आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामाजिक संगरातील लढवय्या सैनिक: पँथर अॅड. रमेशभाई खंडागळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅड. रमेशभाई खंडागळे यांना समता सैनिक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. - Divya Marathi
अॅड. रमेशभाई खंडागळे यांना समता सैनिक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
औरंगाबादमधील राजकीय-सामाजिक कार्यकर्ते अॅड रमेशभाई खंडागळे यांचा आज (रविवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्त आयोजित जयभीम फेस्टिव्हल या देखण्या सोहळ्यात समता सैनिक म्हणून सत्कार होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या वाटचालीचे साक्षिदार प्रसिद्ध साहित्यिक सुरेश साबळे यांनी घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा...
या जगात अस्सल, कलदार, शाबूत माणूस भेटत नाही, विचारक तथा निरिक्षक भेटत नाही ही अनेकांची खंत आहे. ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं, असे पाय शोधुनही सापडत नाही. खूप परिश्रमानंतर 4 अथवा 5 अंकी आकडा ओलांडल्यानंतर एखादाच वाळवंटातील ओअॅसिस सारखा हाती लागतो. कारण जो तो आपल्याच तडजोडीच्या दुनियेत गुंतूण पडला आहे. अशा या काळात सर्वच क्षेत्रात निष्ठा, बांधिलकी आणि सार्वजनिक क्षेत्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी फारशी कुणामध्ये दिसत नसतांना फारच थोड्या व्यक्ती नजरेत भरतात त्यापैकी औरंगाबाद येथील अॅड. रमेशभाई खंडागळे यांचा उल्लेख करता येईल.
मराठवाडा नुकताच निजामाच्या राजकीय गुलामगिरीतून स्वतंत्र झाला होता. परंतू माणसिक गुलामगिरी मात्र मराठवाड्यातील सामाजिक मनाने फार कमी प्रमाणात झटकलेली होती. 1948 च्या रझाकाराविरुद्धच्या पोलिस अॅक्शन नंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमारेषेवर असणारे अनेक नातेसंबंध परस्परांकडे स्थलांतरीत होत होती. अशा काळात पूर्वीचे औरंगाबाद आमि आताचे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात येत असलेल्या वडशेद या मुलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या आडवळणाचे गाव. वास्तविकता त्या काळात भोकरदन तालुक्यातील बाभुळगावचे माजी मंत्री भगवंतराव गाडे यांचे सत्ताधारी राजकारणात चांगली उठबस होती. भगवंतराव गाडेंची तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांशी चांगली सलगीही होती. तरीही वडशेद-देहेड-वरुढ-रेलगाव-टारकळस आदी खेडी मुलभूत नागरी सुविधांपासून वंचित होती. अशा पैकी वडशेद या गावात अत्यंत प्रतिकुल आर्थिक परिस्थितीत जन्मलेल्या खंडागळेंनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वडशेद व भोकरदन येथे घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या नागसेन वनातील मिलिंद विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला.
जगण्याच्या वाटेत अंधाराचे अडथळे निर्माण करणाऱ्यांसोबत उजेडाशी सलगी करणाऱ्यांचं कुठलच नातं नसतं. ज्यांच्या मनगटात, कार्यकर्तृत्वात अंधारवाटा उजळून काढण्याची धमक असते तेच सामाजिक समतेच्या संगरातील क्रांती-सप्तक्रांतीसाठी लढणारे, विषमतेविरुद्ध यलगार पुकारणारे, भय-भेदाविरुद्ध मैदानातील लढे उभारणारे निर्भिड नेते, सच्चे कार्यक्रते, सैनिक ठरत असतात. त्यासाठी देज निस्तेज निर्जिव समाजाला जगण्याची उर्मी देतात, त्यांच्यामध्ये अॅड. रमेशभाई खंडागळे यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. कारण त्यांनी समाजात, विद्यार्थ्यांत, आणि कार्यकर्त्यांत वावरतांना सतत
दाबून दंभ सारा, माणूस होत जा...
गरजूस तू कधीही, आवाज देत जा... !
