आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यक विज्ञानाचा मनस्वी जादूगार (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी दु:ख आणि दैन्य, विद्वेष आणि विकार, अहंकार आणि अधोगती या सगळ्याला प्रामुख्याने स्मरणसाठा (मेमरी), ज्ञान (नॉलेज) आणि अनुभव (एक्सपिरियन्स) या तीन गोष्टी कारणीभूत असल्याचा विचार विसाव्या शतकातले प्रभावी विचारवंत-तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांनी मांडला होता. या तीन गोष्टींच्या दुष्प्रभावामुळेच माणसाचे मन आणि मेंदू शतकानुशतके विशिष्ट दिशेने विचार करत आल्याने जगणे झापडबंद होऊन माणसाच्या एकूणच प्रगतीला विलक्षण मर्यादा आल्या आहेत, असेही त्यांना यासंदर्भात सुचवायचे होते. त्यांच्या म्हणण्याचा दुसरा अर्थ, आधुनिक मानवी इतिहासात ज्यांनी-ज्यांनी रूढी-परंपरा आणि संस्कृतीने लादलेले विचार आणि कृतीचे ओझे झिडकारले, त्यांनीच खर्‍या अर्थाने जगात वैचारिक-तांत्रिक-वैज्ञानिक वा कलाविषयक क्रांती घडवून स्वत:चे असे नवे जग आकारास आणले, असाही होता. स्मरणसाठा, प्राप्त ज्ञान आणि अनुभवाला तिलांजली देत प्रगतीच्या अनवट वाटा धुंडाळण्याची हिंमत बाळगणार्‍या अशाच काही वैद्यक शास्त्रातील मोजक्या प्रतिभावंतांमध्ये वयाच्या 87 व्या वर्षी अलीकडेच निधन पावलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट जेफ्री एडवर्ड्स यांचे नाव आदराने घेतले जात होते. मानवामधली वंशसातत्याची आस पूर्वीपासूनच तीव्र होती; परंतु प्रजननक्षमतेच्या मर्यादा भेदणेही त्याला शक्य होत नव्हते. अशा वेळी ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ ऊर्फ आयव्हीएफ (प्रचलित शब्दप्रयोग-टेस्टट्यूब बेबी) तंत्राने गर्भधारणा घडवून आणत माणसाचा नवा जीव जन्माला घालता येतो, हा विचार प्रत्यक्षात आणणार्‍या डॉ. एडवर्ड्स आणि या संशोधनात त्यांना साथ देणार्‍या डॉ. पॅट्रिक स्टेपटो यांनी निसर्गालाच नव्हे, तर धर्म आणि शासन संस्थेलाही उघडउघड आव्हान दिले होते. माणसाला जन्म देण्याचा वा त्याचा जीव घेण्याचा अधिकार केवळ परमेश्वराला आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा माणसाला कदापि अधिकार नाही, या रोमन कॅथलिक धर्मविचाराचा पाश्चात्त्य समाजावर जबरदस्त पगडा होता. तसा तो आजही आहे. स्वाभाविकच 1969 मध्ये जेव्हा डॉ. एडवर्ड्स यांनी या विचाराला म्हणजेच अप्रत्यक्षपणे देव या संकल्पनेला आव्हान देत कृत्रिम गर्भधारणा घडवून माणूस जन्माला घालण्याचा मानस जाहीर केला, तेव्हा त्यांची ही कृती नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असल्याचा शिक्का धर्ममार्तंडांनी मारला होता. धर्मसंस्थेचा प्रभाव शासनसंस्थेला टाळणे शक्य नव्हते. म्हणूनच 1971मध्ये जेव्हा प्रथम डॉ. एडवर्ड्स यांनी संशोधनासाठी ब्रिटिश शासनाचा पाठिंबा मागितला, तेव्हा तो अपेक्षेप्रमाणे नाकारला गेला. आवश्यक निधीची मागणी केली, तीसुद्धा धुडकावण्यात आली. कृत्रिम गर्भधारणाच घडवून आणायची असेल तर आधी माकडांवर हा प्रयोग करावा, मगच माणसाकडे वळावे, असा सल्लाही ब्रिटिश सरकारच्या वतीने त्यांना त्या वेळी दिला गेला. डॉ. एडवर्ड्स यांच्या प्रसिद्धिलोलुप स्वभावाकडे अंगुलिनिर्देश करून ते ज्या प्रयोगशाळेत हा धाडसी प्रयोग पाहत करू पाहत आहेत, ती प्रयोगशाळा संशोधनाच्या दृष्टीने परिपूर्ण नाही, असा