आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्त्वनिष्ठा मोठी की कर्तव्यनिष्ठा? (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशापुढील एका गहन समस्येचे उत्तर प्रसिद्धिमाध्यमांना रविवारी मिळाले. आयपीएल स्पॉट फिक्सिंगपासून बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या टेलिव्हिजन वाहिन्यांना अपेक्षित असे काहीच मिळाले नाही. अपेक्षाभंगाचा त्यापेक्षा मोठा धक्का शरद पवार यांच्या व्यूहरचनेने मैदानात उतरलेल्यांना बसला. एरवी, राजकीय डावपेचांत पवार इतरांना कात्रजचा घाट दाखवतात, इथे मात्र पवारांनाच विरोधकांनी कात्रजचा घाट दाखवला! अजय शिर्के यांनी बीसीसीआय कोशागाराच्या चाव्या क्रिकेट बोर्डाकडे परत केल्या. सचिवपदाचे दप्तर सांभाळण्यास संजय जगदाळे यांनीही नकार दिला. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून हटवण्यासाठी हे दडपण पुरेसे ठरले नाही. दक्षिण भारताच्या मदतीला पूर्व विभाग आलाच. शरद पवार यांचा बार फुसका ठरवताना उत्तर विभागानेही श्रीनिवासन यांची पाठराखण केली हे विशेष. राजकीय भाषेत बोलायचे झाल्यास काँग्रेसशी भारतीय जनता पक्षाने हातमिळवणी करून राष्ट्रवादीला धूळ चारली. क्रिकेट बोर्डात आपण असतो तर असे घडलेच नसते, असे विधान करून शरद पवारांनी बीसीसीआयमधील पुनरागमनाचे संकेत दिले होतेच. मात्र त्याच वेळी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आपल्याला पुन्हा येण्यात रस नसल्याचे सांगून मुंबई क्रिकेटमध्ये अद्याप आपल्याला रस असल्याचेही स्पष्ट केले होते. श्रीनिवासन आणि जगमोहन दालमिया या आपल्या जुन्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या लढाईत पवार उतरल्याची जाणीव श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढल्यानंतरच झाली होती. अजय शिर्के या हुकमाच्या ताबेदाराने राजीनामा दिल्यानंतर पाचही विभागांचे उपाध्यक्ष राजीनामा देणार, ही प्रसिद्धिमाध्यमांची कल्पित बातमी अखेर अफवाच ठरली. एकाही उपाध्यक्षाने राजीनामा दिला नाही. काँग्रेसमधील दडपणामुळे राजीव शुक्ला यांनी आयपीएलचे चेअरमनपद सोडले. मात्र त्यांनी उपाध्यक्षपद जाणीवपूर्वक सोडले नाही. अरुण जेटली जेव्हा चेन्नईत न येता दिल्लीत बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा बैठकीत सहभागी झाले, त्या वेळीच श्रीनिवासन यांच्याविरुद्ध बंड फसल्याची जाणीव सर्वांना झाली होती. अनुराग ठाकूर यांनीदेखील दिल्लीतूनच सहभाग घेतला. संपूर्ण अनुभव, राजकीय मुत्सद्देगिरी आणि प्रतिपक्षावर बाजी उलटवण्याची क्षमता या गोष्टी श्रीनिवासन यांच्यासारख्याच्या खुर्चीला हादरे देण्यासाठी वापरल्या गेल्या. क्रिकेट या खेळावरील विश्वासाला तडा गेला आहे. खेळाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यावर विचार करण्यासाठी कुणीही वेळ व अक्कल खर्ची घातली नाही. त्याऐवजी आपापली गणिते व समीकरणे जुळवण्यात क्रिकेट बोर्डातील सारी राजकारणी मंडळी व्यग्र होती. क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय करायला हवे, खेळाडूंना प्रचंड पैसा देऊनही अपप्रवृत्तींच्या जाळ्यात ते का व कसे ओढले जाताहेत, त्यापासून खेळाडूंना परावृत्त करण्यासाठी काय करता येईल, याचा विचारदेखील कुणाच्या मनाला शिवला नाही. उलट राजकीय आखाड्यात एकमेकांवर गरळ ओकणार्‍यांनी अभद्र युती केली. ‘दिल्ली’करांनी पवारांना रोखण्यासाठी एकी केली. खरे तर राजकारणाचा अनुभव असलेल्या जेटलींनी या वेळी पुढे येऊन श्रीनिवासन यांना दूर ठेवून क्रिकेटच्या साफसफाईसाठी हंगामी अध्यक्षपद स्वीकारणे गरजेचे होते. त्याऐवजी त्यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारले. तीन