आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जा रे.. जा रे पावसा...!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ये रे.. ये रे पावसा म्हणून वरुणराजाला साकडे घातले जाते. त्याला पैशाचे आमिष दाखवले जाते. एवढेच नाही तर मान्सून वेळेत दाखल व्हावा यासाठी खान्देशात धोंडी.. धोंडी पाणी दे... म्हणून गावभर मिरवणूक काढली जाते. कधी पंढरीच्या विठोबाला साकडे, तर कधी गोदातीरावर देवच पाण्यात बुडवून ठेवल्याची उदाहरणे आहेत. ही स्थिती वा वातावरण गेल्या वर्षापर्यंत राज्यात सार्वत्रिक होते. विशेषत: मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अन् पश्चिम महाराष्ट्राच्या बव्हंशी भागात होते. यंदा पावसाला ‘जा रे.. जा रे, लवकर जा’ म्हणण्याची वेळ आली. गमतीचा भाग सोडला तर मनोमन असेच वाटते आहे. कारण नाशिकचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडसह अन्य तालुक्यांमध्ये वा जिल्ह्यात अखंडित पडणाऱ्या पावसामुळे अाणि खराब  हवामानामुळे द्राक्षबागा तसेच कांद्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली म्हणण्याऐवजी काही भागात खरोखरीच असा दुष्काळ आल्यागत वातावरण आहे.

 साधारणपणे द्राक्षबागांवर भुरी वा डावण्या रोगाचा हल्ला होतो अन् त्यामुळे शेकडो एकर बागांचे नुकसान होते असा अनुभव आहे. यंदाच्या पावसाने त्यावर कडी केली. संततधारेमुळे बहुतेक ठिकाणच्या बागा अक्षरश: पाण्यामध्ये उभ्या आहेत. अनेक ठिकाणी पंप लावून बागेतील पाणी उपसण्याचा प्रयत्न केला गेला, पण पावसाला ओढच मिळत नसल्याने दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिघडत आहे. भुरी वा डावण्या रोगाच्याही दोन पावले पुढे जात द्राक्षबागेतील फांद्यांवरच मुळ्या उगवल्या आहेत. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार बागेत पंधरवड्यापासून पावसाचे पाणी तुंबून राहिल्याने द्राक्षांच्या मुळांची जमिनीखालील वाढ खुंटली. त्यांना ऑक्सिजन मिळेनासा झाला. त्यामुळे द्राक्षाच्या मुळ्या फांदीवर फुटल्याचे दिसत आहे. याचा परिणाम आता उत्पादनावर तर होणारच, त्याशिवाय घडातील मण्यांची फुगवण पुरेशी न होणे, मण्यांची गळती होणे, घड कुजणे यासह अन्य कारणांमुळे द्राक्षबागांचे अतोनात नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. वास्तविक पाहता अघोषित भारनियमन वा वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड होत होती. मानवी संकटाबरोबरच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते, शिवाय मध्यंतरीच्या कर्जमाफी वा कर्जमुक्तीचा विषय असो की शेतकरी संपावर गेल्यामुळे पेटलेले आंदोलन - यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष बऱ्यापैकी विचलित झाले होते. आंदोलनाच्या काळात ज्या रीतीने रस्त्याने दुधाचे लोट वाहत होते, भाजीपाला फेकला जात होता, कांदे वा टोमॅटोचे ट्रॅक्टर रस्त्यावर ओतले जात होते.. एका अर्थाने शेतकऱ्यांची ही कृती सरकारच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी असली तरी त्यामुळे या काळात नाही म्हटले तरी शेतीच्या कामावर परिणाम झाला. पण त्यानंतर शेतकरी खऱ्या अर्थाने शेतीच्या कामावर लक्ष केंद्रित करून द्राक्षबागा असो कांदा वा अन्य पिकांच्या उत्पादनावर भर देत होता. त्यातच पावसाने घात केला. मान्सूनचा सुरुवातीचा वेग लक्षात घेता हा हंगाम सर्वच पिकांना लाभदायी ठरू शकेल असेच एकूण वातावरण होते. त्यावर पावसाने पाणी फेरले. यंदाच्या खराब हवामानामुळे सुमारे ३० टक्क्यांहून अधिक बागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून दर हंगामात १५ ते २० टक्के द्राक्षांची निर्यात होते. त्याला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा किती द्राक्षे निर्यात होऊ शकतील तसेच देशांतर्गत बाजारपेठेतदेखील स्थानिक ग्राहकांना किती प्रमाणात द्राक्ष उपलब्ध होऊ शकतील याबाबत आताच्या घडीला अंदाज बांधण्याशिवाय हातात काहीच राहत नाही. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर आगामी हंगामात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. थंडीचे प्रमाणदेखील प्रमाणाच्या बाहेर गेले वा धुक्याच्या आच्छादनाखाली द्राक्षबागा सापडल्या की डावण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असते. त्या संकटाला सामोरे जायचे म्हटले तरी हजारो रुपये लिटर्सच्या औषधांची फवारणी करावी लागते.

 एकुणात काय, यंदाच्या न थांबणाऱ्या पावसामुळे द्राक्षबागा व कांदा या नगदी पिकांसह भाजीपाल्यालाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपले मायबाप सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की अानुषंगिक राजकारणाची समीकरणे - ती जुळवण्यात मश्गुल आहे. शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याला सरकारचे निकष आड येत आहेत. एक मात्र खरे की, आता पावसाने जितक्या लवकर होईल तितक्या वेगाने माघारी परत जायला हवे. तो गेला नाही तर नुकसानीचे सत्र सुरू राहील हे निर्विवाद ! 

- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...