आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacques Kallis Reitres From All Formats Of Cricket

अलविदा जॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
90 च्या दशकानंतर आधुनिक दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटचा इतिहास लिहायचा झाल्यास कॅलिसचे कर्तृत्वच पहिले लिहावे लागेल इतका हा खेळाडू महान होता.

आयसीसीच्या कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जॅक कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती क्रिकेटप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी घटना म्हटली पाहिजे. भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने तर जॅक कॅलिसच्या कर्तृत्वाला सलाम करताना असे म्हटलेय की, ‘जॅक आमच्या पिढीचा गॅरी सोबर्स होता’ आणि द्रविडच्या म्हणण्यात तथ्यही आहे. कारण वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये 11 हजारांहून अधिक धावा व अडीचशेहून अधिक बळी घेणारा कॅलिस हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. शिवाय गेल्या शतकातल्या वॉल्टर हॅमंड व गॅरी सोबर्स या दोन महान अष्टपैलू क्रिकेटपटूंनंतर जॅक कॅलिस हा असा एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे की, ज्याची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 50 व गोलंदाजी सरासरी 20 च्या पुढे आहे. आपल्या 19 वर्षांच्या प्रदीर्घ करिअरमध्ये कॅलिस नेहमीच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचा. त्याची अंगकाठी जाड वाटत असली तरी त्याचे क्षेत्ररक्षणामधील चापल्य नेत्रदीपक होते. दुसरी स्लिप त्याची आवडती जागा असायची, पण कॅलिसमधील अष्टपैलुत्व जगापुढे आले ते त्याच्या मध्यम द्रुतगती गोलंदाजीमुळे. या अष्टपैलुत्वामुळे त्याने 1998-2002 हा काळ प्रचंड गाजवला. या काळात तो आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये अग्रेसर होता. अत्यंत संयमी अशा कॅलिसची तंत्रावर जबरदस्त हुकुमत होती. मैदानावरील त्याचे स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, पूल किंवा उंच फटके पाहणे हा अवर्णनीय आनंद असे. दक्षिण आफ्रिकेच्या यशात त्याचा नेहमीच सिंहाचा वाटा होता. मैदानावरची त्याची खिलाडूवृत्ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आदर्श होता. वर्णद्वेषाच्या काळ्या अध्यायातून 1992 मध्ये दक्षिण आफ्रिका बाहेर पडत असताना 1999 मध्ये मॅच फिक्सिंगचे वादळ थेट या देशाच्या अस्मितेवर आदळले. या वादळात या देशाच्या नसानसात असलेली क्रिकेटमधील गुणवत्ता अंतर्धान पावते की काय, अशी परिस्थिती आली होती, पण कॅलिसच्या नेमक्या याच काळातील बहरणार्‍या कामगिरीने हा देश पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहिला व नंतरचे दशक कॅलिसचे होते. 90 च्या दशकानंतर आधुनिक दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटचा इतिहास लिहायचा झाल्यास कॅलिसचे कर्तृत्वच पहिले लिहावे लागेल इतका हा खेळाडू महान होता.