हा संदेश देताना स्वतःही हीच भूमिका निरपेक्षपणे जपण्याचा प्रयत्न केला, आजही करत आहेत, यापुढेही करतील. हे व्रतस्तपण जपण्यासाठी त्यांनी अनेकदा जाहिर आंदोलनाचे नेतृत्व केले. 1973 मध्ये मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवरील अन्याय अत्याचाराविरोधात वाचा फोडण्यासाठी दलित पँथरच्या वतीने प्राचार्य डॉ. भाऊ लोखंडे, प्राचार्य शिंदे यांच्याविरुद्ध आंदोलनाचे नेतृत्व केले. याच दरम्यान मे 1973 मध्ये रमेशभाई यांच्या नेतृत्वाखाली भोकरदनमध्ये दलित पँथरची स्थापना करण्यात आली. मला वाटते यापूर्वी दलित पँथरचा चेहरा हा महानगरीय होता. भोकरदन तालुक्यातील स्थापनेनिमित्ताने ग्रामीण भागातील ही दलित पँथरची प्रथम शाखा असावी, कारण त्या काळात ग्रामीण भागात पँथरचे काम करणे म्हणजे तळ हातावर शिर घेऊन काम करावे लागत असे. याच दरम्यान भोकरदन तालुक्यातील देहेड येथे दलित समाज स्मशानभूमी आणि निळा झेंडा प्रकरणी वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भोकरदन ते देहेड रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला होता. देहेड गावामध्ये मोर्चा पोहोचल्यानंतर संपूर्ण गावातून बँड पथकासह वाजत-गाजत व प्रचंड घोषणाबाजीसह मिरवणूकीद्वारे निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण करुन सभा संपन्न झाली. या माध्यमातून त्यांनी देहेड गावातील तत्कालीन दलित समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना धीर आणि दिलासा देऊन मोर्चा यशस्वी केला होता. नंतर पुढे हे प्रकरण राजा ढाले आणि नामदेव ढसाळ हे औरंगाबाद येथे आले असतांना त्यांच्या समोर मांडेल. अशा रितीने एका अत्यंत आडवळणाच्या आणि दुर्लक्षीत गावाच्या दलित समाजाची समस्या महाराष्ट्राच्या नेतृत्वासमोर नेण्याचे काम रमेशभाई खंडागळे यांनी केले.
अॅड. रमेशभाई खंडागळे औरंगाबाद येथील सद्यस्थितीत बहुश्रृत व्यक्तीमत्व म्हणून तसेच संयमी विचार आणि सामाजिक सांस्कृतिक प्रकृतीची जोपासना करतांना पुरोगामी व समताधिष्टीत समाजरचना अस्तित्वात यावी म्हणून सतत त्यांचे चिंतन आणि मनन सुरु असते. यासाठी त्यांनी विद्यार्थी दशेपासून विविध प्रकारचे साहित्य वाचन केले. त्यासाठी कथा, कविता, समिक्षा, वैचारिक आणि विज्ञाननिष्ठ विचारधारा प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने त्यांच्या वाचनाची व्यासंगता वाखानण्याजोगी आहे. अॅड. रमेशभाई खंडागळे हे आज जरी एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ओळखले जात असले तरी ते एक चिंतनशिल लेखक, विचारक आणि सतत चिंतन-मननाद्वारे समविचारी विविध राजकीय पक्षात कार्यरत नेतृत्वाशी सकारात्मकतेने चर्चा करतांना दिसतात. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नाही. तसेच माणसाशी कधीच कायम त्यांनी वैचारिक दूस्वासही केलेला नाही. याला कारणही तसेच आहे, त्यांनी विद्यार्थी दशेत औरंगाबाद येथे येणाऱ्या विविध विचारधारेच्या विचारवंतांचे जसे साहित्य वाचले तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची प्रत्यक्ष भाषणेही ऐकली मग त्यात जयप्रकाश नारायण असो, जॉर्ज फर्नांडीस, ना.ग. गोरे, भाई वैद्य, कुमार सप्तर्षी यासह आंबेडकरी विचारधारेंच्या जागितक स्तरावरील विचारवंतांपासून अगदी ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचे मनोगतही त्यांनी समजून घेतले म्हणूनच त्यांची प्रगल्भता त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत असते.
अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी दलित पँथरमध्ये काम करतांना गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वात त्यांची जडण-घडण होत असतांना राजा ढाले, प्रा. अरुण कांबळे अशा विविध विचारांनी भक्कम असलेल्या साहित्यीक विचारवंतांच्या सतत सहवासात राहिल्याने त्यांच्यातील वैचारिक भक्कमपणा वाढत गेला. त्यामुळे वकृत्व आणि नेतृत्व दोन्हीही एकाच वेळी विकसित होत गेले. याकाळात दलित विद्यार्थी शिष्यवृत्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन धरमे, निदर्शने, मोर्चे आणि सत्याग्रह तसेच जाहिर सभा संमेलनातून अग्रभागी राहून दलित समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात आक्रमकपणे प्रतिकार करतांना जनसंघटन उभे केले. पुढे काही दिवसांनी त्यांनी भारतीय दलित पँथरची विद्यार्थी संघटना असावे ही संकल्पना मांडली व ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय विद्यार्थी संसद या नावाने विद्यार्थी संघटन उभे केले. कामगारांची संघटना त्यांनी उभी केली होती. हे विद्यार्थी संघटन दलित पँथरच्या संघटनेला पूरक ठरावे हा शुद्ध हेतू त्यांचा कायम राहीला. त्यांनी 1974 च्या मराठवाडा विकास अंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला तसेच त्यासाठी त्यांनी विविध आंदोलनात सहभागी होऊन पोलिसी अत्याचारासही समोरे जावे लागले. 1977 मध्ये भारतीय दलित पँथरच्या औरंगाबाद शहराध्यक्ष पदी रमेशभाई खंडागळे यांची निवड झाली. आणि त्यांच्या कामास येथून गतीही प्राप्त झाली. त्याकाळात कोणत्याही चळवळीत भाई हे नाव अत्यंत आदरयुक्त अशा संबोधनाने घेतले जात होते. अॅड. खंडागळे यांच्या कासाची निष्ठा तत्परता आणि बांधिलकी या सर्वांची गोला बेरीज करुन तत्कालिन कार्यकर्त्यांनी रमेशभाई हे नामाभिदान आदराने लावले. पुढे रमेशभाई खंडागळे यांनी मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन, गायरान जमीनीचे दिलत समाजास वाटप करण्यात यावे त्या गायरान जमिनिचे पट्टे त्यांच्या नावे करण्यात यावे यासाठी विविध आंदोलने, प्रचंड मोर्चे, औरंगाबाद, मुंबई तसेच नागपूर आधिवेशनावर केले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावे या मागणीसाठी प्रथम पँथरने सुरु केलेल्या आंदोलनास पुढे जनआंदोलनाचे स्वरुप मिळाले. विद्यापीठ आंदोलनाच्या नामांतर लढ्यात गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली 1977 ते 1994 पर्यंत अनेक मोर्चे, परिषदा, सभा, सत्याग्रहामध्ये अॅड. खंडागळे प्रामुख्याने सहभागी राहिले. नांदेडमध्ये जेव्हा पँथर गौतम वाघमारे यांच्या आत्मदहनानंतर कार्यकर्त्यांनी गंगाधर गाडे आणि रमेशभाई खंडागले आल्याशिवाय गौतम वाघमारेच्या मृतदेहाला हात लावू देणार नाही अशी भूमिका पोलिसांसमोर घेतली, तेव्हा रमेशभाई खंडागळे यांच्या पायाला प्लॅस्टर असतांनाही ते नांदेड येथे गेले होते. नामांतराच्या एका आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची चिकलठाणा विमानतळावर गाडी आडविण्याबाबत पँथरने ठरविले होते. त्यावळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतांनासुद्ध पोलिसीकडे तोडून रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला, कार्यकर्ते व विद्यार्थी रस्त्यावर आडवे पडून मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला होता. परिणामी त्या सर्वांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. 1982 मध्ये मुंबईत नामांतरासाठी प्रचंड सत्याग्रह झाला होता. त्या सत्याग्रहात महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्त, महिला, विद्यार्थी सहभागी झाले होते. तेव्हा त्या आंदोलनातील सर्व सहभागींना येरवाडा तुरुंगात 15 दिवस मुक्काम करावा लागला होता. त्यामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, कॉ. मनोहर टाकसाळ, शेकापचे शरद गव्हाणे, जनार्दन तुपे, निशिकांत भालेराव यांच्यासह पँथरचे रतनकुमार पंडागळे, पप्पु गायकवाड, श्रावण गायकवाड, मारुती साळवे आदींसह हजारो पँथर कार्यकर्ते येरवडा तुरुंगात होते. या 15 दिवसांमध्ये विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद, उपोषणे अशा विविध कार्यक्रमाचे संयोजन करण्याचे काम पँथरच्यावतीने रमेशभाई खंडागळे करीत होते.
