आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाकीर नाईकची उलटतपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातली. या संस्थेला मिळत असलेल्या पैशाचा मागोवा पोलिस आणि एन.आय.ए. चे अधिकारी घेत आहेत. त्यांच्या हाती या संस्थेच्या आर्थिक उलाढालीबद्दल संशयास्पद गोष्टी लागल्या आहेत. परिणामी इस्लामिक रिसर्च फाउंडेशन चालवत असलेल्या शाळांची बँकेतील खाती गोठवण्यात आली आहेत.

गेले काही महिने डॉ. झाकीर अब्दुल करीम नाईक (जन्म ः १९६८) या मुस्लिम धर्मोपदेशकाचे नाव नकारात्मक अर्थाने चर्चेत आहे. त्याच्या संस्था व त्यांचे विचार इस्लामी दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे गंभीर आरोप आहेत. तो ‘पीस टीव्ही’ या वाहिनीमार्फत प्रवचने देत असतो व ही प्रवचने जगभर पसरलेला मुस्लिम समाज भक्तिभावाने ऐकत असतो. एका अंदाजानुसार त्याची प्रवचने जगभरातील सुमारे दहा कोटी मुस्लिम समाज ऐकत/बघत असतो.

झाकीर नाईक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्याने १९९१ मध्ये ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. १९९०च्या दशकात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांची ‘लज्जा’ ही कादंबरी चर्चेत होती. या कादंबरीवर साधकबाधक चर्चा करण्यासाठी १९९४ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाने परिसंवाद आयोजित केला होता. त्यात डॉ. झाकीर नाईकने भाग घेतला होता. चर्चेचा विषय होता ‘धार्मिक दहशतवाद आणि आविष्कार स्वातंत्र्य’. तेव्हापासून डॉ. झाकीर प्रकाशात आला. हळूहळू डॉ. झाकीर नाईक यांची प्रवचने लोकप्रिय होऊ लागली. त्याच्या प्रवचनांना उपस्थिती वाढत होती. २०१० मध्ये एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकाने झाकीर नाईक याचा समावेश भारतातील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला होता.

त्याची प्रवचने वरवर ऐकली तर तो मुस्लिम दहशतवादाचा धिक्कार करत असल्याचे वाटते. पण जर ही प्रवचने काळजीपूर्वक ऐकली तर मात्र तो इस्लाममधील ‘सलाफी’ पंथाची भलावण करत असल्याचे जाणवते. परिणामी त्याची प्रवचने आता भारत, कॅनडा, बांगलादेश व इंग्लंडमध्ये दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या मते इस्लाम हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. तो वरवर पुरोगामी भूमिका घेत असल्याचे वाटते. प्रत्यक्षात मात्र तो धर्मातील प्रतिगामी भागाचा पुरस्कार करत असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ त्याच्या मते पत्नीला थोडीशी मारहाण करणे समर्थनीय आहे. डॉ. झाकीर नाईकच्या मते समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे. त्याच्या मांडणीवर अनेक मुस्लिम अभ्यासक टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी अब्दुल कादर मुकादम यांनी झाकीर नाईकाच्या मांडणीतील घोटाळे समोर आणले होते.
या काही उदाहरणांवरून डॉ. झाकीर नाईकची मांडणी वादग्रस्त असल्याचे दिसून येते. एक वेळ याकडे दुर्लक्ष करता आले असते किंवा त्याच्या मांडणीचा सामना वेगळ्या प्रकारे करता आला असता. मात्र, तो जेव्हा धर्माच्या आधारे राजकीय व सामाजिक क्षेत्रात ढवळाढवळ करतो तेव्हा हा मुद्दा राष्ट्राच्या सुरक्षेशी जोडला जातो. यात आंतरराष्ट्रीय दहशतवादाचासुद्धा संबंध येतो. त्याने ३१ जुलै २००८ रोजी पीस टीव्हीवर दिलेल्या प्रवचनात सांगितले होते की, अमेरिकेवर ९/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांचा हात होता. त्याने अनेक भाषणांतून अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचे कौतुक केले होते. यामुळे त्याच्या प्रवचनांचा गंभीरपणे विचार करावा लागतो.

आता तर असे मानले जाते की, झाकीर नाईकच्या प्रवचनांतून धार्मिक दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. बांगलादेशाची राजधानी ढाका येथे १ जुलै २०१६ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास एका कॅफेत पाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यात सुमारे ३० जण मारले गेले होते. बांगलादेशात सहसा अशी कृत्ये होत नसतात. यामुळे जगभर खळबळ माजली होती. या दहशतवाद्यांनी नंतर दिलेल्या कबुलीत आमच्यावर डॉ. झाकीर नाईकच्या प्रवचनांचा प्रभाव असल्याचे मान्य केले होते. याचाच अर्थ झाकीर नाईकच्या प्रवचनांत दहशतवादाला प्रोत्साहन देणारे आवाहन असते. त्यामुळेच भारत सरकारने १५ नोव्हेंबर २०१६ रोजी त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. झाकीर नाईकची प्रवचने दहशतवादाला खतपाणी देत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्याने पीस टीव्हीवरून ‘सर्व मुसलमानांनी दहशतवादी बनावे’ असे आवाहन केले होते. झाकीर नाईकची भाषणे/प्रवचने तरुणांची माथी भडकवतात, असे लक्षात आल्यावर मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

झाकीर नाईकच्याविरोधात पोलिस व सरकार करत असलेली कारवाई हा दहशतवादाच्या विरोधातील व्यापक लढाईचा एक भाग समजला पाहिजे. ही वैचारिक लढाई आहे, जी फक्त पोलिसी कारवाईने जिंकता येणार नाही. यासाठी वैचारिक हत्यारे वापरली पाहिजेत. विचारांचा सामना विचारांनी करावा लागेल. यासाठी मुस्लिम विचारवंतांनी सातत्याने इस्लाममधील चांगली बाजू मुस्लिम तरुणांसमोर ठेवली पाहिजे. या लढाईत माध्यमांवर तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांनी सतत झाकीर नाईकसारख्या दिशाभूल करणाऱ्यांची खरी बाजू समाजासमोर आणली पाहिजे. ही दीर्घ काळ चालणारी लढाई आहे. मात्र, ती लढलीच पाहिजे.
प्रा. अविनाश कोल्हे
राजकीय विश्लेषक
nashkohl@gmail.com
बातम्या आणखी आहेत...