आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतविरोधी दहशतवाद्यांना पाकिस्तानात सर्व गुन्हे माफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचा विचार करताना लष्कर, दहशतवादी आणि नागरिक या तीन स्तरांवर करता येईल. लष्कराच्या प्रभावाखाली सरकार काम करते. भारताचा विरोध करणारी प्रत्येक व्यक्ती-संघटना पाकिस्तानी लष्करासाठी महत्त्वाची आहे. मग तो सैनिकी शाळेत शेकडो विद्यार्थ्यांचा बळी घेणारा तालिबान का असेना. लष्कराच्या मते चांगले आणि वाईट काय, याबाबत कधीही स्पष्टपणे बोलले जात नाही. लष्कराने पाकिस्तानात हा लेख प्रकाशित होऊच दिला नाही. 

भारताच्या विरोधात कधीही न संपणाऱ्या युद्धात पाकिस्तानने एक नवा मित्र उभा केला आहे. पाकिस्तानमधील सर्वात क्रूर खुन्यांपैकी हा एक  सर्वज्ञात चेहरा. अनेक वर्षे तो लियाकत अली नावाने ओळखला जात असे. आता तो एहसानुल्लाह एहसान झाला आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये तो अत्यंत पाशवी चेहरा म्हणून प्रसिद्ध आहे. पाकिस्तानी तालिबान किंवा तहरीक-ए-तालिबान (टीटीपी)च्या प्रत्येक क्रूर कृत्यानंतर त्याचा ध्वनिसंदेश किंवा अत्यंत घृणास्पद व्हिडिओ, माध्यमांमध्ये प्रसारित होतो. चॅनल्सवरही तो ईश्वराची भीती दाखवणे सोडत नाही. आपल्या अमानुष कृत्यांसाठी तो सामान्य नागरिकांना जबाबदार ठरवतो. 

जानेवारी २०१४ मध्ये टीटीपीने एक्स्प्रेस टीव्हीतील तीन कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर चॅनलने एहसानला बोलण्यासाठी निमंत्रण पाठवले. टेलिफोनवर त्याची मुलाखत झाली. तेव्हा त्याने या हत्यांचे कारण सांगितले. तुम्हाला बोलण्यासाठी भरपूर वेळ दिला जाईल, अशी विनंती या वाहिनीवरील निवेदक वारंवार करत होता. जणू काही यापुढे असे हल्ले पुन्हा होऊ नयेत, यासाठी चॅनल विनवण्या करू लागले. 

गेल्या वर्षी लाहोरच्या एका उद्यानातील ईस्टर प्रसंगी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डझनभर नागरिक मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी एहसानने घेतली. त्यानेच मलालावर हल्ल्याची जबाबदारी घेऊन म्हटले होते की, जिवंत राहिली तर पुन्हा शोधून तिला ठार मारले जाईल.  

एहसानची एवढी दहशत असतानाही पाकिस्तानी  लष्कराची भूमिका अशी होती की, तू हजारो पाकिस्तानी नागरिकांचे प्राण घेऊ शकतोस. पण आमच्याप्रमाणेच तूदेखील भारताचा प्रचंड द्वेष करतोस, हे तुला सिद्ध करावे लागेल. तरच तुझे सर्व गुन्हे माफ होतील.  

पेशावरमधील सैनिकी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी दहशतीविरोधात तीव्र आंदोलन केले तेव्हा सरकारी माध्यम नियामकांनी एहसानच्या एका दीर्घ मुलाखतीचा वेळ कमी केला. २०१४ मध्ये याच शाळेवर झालेल्या हल्ल्यात १४० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. एहसानला शाळेसमोर फासावर लटकवा, अशी या पालकांची मागणी होती. पण पाकिस्तानी लष्कराला एहसानबाबत सहानुभूती होती. सरकारने टीव्ही वाहिन्यांवर एहसानचा हसरा चेहरा दाखवण्याची परवानगी दिली होती. तो वृत्त वाहिन्यांचा फीचर कंटेंट बनला होता. त्याच्या साथीदारांची असंख्य कृत्ये वाहिन्यांवर दाखवली गेली. तालिबानी योद्धे कशा प्रकारे तीन-तीन बायका ठेवतात, टीटीपी नेत्याने आपल्या शिक्षकाच्या मुलीचे केलेले अपहरण हे सर्व प्रसारित झाले. 
ही सर्व दृश्ये हेतुपूर्वक दर्शवण्यात आल्याचे वाटते. तालिबानचा चेहरा भीतिदायक नाही, मात्र त्याची स्वत:ची विचारसरणी आहे, पाकिस्तानी समाजाशी खोलवर त्याची नाळ जुळलेली आहे, हे बिंबवण्याचा तो प्रयत्न होता. या वेळी भारत हा कायमच पाकिस्तानचा शत्रू राहिलेला आहे, हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला. पाकिस्तानमध्ये हल्ले करणाऱ्या समूहांना भारताकडून आर्थिक मदत केली जाते, याचे पुरावेही दाखवण्यात आले. मात्र पाकिस्तानी नागरिकांना भारताविरोधी प्रचार करणाऱ्या, विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोरांची नावे हवी आहेत.  