अशा या आंदोलनात कार्यरत असताना त्यांनी स्वतःची, परिवाराची कधीही पर्वा केली नाही. याचामी अनेक घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यांचे मोठे बंधू जनार्दन खंडागळे हे सैन्यात नोकरीत होते. त्यामुळे औरंगाबाद येथे त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देणारे नातेवाईक कोणी नसले तरी, पँथरचे कार्यकर्ते ही जबाबदारी सांभाळत. त्यांचे वाचन, चिंतन जसे बोलके तसेच त्यांचे अक्षरसुद्धा अत्यंत ठळक आणि बोलके असे आहे. त्यांनी प्रारंभी जायकवाडी प्रकल्प पैठण येथे सिव्हील ड्राप्ट्समनची नोकरी लागली. परंतू चळवळीच्या निमित्ताने अर्धा अधिक वेळ ते औरंगाबाद येथे तथा मोर्चे, धरणे आंदोलनाच्या निमित्ताने अधिकवेळ ते बाहेरच राहात. शेवटी ही नोकरी त्यांनी सोडली. पुढे औरंगाबाद नगर पालिकेत त्यांना सबवर्शीयरची नोकरी लागली. याकाळात त्यांचे लग्न सिंदखेड राजा येथील भालेराव परिवारातील कन्या आशा हिच्याशी झाले. याकाळात रमेशभाई यांना चळवळीसाठी हातभार लागावा म्हणून पत्नी सौ. आशा यांनी नर्सिंगचा अभ्यासक्रम अपूर्म सोडून अंगणवाडी सेविका म्हणून काम करु लागल्या. याकाळात त्यांच्याकडे भाऊ, बहिण, त्यांची मुले-मुली शिक्षणाच्या निमित्ताने राहात. सुरुवातीला ते औरंगाबाद येथील काजीवाडा येथे किरायाच्या खोलीत राहात. या काळात त्यांचे घर म्हणजे मुला-मुलींचे वसतीगृहासारखेच भासायचे. येथे सतत कार्यकर्ते, नातेवाईक व त्यांच्याकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अवागमन असायचे. त्याला कारण असे होते की त्यांनी ठरविलेच होते...
ज्योत-ज्योतीने पेटवू, करु प्रकाश सोहळा
इवल्याशा पणतीने, होई अंधार पांगळा..
.
असा दृढ निश्चय घेऊन आर्थिक हालाखीच्या परिस्थितीतही त्यांनी जशी समाजसेवा सोडली नाही, तसाच चळवळीवरचा विश्वासही ढळू दिला नाही. म्हणूनच असे म्हणावेशे वाटते की, समाजकारण, राजकारण, सांस्कृतिककारण यांना पूर्वीचे निकष आज लागू पडत नसतांनाही काही माणसं सामाजिक समतेच्या संगरात आपली नितळ आणि अढळ निष्ठा तसूभरही ढळू देत नाही. आपली वाट आपल्या तेजाने आणि कर्तृत्वाने समृद्ध करण्याचा प्रयत् करीत असतात. त्यापैकी अॅड. रमेशभाई खंडागळे यांच्या अशा सकस प्रगल्भ समृद्ध वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
लेखक हे प्रसिद्ध दलित साहित्यिक आहेत.
(9850380598)
बातम्या आणखी आहेत...