आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महा’जन दृष्टी !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दारूला महिलेचे नाव दिल्यास ती बाजारात उत्तमरीत्या खपते, एवढेच नव्हे, तर अशा नावाच्या दारूला मद्यपींच्या बाजारात प्रचंड मागणी वाढते, असा शोध लावला. ज(ळ)डगाव जिल्ह्यातील जामनेरच्या गिरीशभाऊंना याची माहिती कुठून व कशी मिळाली हे त्यांनाच ठाऊक. एक मात्र खरे की, महिलांविषयी केलेल्या अशा वादग्रस्त विधानामुळे ते चांगलेच गोत्यात आले आहेत. विरोधी पक्षांसह भावना दुखावलेल्या महिलांच्या तमाम संघटनांनी पुढाकार घेत भाऊंच्या प्रतिमेला जोडे मारायला सुरुवात केली. असे जोडे मारणे स्वाभाविकही आहे. कारण गिरीशभाऊ यांच्यासारखा लोकप्रतिनिधी हा ज्येष्ठतेच्या व्याख्येत अगदी वरच्या पातळीवर आहे. विधानसभेत जामनेर मतदारसंघाचे एक-दोन वेळा नव्हे तर सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून जबाबदारीची अपेक्षा असते. कोणत्याही कामाविषयी असो की सार्वजनिक ठिकाणांवर बोलताना वा वक्तव्य करताना किती तारतम्य बाळगायला हवे, याचे भान बाळगण्याबाबतचा सल्ला भाऊंना देण्याची आवश्यकता मुळीच नाही. जाहीर सभेत बंदूक कमरेला लटकवून भाषण केल्यामुळे एकेकाळी भाऊ राज्यभर चर्चेत आलेच होते. किमान त्या प्रकरणापासून धडा घेऊन पुढच्या काळात भाऊंकडून सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेतली जाईल अशीही अपेक्षा होती.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे म्हणा वा विश्वासू सहकारी म्हणूनही गिरीशभाऊंची ख्याती आहे. त्यामुळे खरे तर त्यांनी अधिकच सजगपणे व जबाबदारीने वागणे क्रमप्राप्त ठरते. गळ्यात ढोल बांधून वाजवणे असो की मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या घोळक्यात तालावर फेर धरून नाचणे ही त्यांची कृती समर्थनीय ठरू शकते. पक्ष कार्यकर्त्यांसह नेहमीच सोबत करणारे वा पाठराखण करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मनधरणीसाठी नाचगाणे ही बाब समाजमनदेखील स्वीकारू शकेल. पण दारूला महिलेचे नाव दिल्यास तिचा खप वाढतो असा दावा करणे हे तर औरच म्हणावे लागेल. कोपरगावचे शंकरराव कोल्हे यांच्या अखत्यारीतील साखर कारखान्यातून उत्पादित होणारी ‘ज्युली’ असो की शंकरराव काळे यांच्या कारखान्यातील ‘भिंगरी’ अन् अन्य कोणाची तरी ‘बॉबी’ या देशी दारूला बाजारात का मागणी आहे, याचा उलगडा महाजन यांनी केला आहे. दारूला महिलेचे नाव दिले की तिची मागणी वाढते यासाठी कोल्हे-काळे यांच्या जुन्या प्रयोगाचा दाखला महाजनांनी नव्या रूपात दिला आहे. एवढ्यावरच न थांबता या महोदयांनी तंबाखूची नावेदेखील महिलांशी संबंधित असून त्यासाठी ‘विमल’चे उदाहरण देतानाच त्यांनाही बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे नमूद केले. 
 
 
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात करताना महाजनांनी देशी दारू विक्री वाढवण्याचा सल्ला जाहीररीत्या दिल्यामुळे तो अधिकच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दारू व तंबाखू यांच्या ब्रँडिंगसाठी महिलांची नावे उपयुक्त असल्याचे महाजन महाशय आवर्जून नमूद करीत आहेत, ही बाब निषेधार्हच म्हणायला हवी. हे ते सभा गाजवण्यासाठी, श्रोत्यांना रिझवण्यासाठी वा गमतीने म्हणत असले तरी समस्त महिलावर्गाविषयी त्यांची काय दृष्टी आहे, हेच त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. भिंगरी, ज्युली वा बॉबी ही स्त्रीलिंगी नावे दारूला देण्याविषयी काँग्रेसच्या तत्कालीन जुन्या-जाणत्या नेत्यांची भूमिका काय होती वा त्यांची काय भावना होती याची वाच्यता आजवर कधी जाहीररीत्या झाली नाही. किंबहुना तशी ती कोणाकरवी झाल्याचेही ऐकिवात नाही. हीच खरं तर काँग्रेसींची काम करण्याची पद्धत होती. महिलांच्या नावे दारू विकून म्हणा की ब्रँडिंग करून डिस्टिलरीचे परवाने असलेले राज्यातील असंख्य कारखाने गब्बर झाले. त्यासोबत त्यांचे कारभारीही गडगंज संपत्तीचे स्वामी झाले. पण त्यांनी कधी यासंबंधी ब्र शब्द काढला नाही. मध्यंतरीच्या काळात अजित पवारांनाही अशीच धरणाकडे जाण्याची लहर आली होती. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची काय गत झाली हे सर्वश्रुत आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे ह.भ.प बबनराव पाचपुते यांनाही एकेकाळी दारू बनवण्याचा ‘मोह’ आवरेनासा झाला होता. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता गिरीशभाऊंचे वक्तव्य तसे म्हटले तर नवीन नाही. एक मात्र वास्तव आहे की, भाजप असो की काँग्रेस, अर्थात पक्ष कोणताही असला तरी पुरुषी नेतृत्वाची मानसिकता म्हणा की महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कमी-अधिक फरकाने एकसारखाच असतो. संस्कारित भाजपच्या गिरीशभाऊंच्या वक्तव्यावरून हेच सिद्ध होते. म्हणूनच मग ज्या ज्या वेळी अशा मंडळींकडून चुका होतात, तेव्हा त्यांच्या नशिबी जोड्यांचा मार हा ठरलेलाच असतो. 

- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...