आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विक्रांत’मुळे मिळालेला धडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही अव्यवहारी लोक व शिवसेनेने धरलेल्या आग्रहातून निर्माण झालेल्या जनदबावापुढे झुकून आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या कामगिरीचे दर्शन घडवणारे कायमस्वरूपी संग्रहालय नौदलाने उभारले. नौदलाच्या ताफ्यातून 1997 मध्ये निवृत्त करण्यात आलेल्या आयएनएस विक्रांतचे आयुष्य संपले होते, ही युद्धनौका चांगल्या स्थितीत राखण्यासाठी येणारा खर्च हा एखादा पांढरा हत्ती पोसण्यासारखा असेल याचा विचार करण्याच्या मन:स्थितीत कोणीही नव्हते. आयएनएस विक्रांत कधी ना कधी भंगारात काढावी लागणार, हे तिचे अटळ भागध्येय होते. त्यानुसार ही युद्धनौका आयबी कमर्शियल प्रायव्हेट या भंगार खरेदी कंपनीने नौदलाकडून 63 कोटी रुपयांना नुकतीच विकत घेतली आहे. मॅजेस्टिक प्रवर्गातील आयएनएस विक्रांत भारताने इंग्लंडकडून 1957 मध्ये खरेदी केली होती व ती नौदलाच्या ताफ्यात 3 नोव्हेंबर 1961 रोजी सामील झाली. 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी लढल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान युद्धात आयएनएस विक्रांत युद्धनौका पूर्व पाकिस्तानातील (आताचा बांगलादेश) चितगाव बंदराच्या रोखाने तैनात करण्यात आली. 4 डिसेंबर 1971 पासून पुढचे सहा-सात दिवस आयएनएस विक्रांतवरील लढाऊ विमानांनी चितगावजवळील कॉक्स बाजार, खुल्ना, मोंगला या भागांवर तुफानी बॉम्बहल्ले चढवून पाकिस्तानी सैन्याची पुरती कोंडी करून टाकली होती. बांगलादेशमुक्ती युद्धामध्ये आयएनएस विक्रांतचा सिंहाचा वाटा होता. कालांतराने नौदलातून निवृत्त करण्यात आलेली ही युद्धनौका व तिच्यावर उभारलेले वस्तुसंग्रहालय यांच्या देखभालीचा खर्च आवाक्याबाहेर जाऊ लागला होता. मुंबई बंदरात उभी असलेली विक्रांत महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन तिची देखभाल करावी, अशी मागणीही काही उत्साही मंडळींनी केली होती. मात्र, त्यांच्या दबावाला पुन्हा बळी न पडता ही युद्धनौका नौदलाने भंगारात काढली हे बरे झाले. इतिहासातील अभिमानस्थळे जतन जरूर करावीत, पण अव्यवहारीपणे नव्हे, तर साकल्याने विचार करूनच, हा धडा विक्रांत प्रकरणामुळे मिळाला.