आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयर्न लेडी!’ ( अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जग जेव्हा दोन महासत्तांच्या हिंस्र स्पर्धेमुळे राजकीयदृष्ट्या विभागले गेले होते आणि शीतयुद्धाचा लंबक जेव्हा कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या दिशेने झुकलेला होता, तेव्हा मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. ते वर्ष होते 1979. त्याअगोदरची काही वर्षे ब्रिटनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्या डळमळलेल्या अर्थव्यवस्थेत महागाई, चलनवाढ, पगार कपात यामुळे सामाजिक असंतोष वाढला होता. ब्रिटनमध्ये कामगार संघटना अतिशय प्रभावी असत (ट्रेड युनियन काँग्रेस ही त्या कामगार संघटनांची संयुक्त परिषद. ही ट्रेड युनियन काँग्रेस मजूर पक्षाशी संलग्न असल्यामुळे संप, हरताळ, मोर्चे संघटित करण्यात त्यांचा पुढाकार असे.) कामगार वर्गातील उग्र असंतोषामुळे (आणि काही कामगार संघटनांच्या अतिरेकी शैलीमुळे) अवघा देश मेटाकुटीला आला होता. स्थिर जीवन अशक्य झाले होते. त्या अस्थैर्याला विटलेल्या मतदारांनी मजूर पक्षाचे सरकार पाडून कॉन्झर्व्हेटिव्ह ऊर्फ टोरी पक्षाचे सरकार आणले. त्या पक्षाने मार्गारेट थॅचर यांची निवड करून त्यांना पंतप्रधान केले. त्या वर्षी एकूण जगत कमालीच्या अस्थिरतेतून आणि संघर्षातून चालले होते. इराणमधील अयातुल्ला खोमेनीप्रणीत इस्लामी मूलतत्त्ववादाचा विजय त्याच वर्षातला. सोव्हिएत युनियनचे सैन्य अफगाणिस्तानात घुसले तेही त्याच वर्षी. व्हिएतनाम, चीन संघर्षही त्याच वर्षातला. अमेरिका-सोव्हिएत युनियन यांच्यातील महासत्ता संघर्षात अमेरिकेची पीछेहाटच होत होती. पाचच वर्षे अगोदर व्हिएतनामने अमेरिकन बलाढ्य सेनेचा दारुण पराभव केलेला होता.

अमेरिकेचा आत्मविश्वास ढासळलेला असतानाच इराण व अफगाणिस्तानमधील घटना घडल्यामुळे आणि विशेषत: अमेरिकन दूतावासावर खोमेनी समर्थकांनी हिंस्र कब्जा केल्यामुळे, अमेरिकन प्रशासनाची झोपच उडाली होती. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते जिमी कार्टर. अमेरिकेचे कार्टर प्रशासन शीतयुद्धातील सोव्हिएत युनियनच्या आव्हानामुळे हैराण झालेले होते. कार्टर डेमोक्रॅटिक पक्षाचे, म्हणजे उदारमतवादी. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर पंतप्रधान झाल्या आणि एकूणच पाश्चिमात्य जगातील राजकीय वातावरण बदलले. उदारमतवादी आणि डावीकडे झुकणारे राजकारण हेच आपल्या डळमळत्या अर्थव्यवस्थेला आणि अस्थैर्याला कारणीभूत आहे, असा ग्रह अनेक मतदारांमध्ये मूळ धरू लागला होता. थॅचर यांचा विजय त्या मन:स्थितीचेच प्रतिबिंब होते. थॅचरबाई अभिजात अँटी कम्युनिस्ट.

कट्टर उजव्या राजकारणाच्या. त्यांनी आल्या आल्याच आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि सार्वत्रिक बाजारपेठीकरण करायला सुरुवात केली. थॅचर यांनी राष्ट्रीयीकृत कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण सुरू केल्याबरोबर ब्रिटनमधील राजकारणाचे ध्रुवीकरण झाले. इतकी तीव्र राजकीय विभागणी यापूर्वी झालेली नव्हती. आज जगभर जो अर्थप्रवाह रुळला आहे, त्याची सुरुवात थॅचर यांच्या आक्रमक आर्थिक धोरणांनी झाली आहे. त्यांच्या निवडणुकीनंतर दीड वर्षाने अमेरिकेत निवडणुका झाल्या आणि उदारमतवादी कार्टर यांचा पराभव होऊन रिपब्लिकन पक्षाचे अति-उजवे रोनाल्ड रिगन अध्यक्ष म्हणून निवडून आले. ‘थॅचरिझम-रिगनिझम’ अशी संयुक्त संज्ञा तेव्हापासून रुजली असली तरी त्या विचाराची खरी प्रणेती म्हणजे मार्गारेट थॅचर! जगभरचा डाव्या व उदारमतवादी पक्षांच्या, विचारवंतांच्या आणि मीडियाच्याही थॅचरबाई काही प्रमाणात शत्रू झाल्या हे खरे असले तरी त्यांची ‘आयर्न लेडी’ ही प्रतिमा त्यांच्या आक्रमकतेमुळे व धाडसामुळे झाली हेही खरे. आपल्याकडे ‘लोहपुरुष’ ही संज्ञा प्रचलित आहे. मार्गारेट थॅचर या ‘लोह-स्त्री’ होत्या. त्यांनी कोळसा खाणीतील कामगारांचा संप कठोरपणे मोडून काढला. (त्याच वेळेस मुंबईतील गिरणी कामगारांचा संपही जवळजवळ तसाच मोडून काढण्यात आला. तिकडे खाणी बंद पडल्या, आपल्याकडे गिरण्या बंद पडल्या.) एकूणच जागतिक राजकारणाचा लंबक उजवीकडे झुकल्यावर शीतयुद्धाचे स्वरूपही पालटू लागले.

