आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतकी ‘आप’पाखड कशासाठी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पार्टीला झोडपण्याचा सध्या एक कार्यक्रम सुरू झाला आहे. या पार्टीला कोणी झोडपूच नये असे सुचवायचे नाही. पण एकाएकी इतक्या त्वेषाने, ताकदीने अन् तयारीने हा झाडा चालला की त्याची मीमांसा व्हायलाच हवी. भीतीच वाटावी इतक्या तिडिकीने ‘आप’ वर हल्ले होऊ लागले. लेख व अग्रलेख यांचा थयथयाट केवळ असह्य होता. त्यांचा रोख संधी सोडायची नाही आणि जमेल तेवढा मार द्यायचा असाच वाटला. ‘आप’चा वर्षापूर्वीचा जन्म, त्यांची निवडणूक आणि त्यांना अनपेक्षित मिळालेली दिल्लीची सत्ता या गोष्टी कोणी ध्यानात घेतल्याच नाहीत. त्याचबरोबर दिल्ली महानगरपालिकेत असलेली भाजपची सत्ता, दिल्ली विकास प्राधिकरणावर असलेली काँग्रेसची पकड, नोकरशाहीचा असहकाराचा पवित्रा, राज्यपालांची मुख्य विरोधकांची भूमिका, सत्ताधार्‍यांचा संपूर्ण नवखेपणा आणि कावे-कारस्थाने यात पटाईत असलेले दोन्ही राष्‍ट्रीय पक्ष या गोष्टी कोणी लक्षात घेतल्या नाहीत. बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेतल्या कठोर, क्रूर स्पर्धेची कसोटी लावून सार्‍यांनी ‘आप’ ची परीक्षा घेतली आणि तिला निष्ठूरपणे नापासही करून टाकले. अग्रलेख लिहिणार्‍या पत्रकारांनी अनेक पैलू तपासून आपली मांडणी केली हेही दिसले नाही. तरीही जो आवेश दिसून येत होता आणि तो पवित्रा बाजारातल्या स्पर्धेत दयामाया नसते हेच ठसवायचा होता. एक बाजू अपेक्षाभंग झालेल्यांची होती. त्यांची ही दशा जणू दुर्दशा झाल्यासारखा शोक त्यांनी व्यक्त केला. ‘आप’च्या मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना सत्ता घेण्यापूर्वी पोलिस खाते केंद्रीय गृहखात्याशी जोडल्याचे माहिती नव्हते का? प्रत्येक विधेयक नायब राज्यपालाकडे मंजुरीसाठी आधी पाठवावे लागते हे कळले नव्हते का, असे खडे सवाल केले गेले. आपल्या जाहीरनाम्यात दिल्लीला परिपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची तयारी दाखवणार्‍या ‘आप’ला या गोष्टी नक्कीच माहिती होत्या. त्या माहीत असूनही नसल्यासारखे दाखवत होते काही टीकाकार! कारण ‘आप’ सरकारला बहुमत नव्हते व काँग्रेससारख्या त्याच्या विरोधकानेच त्याला टेकू दिलेला होता हे नजरेआड करून त्यांना ‘आप’वर प्रहार करायचे होते. ‘मग सत्ताच नव्हती हातात घ्यायची. पुन्हा निवडणुकीची मागणी करायची होती आपवाल्यांनी,’ असा सल्ला अजूनही ऐकू येतो. कारण उघड आहे. ‘आप’ वाल्यांनी रात्र-रात्र जागून या मुद्द्याचा विचार केला आणि जनतेचा कौल घेऊन काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा ठरवला.