महिन्यांनंतर आपण अध्यक्ष होणार आहोत तेव्हा आताच ‘स्पॉट फिक्सिंग’च्या वादात कशाला पडायचे, असा सोयीस्कर विचार जेटली यांनी केला असावा. खरे तर श्रीनिवासन यांच्यासारख्या हुकूमशहाला शह देण्यासाठी सद्य:स्थितीत क्रिकेट बोर्डात त्यांच्याइतकी सक्षम व्यक्ती दुसरी नव्हती. राजीव शुक्लांसारख्यांकडून तशी अपेक्षाही नव्हती. त्यामुळे जेटली यांनी आव्हान स्वीकारून पुढे येणे गरजेचे होते. त्याऐवजी त्यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी शरद पवार यांना तूर्तास दूर ठेवण्यात धन्यता मानली. श्रीनिवासन हा कर्मठ उद्योजक आहे. अशा हट्टी, हेकट, हुकूमशहाला ठेचण्याची हीच नामी संधी होती. त्याऐवजी प्रत्येकाने आपापला स्वार्थ पाहिला. शरद पवारांवरदेखील काळानेच सूड उगवला. ज्या राजकारणासाठी ते प्रसिद्ध आहेत, त्यांना त्यांच्याच पद्धतीने चीतपट करण्यात आले. शशांक मनोहर हा त्यांचा उमेदवार मैदानात येण्याआधीच बाद झाला. निरंजन शहा हा लेचापेचा गडी दालमिया यांच्यासमोर उभा करण्यात आल्यानंतर जेटलींपासून सर्वांनाच एकेकाळी बदनाम होऊन बाहेर काढण्यात आलेल्या दालमिया यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागले. ‘कॉर्पोरेट बॅटल्स’ लढण्यात माहीर असलेल्या श्रीनिवासन यांनी पवारांसारख्या अनुभवी राजकारण्याला धूळ चारली. जेटली, राजीव शुक्ला, अनुराग ठाकूर, नरेंद्र मोदी, फारुख अब्दुल्ला यांच्यासारख्या राजकारण्यांचा वाढता गोतावळा असणार्‍या बीसीसीआयच्या राजकारणात त्या सर्वांवर श्रीनिवासन यांनी मात केली. श्रीनिवासन स्वत: स्वच्छ प्रतिमेचे आहेत असे म्हणतात. त्यांनी स्वत: भ्रष्टाचार केला नाही, हेदेखील खरे असले तरीही त्यांच्या हट्टी स्वभावापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. श्रीनिवासन यांच्यासारख्या औद्योगिक साम्राज्याच्या अधिपतीला बीसीसीआयचे अध्यक्षपद म्हणजे फारशी मोठी गोष्ट नाही. जावयाच्या प्रतापांमुळे जेव्हा त्यांच्यावर बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्यासाठी दडपण वाढत गेले, तेव्हाही त्यांनी बीसीसीआयची खुर्ची का सोडली नाही, हे एक कोडे आहे. विशेषत: अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाल अवघ्या तीन महिन्यांचाच शिल्लक असतानाही, त्यांनी खुर्चीला चिकटून राहण्यासाठी सर्व शक्ती पणास का लावली? जावयापेक्षाही कदाचित त्यांना चेन्नई सुपरकिंग्ज या आपल्या फ्रँचायझीची अधिक काळजी वाटली असावी. त्यांनी डेक्कन चार्जर्स या फ्रँचायझीची मान्यता रद्द करून कॉर्पोरेट जगताला दिलेला धक्का किती मोठा होता, हे दस्तुरखुद्द श्रीनिवासनच जाणतात. त्यामुळे आपल्या परोक्ष तीच पाळी चेन्नई सुपरकिंग्जवर आली तर होणार्‍या भयंकर परिणामांची त्यांना पूर्वकल्पना कदाचित असावी. चेन्नई सुपरकिंग्जची मालक कंपनी इंडिया सिमेंटच्या भागधारकांना ते काय उत्तर देणार? इंडिया सिमेंटचा शेअर कोसळणे त्यांना पेलवणारे नाही. बीसीसीआय अध्यक्षपदाची खुर्ची गमावण्यापेक्षाही ती गोष्ट त्यांच्यासाठी अधिक नुकसानकारक ठरू शकते. म्हणून श्रीनिवासन यांनी पवारांसारख्या महाकाय शक्तीला टक्कर देऊन बीसीसीआयवरील आपले अस्तित्व टिकवले काय? श्रीनिवासन हटाव मोहिमेमुळे स्पॉट फिक्सिंग प्रकरण दुर्लक्षित झाले आहे. प्रत्येकाचा स्वत:चा अजेंडा वेगळा आहे. या युद्धात शस्त्रे टाकून पळालेल्या कोशाध्यक्ष अजय शिर्के व सचिव संजय जगदाळे यांनी बीसीसीआयशी कर्तव्यनिष्ठेच्या बाबतीत प्रतारणा केली नाही का? क्रिकेट बोर्ड सध्या नवनवे कर आणि आर्थिक समस्यांमधून जात असताना कोशाध्यक्षांनी ऐन ‘ऑडिट’च्या तोंडावर पळ काढणे योग्य आहे का? तत्त्वनिष्ठा मोठी की कर्तव्यनिष्ठा?