आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजून काही उणीव राहिलीय का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वृत्तपत्रे आणि दूरदर्शन वाहिन्यांवर स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत येताहेत. यापूर्वी काही काळ अशाच स्त्रियांच्या आत्महत्येच्या बातम्या येत होत्या.दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार इतका क्रूर आणि घृणास्पद होता की त्यासाठी दिल्लीतील आणि इतर शहरांतील अनेक संघटनांनी क्रियाशील निषेध नोंदवण्यासाठी लाँग मार्च, कँडल मार्च, मूक मोर्चा, वगैरेसारख्या गोष्टी त्वेषाने आणि रागाने करायला सुरुवात केली. तोच उत्तर प्रदेशातल्या प्रौढेवर तीन जवानांनी सामूहिक बलात्कार केल्याची बातमी आली.

दिल्लीतल्या घटनेपाठोपाठ महारात नाशिकमध्ये सामूहिक बलात्काराची, बीडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्काराची बातमी झळकली. मतिमंद मुलीवरचा बलात्कार, आदिवासी आश्रमशाळेमधल्या विद्यार्थिनीवर चौघांनी केलेला नाशिक-सुरगणा येथील बलात्कार, अनेक शहरांमध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवून तरुण मुलींना फसवून त्यांच्यावर केलेले लैंगिक अत्याचार अशा अनेक घटना चित्रपटातल्या शेवटच्या हाणामारीच्या वेगाने वर्तमानपत्रात झळकताहेत. अर्थात उजेडात येणारे गुन्हे हे पाण्यात बुडालेल्या हिमनगाच्या टोकासारखे आहेत. आपल्यासारख्या अवाढव्य देशाच्या विस्तारात असे प्रकार कदाचित दर दिवशी अनेक शहरी आणि ग्रामीण भागात घडताहेत. त्यांची नोंद होत नाही किंवा ते प्रकार आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. अर्थात नोंदवलेल्या गुन्ह्यांचे भविष्यात काय होते, हेही आपल्याला कळत नाही किंवा सातत्याने तेच तेच ऐकून बोथट झालेली जनता तसे जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. दिल्लीतल्या या प्रकारानंतर अनेक संस्था, कार्यकर्ते, मंत्री, आमदार, खासदार आणि सामान्य जनता संतापून प्रतिक्रिया देताहेत, पण चिडून उठली आहे ती सामान्य जनता.

एकीकडे भ्रूणहत्येविरोधात देशभर मोहिमा चालू आहेत. गर्भजल परीक्षा करून अबॉर्शन करणा- हॉस्पिटल्सना टाळे लागतेय. डॉक्टर्सना जेल होतेय, तर ज्या घरात मुली आहेत ते धास्तावून गेलेत. कोणतीही सुरक्षा व्यवस्था अशा पद्धतीच्या अत्याचाराला थांबवायला असमर्थ ठरतेय. यानिमित्ताने कायदा आणि सुरक्षा व्यवस्था यावर जबरदस्त टीका चालू आहे. चर्चा चालू आहे. मानवी न्यायासाठी आणि स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी केलेला कायदा गुन्हेगारांवर जरब ठेवू शकत नाही. गुन्हेगाराला कायद्याचा धाक नसण्याचे कारण कायद्यातल्या अनेक पळवाटा आहेत. बलात्कार झालेल्या मुलीला मात्र अशा प्रसंगाची आठवण विसरणे अशक्य आहे. त्या प्रसंगातून जाताना तर ती अर्धमेली झालेली असतेच, पण नंतर सतत अनेक मरणं ती मरत असते. त्यात गुन्हेगाराला होणारी शिक्षा त्याच्या कृत्याच्या मानाने अतिशय सौम्य वाटावी अशी असते. पुरुष म्हणून तो उजळ माथ्याने फिरत असतो. म्हणून अशांना फाशीचीच शिक्षा दिली जावी म्हणून जोरदार मागणी करण्यात येत आहे. त्या मागणीने आता चांगले मूळ धरले आहे, तर काही स्त्रियांनी अशा गुन्हेगारांचे पुरुषत्व नष्ट करावे, म्हणजे त्यालाही आयुष्य भोगणे तर दूर, बलात्कारित स्त्रीसारखीच मरणं मरावी लागतील.