तिसरा टीकाकारांचा प्रकार ‘राजकारण बावळटांचा व अडाण्यांचा खेळ नसतो,’ असे मानणार्‍यांचा होता. त्यांनी आरंभापासूनच ‘आप’ म्हणजे आदर्शवादी, स्वप्नाळू, भाबड्या लोकांचा समूह असून भ्रष्टाचार वगैरे समस्या कधीही नष्ट होणार्‍या नसतात, असेही सांगायला सुरुवात केली होती. जात, वर्ण, धर्म, भाषा, प्रदेश यांचे निवडणुका व राजकारण यातले स्थान महत्त्वाचे असतेच. परंतु ते अटळ असल्याचा प्रत्यय दिल्लीच्या निवडणुकीत आला नाही. तसेच राजकारण हा कारस्थान्यांचा प्रांत असा प्रचार करण्याने सज्जनमार्गी मंडळी राजकारणात येत नव्हती तो नवा मध्यमवर्ग ‘आप’ मुळे जोडला गेला. या नव्या मध्यमवर्गाच्या संतापाविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कारण या मंडळींना केजरीवाल मुख्यमंत्री असूनही रस्त्यात धरणे धरून बसले, याचा इतका राग आला की त्यांनी त्यांचे नावच टाक ले. केजरीवालांनी भयंकर अपराध केला, असे यांना वाटते. धरणे-सत्याग्रह-जेल भरो ही नापसंती म्हणायची की भयगंड? हा मध्यमवर्ग इतका हळवा का झाला? आपण जगत असलेली अस्थिर, असुरक्षित जीवनपद्धती एखाद्या सरकारने जगू नये आणि त्यांना मिळालेली सत्ता हातून गमावू नये असा त्यांच्या संतापाचा अर्थ होता. संधीसाधूपणाचा अर्क केजरीवालांच्या धरण्यावरील टीकेतून उतरलेला आढळला. दिल्ली पोलिस प्रकरणात एका मुख्यमंत्र्याची मागणी अमान्य केल्याबद्दल या वर्गाने केंद्रीय गृहमंत्र्यांना जाब नाही विचारला. जनलोकपाल विधेयकाबाबत ‘आप’चे वर्तन घटनाबाह्य आहे याचीच घसाफोड हा मध्यमवर्ग करत बसला.
चौथा प्रकार सत्यवादी लोकांचा; त्यांच्या मते तर ‘आप’ने फार खोटारडेपणा केला. जाहीरनाम्यात दिली ती आश्वासने सत्तेत गेल्यावर पूर्ण केली नाही, असा त्यांचा रोख होता. स्वत: तेवढे शुद्ध आणि बाकीचे भ्रष्ट असा दावाही यांनी आरंभला. तडजोडीच्या राजकारणात काही मुद्दे बाजूला ठेवून ‘आप’ सरकारने काही आश्वासनांची पूर्तता केली. अडवणुकीच्या राजकारणाचा खेळ खेळतानाही ‘आप’ने स्वत:ची टिमकी वाजवली नाही. तरीही‘आप’ला दांभिक साधुसंत म्हणण्याचा अपप्रचार केला गेला. खूपशी घाई, बरीचशी नासमज आणि जाणवणारी अदूरदृष्टी ‘आप’ सरकारने 49 दिवसांत देशाला दाखवली. परंतु त्यांना कोणत्या राजकीय पेचातून जावे लागले ते कोणी पाहिले नाही. ‘आप’च्या चुका अथवा सरकारचे अनिर्णय अक्षम्य होते असा सूर सर्वांनीच व्यक्त केला. अशाच भावनांचा आधार घेऊन हुकूमशहा सत्ता बळकावत असतो आणि लोकांच्या ‘वैफल्याचा’ तो लाभ घेतो. नरेंद्र मोदी आणि भाजपचा एककलमी कार्यक्रम तोच आहे. सारे ‘पढेलिखे लोग’ असा थयथयाट करत असताना दिल्लीकर मात्र गप्प बसून आहेत. त्यांना ‘आप’ला परत संधी द्यावीशी वाटते आहे का? ती जरूर द्यावी. तरीही ‘आप’ चुकलीच तर तिला शिक्षाही द्यावी.