आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मिरी संस्कृतीचे जतन होणे आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्ये तसेच नेपाळमधील अनेक नागरिक काश्मीरमध्ये वास्तव्याला आहेत. हे लोक काश्मिरी संस्कृती नष्ट करीत असून त्यांनी तत्काळ काश्मीरमधून निघून जावे.’ असे उद्गार हुरियतचे नेते सईद अली शाह गिलानी यांनी काढल्याची बातमी एका प्रमुख वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे. काश्मीरमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या गिलानी यांच्या तोंडी चुकीचे उद्गार घालण्याची गफलत पत्रकाराकडून होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊनही गिलानींच्या उद्गारांची दखल घेणे आवश्यक ठरते. भारतातील इतर राज्ये व नेपाळमधून कमी मजुरीवर काम करण्यास तयार असलेले मजूर काश्मीरमध्ये येतात. गिलानींच्या वक्तव्याने या मजुरांच्या संख्येत भविष्यात मोठी घट होण्याची चिंता केशर व सफरचंद उत्पादकांना भेडसावते आहे.


काश्मीरची ‘करोल बाग कॉलनी’ करण्याचे घाटत असल्याचा आरोपही केला जातोय. 1947 मध्ये फाळणीनंतर जे निर्वासित सीमेपलीकडून दिल्लीत आले, त्यांच्या पुनर्वसनासाठी त्या वेळी करोल बाग वसाहत उभारण्यात आली होती. तिथे वास्तव्याला आलेल्या त्या वेळच्या गरीब पंजाबी लोकांनी नंतरच्या काळात खूपच प्रगती साधली. ते सुस्थापित झाले. उंची वस्त्रे, दागिने यांचा वापर ते करू लागले. अत्यंत देखण्या मसुरी या हिल स्टेशनवर दिल्लीतील पंजाबी लोकांनी जेव्हा प्रथम पाऊल ठेवले तो दिवस मसुरीतील रहिवाशांना नक्की आठवत असेल. सिमलामध्येही परप्रांतीय मोठ्या संख्येने येऊ लागल्याने या शहरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.


पृथ्वीवरील नंदनवन असा गौरवाने ज्याचा उल्लेख होतो त्या काश्मीरमध्येही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली असणार. काश्मिरी लोकांनी त्यांना योग्य वाटलेल्या मार्गाने दहशतवादी प्रवृत्तींचा पराभव केला. आता काश्मीरमध्ये ब-यापैकी शांतता प्रस्थापित झालेली असून संपूर्ण भारतातील नवदांपत्यांना मधुचंद्रासाठी, तर अन्य लोकांना पर्यटनासाठी हे खोरे साद घालू लागले आहे. मात्र, ‘जब तक है जान’ या चित्रपटात दल लेकमध्ये विहरणा-या शिका-यावर शाहरुख खानबरोबर अनुष्का शर्मा रोमान्स करतानाची दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. त्यातील अनुष्का शर्माच्या अतिमादक अदा पाहून माझा श्वास जणू रोखला गेला. काश्मीरमध्ये राष्ट्रीय एकात्मतेला इतका मादक आयाम मिळाला आहे, याची मी कल्पनाही केली नव्हती.


अनुष्का शर्माने या दृश्यामध्ये कोणते कपडे घातले आहेत याच्याशी मला काही देणे-घेणे नव्हते. अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थिनींनी कोणते कपडे परिधान करावेत, त्यांनी आपले आयुष्य कसे घडवावे याचे आदेश त्यांना काही जण देत होते. अर्थात या आदेशांविरोधात त्या विद्यार्थिनींनी गेल्या आठवड्यात जोरदार आवाज उठवला होता. मात्र ‘जब तक है जान’ चित्रपटात अनुष्का शर्माने ज्या पद्धतीने ठुमके घेतले आहेत, ते पाहणे मला असह्य झाले. मात्र, तशा पद्धतीची दृश्ये चित्रपटात हवी हा दिग्दर्शकाचा अट्टहास असणार. कित्येक लाख रुपयांची कमाईही करणारा हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरला. अनुष्का शर्मा नृत्यनिपुण कलाकार नाही, असे मला वाटते. पण ब-याच लोकांना हे मत मान्य होणार नाही, याची मला कल्पना आहे.