यानिमित्ताने महत्त्वाचा भाग पुढे येतोय. तो सामाजिक व त्या पीडित स्त्रीच्या मानसिकतेचा. पोलिसांसारख्या यंत्रणेवर अवलंबून निष्क्रिय राहण्याची सवय, पीडित स्त्रियांनी स्वत: तक्रार केल्यानंतरही लवकर त्यावर कृती न करण्याची सवय, पीडित स्त्रीकडेच दोषी म्हणून बघण्याची सामाजिक परंपरा या गोष्टी तर आहेतच. त्याचे कारण आपण स्त्रीचे चारित्र्य हे तिच्या लैंगिकतेशी जोडून ठेवलेले आहे. परंपरागत मानसिकतेला बदलत्या काळातही घट्ट धरून आहोत. नैतिकतेची सगळी जबाबदारी स्त्रीवर आहे आणि ती तिच्या चारित्र्याशी नाळेसारखी जोडलेली आहे. त्यामुळे विवाह संस्था प्रबळ होऊन सुस्थिर जरूर झाली, पण त्यात कधी-कधी स्त्रीच्या होणा- कोंडमा-चा, मानसिक छळाचा विचार नाही. बलात्कारित स्त्री वा मुलीला नंतरच्या आयुष्याचा विचार सर्पदंशाचा वाटतो तो यामुळेच. ती समाजात ताठ मानेने चालू शकत नाही. याउलट शिक्षा भोगलेला पुरुषही काही न घडल्याच्या आवेशात जगतो. पश्चात्तापदग्ध एखाद्या अशा लैंगिक गुन्हेगाराने प्रायश्चित्त म्हणून आत्महत्या केल्याचे उदाहरण नाही. पुरुषांचा हा निर्ढावलेपणा आणि वासनेचा उद्रेक थांबू न शकण्यामागे कोणती मानसिकता असेल, याचा विचार करण्यापेक्षा ही वर्षानुवर्षे चाललेली मानसिकता आपण बदलू शकू का, हा विचार होणे आवश्यक आहे. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आईवर सगळ्यात जास्त असते. ती तिच्या या कर्तव्यात कुठे चुकतेय का?

पौगंडावस्थेनंतर मुलगा स्वतंत्रपणे आपली मते मांडू लागतो. त्या वेळी बहुतेक माता गप्प होताना दिसतात. आपल्या मुलांची तीव्र आणि बंडखोर मते आहेत, अशी समजूत करून घेतात. त्या वेळी खरे तर त्यांचे समायोजन आवश्यक असते. तेच लैंगिक अवयव आणि लैंगिक शिक्षणाबद्दल आहे. अनेक संस्था, कॉलेज सेक्स एज्युकेशन देतात, तरीही शाळा-कॉलेजातून अशी चॅप्टर्स ‘घरी वाचून घ्या’ म्हणून टाळली जातात. नातेसंबंधात स्त्रीचे संरक्षण व्हावे म्हणून राखीसारखा सण आला तरी त्याचा अर्थ काळानुरूप कमी जाणून घेतला जातो. उलट त्याचे उत्सवी, बाह्य सेलिबे्रशन या जाहिरातीच्या युगात जास्त होते.

आईने मुलाला वासनेच्या आहारी जाऊ नये हे आवर्जून सांगताना फालतू आत्माभिमान नसावाच हे शिकवले पाहिजे. मुलगी उपहासाने हसली किंवा काही बोलली तर त्याचा प्रेस्टिज इश्यू करणे चुकीचे आहे, हे सांगितले जाते का? माझा मित्रात अपमान झाला तर मीही सूड घेईन आणि मित्रांनी तसाच घ्यावा म्हणून बलात्काराची कृती समर्थनीय नाही.
मुख्यत्वे मुलगा आणि मुलगी ही लिंगनिहाय विभागणीच न करता आपल्या मुलांना एक व्यक्ती म्हणून वाढवले पाहिजे. दोघांच्या अस्तित्वाला आवश्यक पैस असणे गरजेचे असल्याची शिकवण जाणीवपूर्वक द्यायला पाहिजे. म्हणजे समाजाला किंवा इतरांना काय वाटेल, ते काय म्हणतील असे आपण लहान मुलांना समजू लागल्यापासून शिकवतो, उदा. कपडे घाल नाही तर सगळे ‘शेम शेम’ म्हणतील हे अजाणतेपणे शिकवताना ‘तू दुखावला जातोस तशीच मुलगीही दुखावली जाते, स्त्रीही दुखावली जाते’हे दुसरे माणूसपण समजून द्यायला कुटुंबकर्ती या नात्याने स्त्री कमी पडते का? हेही अजाणतेपणी मुलांमध्ये मुरवायचे राहून गेल्याने ही क्रौर्याची, वासनेची तीव्रता उफाळून येतेय का, हे पाहणे गरजेचे ठरतेय. शेवटी माणसातला पशू हा संस्कार, नागरीकरण,कायद्याचे दडपण यातूनच मरतो.ही मोठी जबाबदारी स्त्रीवर आलीय. तिने स्वत:शी आई म्हणून हे तपासून पाहायला पाहिजे, तर सामाजिक मानसिकता आपोआप बदलेल.