तालिबानच्या अस्तित्वावरून पाकिस्तानी समाज दोन गटांत विभागला गेला आहे. एका गटाला तालिबान अत्यंत क्रूर असून आपल्या कुकृत्यांद्वारे तो पाकिस्तानमधील लोकशाही आणि नागरिकांना बाधा पोहोचवत आहे. तर दुसरा गट तालिबानला ‘वाट चुकलेला भाऊ’ मानतो. आपण पाकिस्तानी समाजाचाच एक भाग आहोत, असे दर्शवणारे काही पाकिस्तानी तालिबान्यांना शूरवीर म्हणत त्यांचा अभिमान बाळगतात. मात्र पाकिस्तानातच हे ‘शौर्य’ दाखवले जाते, तेव्हा हा गट माघार घेतो.  

आज भारताविरोधातील युद्धात तालिबान हा  पाकिस्तानसोबत बरोबरीने उभा आहे. २००८ मध्ये मुंबई हल्ल्यावरून भारत-पाकिस्तान जेव्हा आणखी एका युद्धासाठी तयार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा तालिबानी नेते पाकिस्तानी सैनिकांसोबत युद्धासाठी सज्ज होते. त्या वेळी पाकिस्तानी तालिबानचे प्रवक्ते मौलवी उमर म्हणाले होते की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी नागरिकांच्या सुख-दु:खात आम्ही सहभागी असू. आपापसातले शत्रुत्व विसरून आम्ही पाकिस्तानी लष्करासोबत लढू. तालिबान पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करेल. 
आज हा देश पुन्हा एकदा हे अधोरेखित करू पाहत आहे की काल नरसंहार करणाऱ्याला आज देशभक्त मानले जाऊ शकते. डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रात मागील वर्षी प्रकाशित झालेल्या एका दीर्घ अहवालात लिहिले होते की, पाकिस्तानातील नागरिक आणि लष्करी नेतृत्व भारतविरोधी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या मुद्द्यावरून विभागले गेले आहेत. या संघटनांवर नेहमीच भारतावर हल्ले केल्याचा आरोप केला जातो. 

पाकिस्तानी लष्कराने या अहवालावर तीव्र आक्षेप नोंदवत हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो, असे म्हटले. तसेच ही माहिती लीक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर माध्यम आणि लष्कर विभागात  उच्चस्तरीय चौकशी केली गेली. त्याला ‘डॉन लीक्स’ म्हटले गेले. याप्रकरणी नवाझ शरीफ यांनी नुकतेच दोन नजीकच्या सहकाऱ्यांना पदावरून हटवण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यावर लष्कराच्या प्रवक्त्यांनी ट्विट केले- ही अधिसूचना रद्द केली जात आहे. चांगला-वाईट दहशतवादी किंवा चांगला-वाईट पाकिस्तानी याबाबत लष्कर नागरिकांशी चर्चा करणार नाही. अनेक पाकिस्तानी नागरिकांचे आजही लष्करावर प्रेम आहे, तर काही नेत्यांमध्ये लष्कराबाबत भीती आहे.  अनेक राजकीय पक्षांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना  सल्ला दिला आहे की, त्यांनी एकदा हिंमत दाखवत बंद खोलीत लष्कराच्या चांगल्या-वाईट विचारधारेच्या संकल्पनेबाबत सविस्तर चर्चा करावी.  

- प्रत्येक देशाकडे स्वत:चे लष्कर असते. मात्र पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे. पाकिस्तानी नेत्यांना आपला देश लष्कराकडून आपल्या ताब्यात घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी अशा प्रकारे केवळ लष्कराला खुश करण्यासाठी परस्परांना देशद्रोही ठरवण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत. 

- मोहंमद हनीफ, ब्रिटिश-पाकिस्तानी लेखक 
बातम्या आणखी आहेत...