काश्मीरमध्ये कितीही आवर्तने आली तरी मूळ काश्मिरी संस्कृतीचे अस्तित्व कायम राहायलाच हवे, असे माझे मत आहे. इस्लाम व हिंदू संस्कृतीचा अनोखा संगम काश्मिरी संस्कृतीत झालेला आहे. त्यामुळे काश्मिरी संस्कृती नष्ट होता कामा नये, यापुरते गिलानींच्या विचाराशी मी सहमत आहे. गेल्या काही दशकांपासून मूळ काश्मिरी संस्कृती कोप-यात ढकलली गेली त्यामागे काही ठोस कारणे असून त्यातील बरीचशी राजकीय आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद टिपेला पोहोचलेला होता. त्या काळात काश्मिरी लोकांना कविता, नृत्य, नाटक या गोष्टींचा विचार करण्यासाठी कधी फुरसत मिळाली नाही. मात्र, यालाही आगा शहीद अली यांसारखे काही अपवाद होते. उज्ज्वल भविष्यासाठी ते आपली लेखणी झिजवत होते. हैदरपोरा जामा मशिदीत काही दिवसांपूर्वी गिलानी यांनी केलेले भाषण आणखी काही कारणांमुळेही महत्त्वाचे ठरले आहे. पाकिस्तानी तालिबानी मुस्लिम धर्मतत्त्वांनुसार वागत नसल्याचे तसेच पाकिस्तानच्या हिताविरुद्ध वर्तन करीत असल्याने त्यांचा निषेध गिलानी यांनी केला होता तसेच अफगाणी तालिबानींच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दिला.


पाकिस्तानमध्ये तहरिक-ए-पाकिस्तानचे दहशतवादी ज्या हिंसक कारवाया करीत आहेत त्याबद्दल त्यांचा निषेधच करायला हवा. शियापंथीयांची निर्घृणरीत्या हत्या करणे, शाळेत जाऊ इच्छिणा-या मलाला युसूफझाईसारख्या मुलींवर हल्ले करणे, बाजारपेठेत तसेच मशिदींमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवणे यांसारखी घातपाती कृत्ये हे दहशतवादी घडवत असतात. पाकिस्तानचे अजून पुरेसे इस्लामीकरण झालेले नाही, हे आम्हाला मंजूर नसल्यामुळेच पाकिस्तानात घातपाती कारवाया करतो, असे समर्थन तहरिक-ए-पाकिस्तानकडून केले जाते. हिंदुबहुल भारतामध्ये राहणे अशक्य झाल्यानेच 1947 मध्ये पाकिस्तान या इस्लामी राष्ट्राची निर्मिती करण्यात काही मुस्लिम नेत्यांनी पुढाकार घेतला, अशी या दहशतवादी संघटनेची धारणा आहे.


पाकिस्तानातील तालिबानी असोत किंवा अलिगड मुस्लिम विद्यापीठातील कट्टरपंथी लोक यांच्या विचारांत काही साम्यस्थळे असतात. मुस्लिम महिलांनी नेहमी सलवार-कमीजच परिधान केले पाहिजे. कारण, तो सदर महिलांसाठी सुयोग्य ड्रेस आहे, असे या लोकांना वाटते. असा आग्रह धरणा-या कट्टरपंथी लोकांमुळे जातीयवाद आणखी काटेरी होतो. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसारख्या जातीयवादी संघटनाही हिंदू महिलांनी कोणता पेहराव घालावा किंवा घालू नये याविषयी मतप्रदर्शन करताना दिसतात. एक प्रकारे मनुस्मृतीच पुन्हा या महिलांवर लादू पाहतात.
‘जब तक है जान’मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने ज्या पद्धतीचे कपडे परिधान केले आहेत त्यावर कोणीच आक्षेप घेण्याचे कारण नाही. तिचे हे स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अन्य लोकांनी चालवलेल्या आक्रमणापासून काश्मिरी संस्कृतीला वाचवायला हवे या गिलानी यांनी काढलेल्या उद्गारांना माझा पाठिंबा आहे. काश्मीरमधील दल लेक वाचायला हवा, अतिक्रमणापासून केशराची शेते वाचण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पृथ्वीवरचे नंदनवन असलेल्या काश्मीरने पुन्हा एकदा कात टाकणे आवश्यक आहे. यासाठी गिलानी पुढाकार घेतील का?