आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुज्ञ लोकशाहीचा कौल (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेक्झिटचा निर्णय, दहशतवादी हल्ले, राष्ट्रवादाच्या नावाने सुरू असलेला उजव्यांचा धिंगाणा, स्थलांतरितांचा वाढता वेग व बेरोजगारीचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांमुळे युरोप सर्वच पातळ्यांवर अस्वस्थ आहे. ब्रिटनने निर्वासितांचे पुनर्वसन व ढासळत्या अर्थव्यवस्थेचे कारण पुढे करत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता खरा; पण अनेक राजकीय व आर्थिक प्रश्नांपायी ब्रिटनच्या संसदेला देशातील राजकीय वातावरण अनुकूल हवे आहे म्हणून त्यांनी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर फ्रान्समधील नवा अध्यक्ष कोणत्या विचारसरणीचा आहे याला फार महत्त्व आले होते. 

फ्रान्सला स्वत: युरोपियन युनियनची एकसंघता हवी आहे. त्यांना ट्रम्प यांच्या अमेरिकेपासून दूर राहायचे आहे. ब्रिटनमध्ये जो स्वदेशीवाद बोकाळत चालला आहे त्याची पडछायाही त्यांना नको आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षांत काही भीषण दहशतवादी हल्ले होऊन फ्रान्समध्ये कट्टर राष्ट्रवाद रुजवण्याचे प्रयत्न जोरकसपणे सुरू होते; पण सामान्य जनतेला दुभंगलेपण नकोसे आहे. हे सगळे सामाजिक अंतर्विरोध निर्वाचित अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हेरले आणि फ्रान्सच्या गावागावात जाऊन राजकीय वातावरण ढवळून काढले. गेल्या वर्षापर्यंत मॅक्रॉन हे सध्याच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते; पण अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांची  मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली होती. याचा पुरेपूर राजकीय फायदा घेत मॅक्रॉन यांनी स्वत:ची ‘आँ मार्च’ ही डाव्या व उजव्या विचारसरणीतील निवडक पण योग्य विचारांची एक प्रागतिक चळवळ हाती घेतली आणि बघता बघता दहा महिन्यांत मातब्बर पक्षांना धूळ चारत अध्यक्षपदासाठी उमेदवारीही मिळवली. 

कळस म्हणजे रविवारी फ्रान्सच्या जनतेने बहुमताने त्यांच्या गळ्यात फ्रान्सचे नवे अध्यक्ष म्हणून माळही घातली. मॅक्रॉन यांच्या या दणदणीत विजयाने फ्रान्सच नव्हे, तर संपूर्ण युरोपने नि:श्वास टाकला, असे म्हणायला हवे. मॅक्रॉन यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या ली पेन या महिला उमेदवाराने निवडणुकीला राष्ट्रवाद विरुद्ध उदारमतवाद असा रंग दिला होता. फ्रान्स प्रखर राष्ट्रवादाच्या जोरावर गतवैभव मिळवू शकतो, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेतली होती. ट्रम्प यांनी पेन यांना जाहीर पाठिंबाही दिला होता. युरोपीय युनियन बरखास्त व्हावी, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे, पेन यांनाही तेच हवे होते. गेल्या सहा महिन्यांत पेन यांनी फ्रान्समध्ये स्थलांतरितांना बंदी, जागतिकीकरणाला विरोध या मुद्द्यांना जोरदार हवा दिल्याने त्यांना अनपेक्षित असा पाठिंबा मिळत गेला. त्यात अत्यंत विखारी, तुच्छतापूर्ण भाषणे, फ्रान्सच्या पुनरुज्जीवनाला साद घातल्याने फ्रान्स अमेरिकेच्या दिशेने जाईल अशी भीती अनेक उदारमतवादी, लोकशाहीवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंतांनी व्यक्त केली होती. पण फ्रान्सच्या जनतेला भविष्यातील धोका लक्षात आला. देशाची अखंडता, विविधता व धर्मनिरपेक्षता यांचे मोल त्यांच्या लक्षात आले आणि त्यातून प्रशासनाचा ज्याला अनुभव नाही, पण ज्याची फ्रान्स एकसंघ ठेवण्याची इच्छा आहे अशा केवळ ३९ वर्षांच्या मॅक्रॉन यांच्याकडे सूत्रे देण्याचा सुज्ञपणा त्यांनी दाखवला.  

मॅक्रॉन यांचा विजय हा युरोपच्या स्थैर्यासाठी अत्यावश्यक आहे. तो मिळाला नसता तर फ्रान्समध्ये निर्वासितांवर - जे प्रामुख्याने प. आशिया व आफ्रिकेतून येतात - बंदी तर आली असती, शिवाय फ्रान्समध्ये जी कॉस्मॉपॉलिटन संस्कृती आहे तिलाही धक्का बसला असता. फ्रान्समध्ये गेल्या दोन शतकांपासून मुस्लिम समाजाचा राजकारणावर प्रभाव आहे. त्यामुळे फ्रान्सने स्वीकारलेले सेक्युलर धोरण हा त्यांच्या संस्कृतीचा व युरोपच्या सर्वसमावेशकतेचा आदर्श आहे.  पेन निवडून आल्या असत्या तर फ्रान्समधील वांशिक संघर्ष अधिक तीव्र होऊन युरोपच्या संस्कृतीला घातक ठरला असता. 

अमेरिकेला युरोपमध्ये इसिसच्या दहशतीचा बागुलबुवा निर्माण करून स्थलांतरितांच्या विरोधात एक राजकीय आघाडी निर्माण करण्याची इच्छा आहे, तर रशियाला युरोपीय युनियन आर्थिकदृष्ट्या कमजोर व्हावी म्हणून फ्रान्स बाहेर पडावा अशी इच्छा आहे. युरोपीय युनियन बरखास्त झाल्यास युरोपीय राष्ट्रे आपल्या दावणीला येतील, असे रशियाचे धोरण आहे. उलट मॅक्रॉन हे युरोपीय युनियनचे कट्टर समर्थक असल्याने त्यांनी अमेरिका-रशियाचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यात त्यांची आर्थिक विचारसरणी डावे व उजव्यांचा सुवर्णमध्य साधणारी असल्याने एक समतोल राजकीय अक्ष युरोपमध्ये तयार होऊ शकतो. उद्योगधंद्यांना पोषक वातावरण व सामाजिक सौहार्दाचे आश्वासन मॅक्रॉन यांनी दिले आहे. त्यांच्या विजयाने फ्रान्समधील लोकशाही सुज्ञ असल्याचा संदेश जगाला मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...