नकारात्मक शेराही सरकारने त्या वेळी मारला होता. ‘काउंटर कल्चर मूव्‍हमेंट’मुळे कला क्षेत्रात बंडखोरीला पोषक वातावरण असल्याचा तो काळ होता. वैद्यक क्षेत्रातही रोबोटिक सर्जरीचे संशोधन प्राथमिक टप्प्यात आले होते. अशा वेळी धर्म आणि शासनसंस्थांच्या पाठिंब्याविना मँचेस्टर येथील खिडकी नसलेल्या एका बंदिस्त प्रयोगशाळेत खासगी दात्यांच्या मदतीने डॉ. एडवडर््स आणि त्यांचे सहकारी निसर्गावर मात करण्याच्या लढाईत मग्न होते. स्त्री बीजांड आणि शुक्राणूंचा प्रयोगशाळेत संकर घडवून गर्भ आकारास आणायचा आणि त्याचे रोपण इच्छुक स्त्रीच्या गर्भाशयात करायचे, या पद्धतीने इच्छित परिणाम साध्य होऊ शकतो, याचा पहिला अंदाज त्यांना एडिनबरो विद्यापीठात पीएच.डी.दरम्यानचे संशोधन करताना आला होता. त्यानंतर काही वर्षांत त्यांनी स्वत:च्या काही स्त्रीरोगतज्ज्ञ मित्रांकडे इतर कारणांसाठी काढलेल्या स्त्री अंडाशयातल्या पेशी प्रयोगासाठी उपलब्ध होतील का, अशी विचारणाही केली होती. त्या वेळी, डॉ. एडवर्ड्स यांचा कृत्रिम गर्भधारणेचा विचार हा निव्वळ मूर्खपणाचा असल्याचा मतप्रवाह तज्ज्ञांमध्ये होता. त्यांचे विद्यार्थीही या प्रयोगाबाबत साशंक होते. एकीकडे टीकाकारांनी टीकेचा अव्याहत मारा सुरू ठेवला होता. शारीरिक व्यंग असलेले मूल जन्माला घालण्याचा हा नसता उद्योग असल्याचे मत अनेक जण जाहीरपणे बोलून दाखवत होते. परंतु, या सगळ्याकडे दुर्लक्ष करत डॉ. एडवर्ड्स यांचे आशा आणि निराशेच्या हिंदोळ्यांवर प्रयोग सुरू होते. स्त्री बीजांड आणि शुक्राणूंचा संयोग घडवून आणणे सोपे होते, मात्र रोपण करण्यायोग्य गर्भ आकारास येताना अनंत अडचणी येत होत्या. वस्तुत: 100 अयशस्वी प्रयत्नांनंतर एखाद्याने समजुतदारपणाने नाद सोडून दिला असता, परंतु जितके अपयश येत होते, तितका डॉ. एडवर्ड्स आणि त्यांच्या सहकार्‍यांचा निर्धार अधिकाधिक बळावत होता; परंतु तब्बल नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रोपणयोग्य गर्भ आकारास आणण्यास त्यांना यश आले आणि त्याक्षणी मानवाने निसर्गावर मात करण्याचा आणखी एक टप्पाही ओलांडला. 25 जुलै 1978 रोजी लुसी ब्राऊन नावाची पहिली टेस्टट्यूब बेबी या जगात आली. जॉन आणि लेस्ली ब्राऊन हे जरी लुसीचे जीवशास्त्रीय जन्मदाते असले, तरीही हा चमत्कार घडवून आणण्याचे श्रेय डॉ. एडवर्ड्स यांचे होते. लुसीच्या जन्मानंतर आयव्हीएफ तंत्राने जन्माला आलेल्या जगातील पाच लाखांहून अधिक मुलांचे ते खर्‍या अर्थाने नियंते होते. लुसीचा जन्मसोहळा अनुभवलेल्या डॉ. एडवर्ड्स यांनी आपल्या हयातीत पहिली टेस्टट्यूब बेबी असलेल्या लुसीला मुलगा झाल्याचाही अनुभव घेतला. ज्या ब्रिटनच्या सरकारने एकेकाळी त्यांच्या संशोधनास सहकार्य करण्यास नकार दिला, त्याच ब्रिटनच्या महाराणीने त्यांचा सन्मानही केला आणि 2010 मध्ये म्हणजेच, ‘टेस्टट्यूब बेबी’च्या यशस्वी प्रयोगानंतर तब्बल 32 वर्षांनी वैद्यक शाखेच्या प्रजननशास्त्रात भरीव योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला. माणसाचा मृत्यू वैद्यकशास्त्राच्या मदतीने थोपवता येतो, हे सप्रमाण सिद्ध झाले होते; परंतु माणसाच्या जन्माचे नियंत्रणही आपल्याला राखता येते, हा आत्मविश्वास देण्याचे श्रेय डॉ. एडवर्ड्स नावाच्या वैद्यक विज्ञानाच्या क्षेत्रातील मनस्वी जादूगाराचे होते, याची नोंद जगाला घ्यावीच लागेल.