आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय जवान ! (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड राज्यातील केदारनाथ परिसराला नैसर्गिक आपत्तीचा इतका भीषण तडाखा बसला आहे की येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनेक दिवस नाहीत तर अनेक महिने लागू शकतात. भूगर्भशास्त्राच्या काही अभ्यासकांच्या मते केवळ केदारनाथचा परिसर नव्हे तर उत्तराखंड राज्यातील अनेक जिल्हे या आपत्तीत कमालीचे उद्ध्वस्त झाले आहेत. पण आपल्याकडच्या मीडियाला आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपला याचे सोयरसुतक दिसत नाही. त्यांनी त्यांची सदसद्विवेकबुद्धीही गहाण ठेवलेली दिसते. सध्या मीडियाला, विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाला कोणतीही आपत्ती साजरी करण्यासाठी खलनायक लागतो. खलनायक म्हणून त्यांना अनायासे केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार मिळाले आहे. शिवाय मीडियाचे डार्लिंग, सर्वशक्तिमान असे नरेंद्र मोदी साथीला असल्याने या सर्वांना चेव आला आहे.

न्यूज चॅनलचा कोणताही पत्रकार घटनास्थळी गेल्यावर या आपत्तीकडे नैसर्गिक आपत्ती म्हणून न पाहता हे जसे काही सरकारने घडवून आणले आहे, अशा पद्धतीने या घटनेचे वृत्तांकन करत आहे. आपद्ग्रस्तांना सरकारी मदत वेळेवर पोहोचली नाही एवढ्या मर्यादित कक्षेत या घटनेकडे न पाहता निसर्गाच्या कोपापुढे मानवी प्रयत्न अपुरे आहेत हे समजून घेतले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचार यंत्रणेची सूत्रे हाती आल्यानंतर मोदींनी हॉलीवूडमधल्या सुपरमॅन, रॅम्बोसारख्या सुपरहीरोची वस्त्रे अंगी घातली आहेत. या सुपरहीरोंकडे दिव्यदृष्टी असते, शिवाय दुर्जनांचा नायनाट करणारी अद्भुत शक्ती असते. मोदींनी आपल्या हवाई सर्वेक्षणात कोणता गुजराती आहे, कोणता अन्य राज्याचा आहे हे आपल्या दिव्यचक्षूने ओळखले. आमच्या मते या सुपरहीरोला दिव्यदृष्टीही असावी तसेच दिव्यज्ञानही असावे. म्हणजे केदारनाथ पुन्हा नैसर्गिक कोपाचा बळी ठरू नये म्हणून त्यांनी हा परिसर गुजरातमधील अक्षरधाम मंदिरासारखा चकचकीत करण्याचे आश्वासन आताच मतदारांना दिले आहे. म्हणजे मोदी एकीकडे मतांची बेगमी करताहेत, तर दुसरीकडे ते निसर्गाला आव्हान देत आहेत.

एकूणच इलेक्ट्रॉनिक मीडियाची, भाजपची आणि मोदींची ही बौद्धिक दिवाळखोरी इतकी बेबंद झाली आहे की या आपत्तीत हजारोंचे प्राण वाचवणा-या भारतीय लष्कराच्या, इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या हजारो जवानांच्या अतुलनीय कामगिरीचे कोडकौतुकही करण्याचे भान यांना राहिलेले नाही. वास्तविक हिमालयाच्या कुशीतली जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारखी राज्ये पर्यटनासाठी जगभर लोकप्रिय असली तरी ती अजूनही दुर्गम आहेत. या राज्यांची भूरचना, भूशास्त्र, हवामान, वनसंपदा इतर राज्यांपेक्षा संपूर्णत: वेगळी आहे. ज्या उत्तराखंड राज्याला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे ते राज्य हिमालयाच्या शिवालिक रांगांमध्ये वसलेले आहे. हिमालय हा आपल्या सह्याद्रीपेक्षा तरुण पर्वत असल्याने या प्रदेशातील भूरचना नेहमी बदलत असते. त्यामुळे शिवालिक पर्वतरांगांमधील डोंगरही ठिसूळ आहेत. या डोंगरांची झीजही वेगाने होते. त्यातच हिमालयातून येणा-या नद्या वेगवान असल्याने दरडी कोसळणे, गाळ वाहून जाणे यासारख्या घटना येथील दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. साहजिकच अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ढगफुटी, भूकंपासारख्या प्रलयंकारी आपत्तीची भर पडल्यास मानवी सामर्थ्य दुबळे ठरू शकते. याचे प्रत्यंतर गेल्या काही दिवसांत येथे आले आहे. आपल्या जवानांचे कौतुक यासाठी करायला हवे की, अत्यंत दुर्गम भागात वेळेवर पोहोचून या जवानांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले तसेच येथील परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली आणली.

