आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीचे विमानोड्डाण !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमीच्या मुहूर्तावर झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते  रविवार, १ ऑक्टोबर २०१७ रोजी शिर्डीच्या लेंडी बागेत ध्वज फडकवून शताब्दीचा दिमाखदार सोहळा पार पडला. हाच योगायोग पदरी पाडून घेत केंद्र व राज्य सरकारने काकडी गावाच्या पंचक्रोशीत उभारलेल्या विमानतळाचे उद््घाटन तसेच आंतरराज्य पातळीवरील विमान उड्डाणांना राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्याचा योग साधला. साईंच्या वास्तव्यामुळे नावारूपाला आलेल्या शिर्डीच्या स्थानमाहात्म्याचा विश्वस्त मंडळाला फायदा होवो अथवा न होवो; पण बाबांवर अढळ श्रद्धा असणाऱ्या जगातील कोट्यवधी भाविकांना तसेच खुद्द शिर्डीला त्याचा नक्कीच फायदा होईल. विमानसेवेमुळे शिर्डी देशातील केवळ प्रमुख महानगरांना जोडली जाणार आहेच; पण त्यायोगे विदेशातील साईभक्तांच्याही निकट जाऊन पोहोचली आहे. शिर्डीमध्ये सध्या दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आदी ठिकाणांहून आरामदायी बसगाड्यांची थेट सेवा सुरू आहे. रेल्वेनेही हजारो भाविक येत असतात. कित्येक दशकांपासून भाविकांचा हा ओघ वाढतच आहे. त्यात कमतरता होती विमानसेवेची, तीही आता सुरू झाली असून शुभारंभालाच हैदराबादच्या उड्डाणाला भाविकांचा जो उदंड प्रतिसाद लाभला तो पाहता या विमानतळाची भरभराटच होईल, यात शंका नाही. या हवाई सेवेमुळे स्थानिकांना रोजगार व उत्पन्नाच्या अनेकानेक संधी उपलब्ध होऊ शकतात. 

शिर्डीमध्ये अगदी अलीकडच्या काळात  तेजीत असलेला हॉटेल व्यवसाय संस्थानमार्फत मोठ्या प्रमाणात भक्तनिवास उभारल्यामुळे अडचणीत सापडला आहे. तो व्यवसाय पुन्हा एकवार जोरदारपणे चालू शकतो. विमानतळ ते मंदिर हे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर असल्याने वाहतूकदारांना सुगीचे दिवस बघावयास मिळू शकतात. एक मात्र खरे की, शिर्डी विमानतळ विक्रमी वेळेत कार्यान्वित झाल्यामुळे तसेच त्यासाठी केंद्रीय पातळीवरून लागणाऱ्या आवश्यक परवानग्या मुदतीच्या आधीच मिळाल्यामुळे आता नाशिक वा औरंगाबादसह आसपासची जी विमानतळे गेल्या काही वर्षांपासून विमानोड्डाणाच्या प्रतीक्षेत ताटकळत उभी आहेत, त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नाशिकच्या विमानतळाचा विचार करता त्यावर शेकडो कोटी रुपये खर्ची पडले आहेत; परंतु आजतागायत एकही प्रवासी विमान त्यावरून उड्डाण करू शकलेले नाही. अपवाद फक्त मध्यंतरी आखाती देशांमध्ये बकऱ्यांची निर्यात करण्यासाठी या विमानतळावरून जी काही पाच-दहा उड्डाणे झाली तेवढाच काय तो. कृषिमालाची वाहतूक आंतरराज्य स्तरावर तसेच निर्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी नाशिक विमानतळाचा सरकार निश्चित वापर करेल, अशी आश्वासनं दिली गेली खरी; पण बकऱ्यांशिवाय एकही प्रवासी आजवर येथून उड्डाण करू शकलेला नाही. साईंच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर उल्लेख केल्याप्रमाणे आसपासच्या उभ्या असलेल्या विमानतळांच्या यातना ‘उडान’अभावी जशा वाढू शकतात, तसेच संस्थानच्या विश्वस्त मंडळाने शिर्डीच्या भगवीकरणाच्या केलेल्या आततायीपणाचा फटकाही त्यांना आज ना उद्या बसू शकतो. याचे प्रमुख कारण असे की, साईबाबांची शिकवण सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी आहे. साक्षात साईलीला वा साईसेवा यामधून शतकापासून जागोजागी हाच भाव व्यक्त होत आला आहे. समाधी शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमातही साईंच्या विचाराचेच आचरण व्हावे म्हणून खुद्द राष्ट्रपती भवनातून प्रमुख सोहळ्याच्या व्यासपीठावर एकसमान आसनं मांडावीत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. खरं तर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणारा एखादा कार्यक्रम असो की सोहळा, त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांसाठी एक उच्चासन मांडण्याचा प्रोटोकॉल आहे. राष्ट्रपती महोदयांनी साईंच्या विचारांप्रति जी सजगता दाखवली ती संस्थानच्या कारभाऱ्यांनाही दाखवणे शक्य होते. नेमकं येथे बोट लावण्याचं काम या मंडळींकरवी झालं आहे. आजही शिर्डीतील अरुंद रस्ते, रस्त्यांअभावी प्रसादालयाच्या परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी, बेशिस्त पार्किंग, भाविकांना लुबाडण्याचे प्रकार, चोऱ्यामाऱ्या, वाढती गुन्हेगारी यावर लक्ष केंद्रित करून भाविकांना अधिकाधिक उत्तम सुविधा अन् त्याहून महत्त्वाचे म्हणजे शिर्डीचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे अगत्याचे आहे. भगवीकरणाच्या केविलवाण्या प्रयत्नाने शिर्डीचे स्थानमाहात्म्य मुळीच कमी होणार नाही. साईभक्तांचा ओघदेखील आटणार नाही. पण समाधी शताब्दी वर्षात किमान साईबाबांच्या विचारांवर ‘श्रद्धा’ ठेव‌त कोणत्याही प्रकारचा भेद होणार नाही याची काळजी घेतली गेली तरी पुरे आहे, एवढीच भक्तांची सबुरीची अपेक्षा आहे.

- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...