यांना तंत्रज्ञानाद्वारा विकसित व सुसज्ज झालेली उपकरणे त्यांच्या कामाला पूरक व उत्पादक वाटत असली तरी 35% कर्मचा-यांनी मात्र स्पष्टपणे असे नमूद केले आहे की, मोबाइल, ई-मेलसारख्या उपकरणांमुळे त्यांना कामाच्या वाढत्या तासांबरोबरच वाढत्या ताणतणावाचा पण सामना करावा लागतो, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.


अशाच प्रकारच्या जागतिक संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, जागतिक संदर्भात 27% कर्मचारी कामाच्या तासांव्यतिरिक्त काम करताना तणाव अनुभवतात. आशियाई देशांमधील कर्मचा-यांची अशा प्रकारे अतिरिक्त कामाच्या तासांमुळे होणा-या ताणतणावाच्या संदर्भात अशीच भावना असून या कर्मचा-यांची टक्केवारी 35% आहे. भारतातील कर्मचा-यांशिवाय हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया इ. देशांमध्ये काम करणा-या सुमारे 40% कर्मचा-यांनी त्यांच्या कामाच्या तासांच्या संदर्भात अशी प्रांजळ कबुली दिली आहे की, कामाचे अतिरिक्त तास हे त्यांच्या वाढत्या कामाचाच भाग आहे. त्यांच्या कामासाठी आवश्यक अशा जबाबदारीचाच हा भाग झाला असून त्या संदर्भात त्यांची तक्रार नाही. सुमारे 28% कर्मचा-यांनी आपल्या मतांद्वारे वरील मुद्द्यांची पुष्टी केली असून त्याखालोखाल म्हणजेच 25% कर्मचा-यांनी त्यांना कामाच्या तासांशिवाय अतिरिक्त काम करण्याचे कारण त्यांचे वरिष्ठ, त्यांच्या सूचना, नियोजन व कार्यशैली असल्याचे मोकळेपणे मान्य केले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळजवळ निम्म्या म्हणजेच 49% कर्मचा-यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कार्यालयात वा कामाच्या ठिकाणी अतिरिक्त काम करण्याला घरून काम करून महत्त्वाच्या कामाची निर्धारित वेळेत पूर्तता करणे हा एक चांगला, व्यवहार्य व सहजगत्या करण्याजोगा पर्याय असण्याचा जोरदार पुरस्कार केला आहे. यापैकी अनेकांनी तर घरून काम करण्याला आपली संपूर्ण व मन:पूर्वक तयारी असल्याचे नमूद केले असून त्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे, हे विशेष.
या बाबीची पूर्ण कल्पना असल्याने विविध व्यवस्थापन-कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांनी व्यावसायिक गरज व संबंधित कर्मचा-यांची सोय यांची व्यावहारिक सांगड घालत आपल्या कर्मचा-यांसाठी ‘लवचीक कामाचे तास’ या धोरणाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू केली आहे. सद्य:स्थितीत व्यवस्थापक आणि व्यवस्थापनांच्या मतेही संगणकावर आधारित प्रगत अशा संवाद माध्यम आणि उपकरणांमुळे कामाच्या ठिकाणी कर्मचा-याची प्रत्यक्ष उपस्थिती पूर्वीसारखी गरजेची नसून कर्मचा-यांच्या उत्पादक व परिणामकारक कामावरच या मंडळींचा मुख्य भर राहिला आहे. या कामी अर्थातच आयटी व इतर व्यावसायिक कंपन्यांनी पुढाकार घेतला असून या लवचीक व व्यावहारिक धोरणाचा फायदा कर्मचारी आणि कंपन्या या उभयतांना होत असतो.