आज जे शेकडो भाविक, पर्यटक वाचले आहेत ते मोदींच्या हेलिकॉप्टरमुळे किंवा हवाई पाहणीमुळे नव्हे, तर या जवानांच्या जिगरबाज व दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे वाचले आहेत. आपल्या जवानांनी हा हिंदू, हा मुस्लिम, हा गुजराती, हा पंजाबी असा भेदभाव केला नाही. हजारो वृद्ध पुरुष-स्त्रिया, लहान मुले, अपंग, गरीब, श्रीमंत यांचे प्राण वाचवताना या जवानांनी स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. मोदी जर गुजरातींचे प्राण वाचवले अशी टिमकी वाजवतात आणि मीडियामध्ये ही टिमकी दुप्पट आवाजात वाजवली जाते, तर मोदींनी गुजरात दंगलीवेळी सामान्यांचे प्राण वाचवण्याचे साहस, औदार्य का दाखवले नाही? भाजपला एकंदरीत केदारनाथचा प्रलय हा काँग्रेसविरोधातला आपला पहिला विजय वाटू लागला आहे. त्यामुळे या साहसवादाच्या नादात ते लष्कराच्या भारतीयत्वावर, सेक्युलर भूमिकेवर काहीच प्रश्न उपस्थित करू शकले नाहीत. लष्कराच्या एका अधिका-याने एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना असे म्हटले की, कोणतेही मदतकार्य युद्धापेक्षा कठीण असते. युद्धात शत्रूला टिपणे व त्याचा भूप्रदेश ताब्यात घेणे अशी उद्दिष्टे असतात, पण मदतकार्यादरम्यान प्रत्येक जवानाला आपद्ग्रस्तांमध्ये प्रथम आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. या प्रत्येकाचा जीव वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. आपल्या लष्कराने केदारनाथमध्ये प्रलय आल्यानंतर दोन दिवसांत संपूर्ण तयारी करून थेट घटनास्थळी सर्वशक्तीनिशी स्वत:ला झोकून दिले. या जवानांनी अक्षरश: तासा-दोन तासांत आपत्कालीन पूल बांधले.

दोरीच्या साहाय्याने शेकडोंचे प्राण वाचवले. दळणवळण सुरळीत व्हावे म्हणून कोसळलेल्या दरडींची हजारो टन माती हातावेगळी केली. खराब हवामान असतानाही हजारो पर्यटकांना डेहराडूनमध्ये आणण्यासाठी विमानांच्या फे-या मारल्या. दरडीमध्ये, मातीच्या ढिगा-याखाली अडकलेल्यांची सुटका करून त्यांना पाठीवरून सुरक्षित स्थळी नेले. लष्कराच्या दृष्टीने या आपत्तीत सापडलेला प्रत्येक जण प्रथम भारतीय होता. मोदींना वाटते त्याप्रमाणे तो गुजराती नव्हता. हे स्पष्ट दिसूनही सरकार कृतिशून्य आहे, असा चॅनलच्या बूमपुढे अहोरात्र जप करणा-या भाजपने व मोदींनी लष्कराच्या साहसाचे, त्यांच्या अतुलनीय कामगिरीचे कौतुक जाणीवपूर्वक केले नाही. एका अर्थाने त्यांनी आपल्या सैन्यावरही अविश्वास दाखवला. लष्कर-पोलिस यंत्रणा या सरकारच्या भाग असतात हे मोदींना व भाजपला माहीत नाही, असे नाही. पण ‘इमेज बिल्डिंग’च्या प्रयत्नांत मश्गुल असलेल्या मोदी आणि भाजपचे वास्तवाचे भान सुटले आहे.