आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue Of Madha Loksabha Constitutions Solapur By Rakesh Kadam

माढा मतदारसंघात अनेक दिग्गज इच्छुक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मतदारसंघ. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्याचा बारामतीसारखा विकास होईल, अशी चर्चा होती. गेल्या चार वर्षांत तसे काहीही झालेले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँगे्रसची नेतेमंडळीही गटातटाच्या राजकारणाने त्रस्त आहेत. आपल्याखेरीज इतर कोणताही उमेदवार निवडून येऊ नये अशी रचना शरद पवारांनी गेल्या चार वर्षांत केल्याचे सध्याच्या वातावरणातून दिसून येते. या परिस्थितीतही राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींचे दौरे सुरू आहेत. महायुतीकडेही हक्काचा उमेदवार नाही. आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये घडणार्‍या घडामोडींवरच माढा मतदारसंघाचे राजकारण फिरण्याची सध्याची स्थिती आहे.

शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांची नावे चर्चेत आहेत. मंत्रिपद गेल्यानंतर रामराजेंनी सातार्‍याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. सांगोला वगळता इतर तालुक्यांतील नेत्यांनी रामराजेंना मतदारसंघातील ‘वस्तुस्थिती’ सांगितली. त्यामुळे रामराजे सध्या शांत आहेत. दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे माण, खटाव, करमाळा, सांगोला आणि माढा या भागात 15 दिवसांतून एकदा, असे दौरे सुरू आहेत. 2009 मध्ये अजित पवार गटाने रणजितसिंहांच्या उमेदवारीला विरोध केला होता. यंदा पवार गटाबरोबरच आपले काका प्रतापसिंह मोहिते-पाटील विरोध करतील हे गृहीत धरूनच त्यांचे दौरे सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून विजयसिंहांचे नाव पुढे केले जाते. मात्र विजयसिंह हे रणजितसिहांच्या नावावर ठाम आहेत. यावर शरद पवार आणि अजित पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष राहणार आहे. मोहिते-पाटलांचे विरोधक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, आमदार दीपक साळुंखे यांची चाचपणी सुरू आहे. हे दोघेही रामराजेंच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह काही नेत्यांनी शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती.

गेल्या चार वर्षांत शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेला वाद धुमसत ठेवला आहे. आपल्याखेरीज इतर कोणताही उमेदवार उभा राहिल्यास त्याला विरोध होईल अशी रचना त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने करून ठेवल्याचे सध्याच्या वातावरणावरून दिसून येते. माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होणार नाही, हे शरद पवार आणि अजित पवार जाणून आहेत. त्यामुळेच पवारांनी सध्या ‘मी निवडणूक लढवणार नाही’ अशी गुगली टाकल्याची चर्चा आहे. ऐनवेळी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घ्यायची आणि काही नेत्यांच्या तोंडून पुन्हा शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी मागणी करायला लावायची, असा अंदाजही अजित पवार गोटातून वर्तविला जात आहे. असे असले तरी सातार्‍यातून रामराजे नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्ह्यातून मोहिते-पाटील काय करतात, याकडेही लक्ष राहणार आहे.

विरोधी गोटातही संभ्रम
शरद पवारांविरोधात भाजपच्या सुभाष देशमुख आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना चांगली मते मिळाली होती. निवडणुकीनंतर देशमुखांनी या भागाकडे दुर्लक्ष केले. महादेव जानकर यांनी पुन्हा रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांना गतवर्षीच्या तुलनेत कितपत साथ मिळेल, याबाबत शंका आहे. कोल्हापूर, सांगली भागात राष्ट्रवादीची कोंडी करणार्‍या स्वाभिमानी संघटनेने माढ्यातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले आहे. या ठिकाणी स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम जानकर इच्छुक आहेत. जानकर यांची इच्छा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवरच अवलंबून असते. त्यामुळे जानकर ऐनवेळी काय भूमिका घेतात हे स्वाभिमानी संघटनेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.