सोव्हिएत युनियनची सूत्रे कट्टर कम्युनिस्ट नेतृत्वाकडून उदारमतवादी मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याकडे आली. गोर्बाचेव्ह यांनी त्यांच्या राजकीय व्यवस्थेचे लोकशाहीकरण आणि अर्थव्यवस्थेचे पुनर्निर्माण सुरू केले. थॅचरबाई गोर्बाचेव्ह यांच्यावर इतक्या प्रसन्न झाल्या की त्यांनी ‘हा पहिलाच रशियन कम्युनिस्ट नेता असा आहे की जो वास्तववादी आहे,’ असे प्रशस्तिपत्र त्यांना बहाल केले. एका अर्थाने थॅचरबाईंचे प्रशस्तिपत्र म्हणजे त्यांच्या द्रष्टेपणाचा पुरावा म्हणता येईल. कुणी असेही म्हणू शकेल की, सोव्हिएत युनियनच्या विघटनाचा ‘विषाणू’ थॅचरबाईंच्या धोरणातूनच रशियात घुसला. ते काहीही असो. एक निश्चितच खरे की, शीतयुद्धाचे परिमाण आणि निकष थॅचरबाईंनी बदलून टाकले. परंतु त्यांचा आक्रमकपणा, हट्टीपणा आणि पक्षांतर्गत अनुदारपणा हा ब्रिटनच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षांच्याच आड येऊ लागला. आर्थिक उदारीकरणामुळे ब्रिटनचा नूर बदलला, पण समाजात असंतोषही खदखदू लागला. शेवटी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षानेच त्यांचे नेतृत्व बदलायचे ठरवले. थॅचरबाईंना 1990 च्या अखेरीस पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला पक्षाने भाग पाडले. अश्रुपूर्ण नयनांनी त्यांनी 10, डाउनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा निरोप घेतला. पण 1979 ते 1990 या 11 वर्षांच्या काळात थॅचरबाईंनी घडवून आणलेले आणि त्या काळात झालेले (त्यांच्या देशांतर्गत व जगातले) बदल सर्वार्थाने ऐतिहासिक ठरले. त्या पंतप्रधान झाल्या तेव्हा सोव्हिएत युनियन एक महासत्ता होती. त्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्या तेव्हा सोव्हिएत युनियन खिळखिळी झाली होती. त्या पंतप्रधान झाल्या तेव्हा बर्लिनची भिंत ही शीतयुद्धाची प्रतीकात्मक सीमारेषा होती. त्या निवृत्त झाल्या तेव्हा बर्लिनची भिंत कोसळली होती. त्या पंतप्रधान झाल्या तेव्हा ब्रिटनचा मजूर पक्ष बचावात्मक पवित्र्यात गेला आणि पुढे तर टोनी ब्लेअर यांच्या ‘न्यू लेबर’ पार्र्टीने थॅचरबाईंच्याच धोरणांचा पाठपुरावा केला. थॅचरबाईंनी भांडवलशाहीला, बाजारपेठेला, नफेबाजीला, कॉर्पोरेट कल्चरला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि प्रचलित पुरोगामी आदर्शवादाला आव्हान दिले. एका अर्थाने त्यांनी जगाला नव्या भांडवली - बाजारपेठीय अस्थैर्याकडे नेले. आजच्या जगातील भांडवली अराजकाची सुरुवातही 1979 मध्ये थॅचरबाईंनीच केली असे म्हणावे लागेल. मात्र, त्यांचे टीकाकारही हे मान्य करतात की, दुसºया महायुद्धानंतर जागतिक राजकारणाला कलाटणी या ‘आयर्न लेडी’ने दिली!