आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaishri Bokil Editorial About Music Director Anand Modak

संगीतातील ‘आनंद’ हरपला (विशेष लेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला सर्वाधिक प्रिय असणार्‍या विषयासाठी काम करण्यात दिवसभराच्या नोकरीचा अडथळा स्वीकारूनही 35 वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणार्‍या आनंद मोडक यांच्या अकाली निधनाने एक संपूर्ण संगीतकारच नाहीसा झाल्याची भावना कलाक्षेत्रातून व्यक्त झाली. वयाच्या फक्त 63 व्या वर्षी झालेली मोडक सरांची ही एक्झिट चटका लावून जाणारी आहे.

मूळचे विदर्भवासी असणारे मोडक सर शालेय शिक्षणापर्यंत अकोल्यात होते. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि मग पुणेकरच होऊन गेले. पुण्यात आल्यावर कॉलेजमध्ये जाता-जाता तेव्हाच्या पुण्यातल्या समृद्ध कलाविश्वाचा ते सहजच एक हिस्सा बनून गेले. 1972-73 चा तो काळ मोडक सरांच्या सांगण्यानुसार स्थित्यंतराचा होता. केवळ कलाक्षेत्रच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल या काळात घडत होते आणि त्या बदलांनी तेव्हाची संस्कारक्षम पिढी प्रभावित होत होती.

पुण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग बनलेल्या थिएटर अकॅडमीच्या स्थापनेचे क्षण मोडक सरांनी अनुभवले होते. या मान्यवर संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते आणि जगभर गाजलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या मूळ संचापैकीही ते एक होते. त्यामुळे या नाटकाच्या विदेश दौर्‍यांच्या निमित्ताने मोडक सरांनी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, इटली, हॉलंड, जर्मनी, हंगेरी, युगोस्लाव्हिया, रशिया आदी देशांना भेटी दिल्या होत्या. तेथील कलाजीवनाचे काही अंश त्यांनी अनुभवले होते. नंतरच्या काळात मोडक सरांच्या गाण्यांमधून, पार्श्वसंगीतातून आढळणारी आणि कानाला सुखावणारी हार्मनी (कॉर्ड्स) या अनुभवांनी प्रेरित झाली होती. त्यांच्या कलावंत मनाने अल्पावधीत पाश्चात्त्य संगीताचे संस्कार आत्मसात केले होते.

मोडक सरांच्या कलाजीवनाची सुरुवात 72 च्या सुमारास झाली असली, तरी त्यांनी संगीत दिलेले पहिले नाटक ठरले ते 1974 मधले ‘महानिर्वाण’. त्यापाठोपाठ ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘पडघम’, ‘विठ्ठला’, ‘तुमचे आमचे गाणे’, ‘अफलातून’, ‘संगीत म्युनिसिपाल्टी’, ‘अलिबाबाची हीच गुहा’, ‘जळ्ळी तुझी प्रीत’, ‘लीलावती’, ‘प्रीतगौरीगिरीशम’, ‘मेघदूत’, ‘मदनभूल’, ‘संगीत प्रारंभायन’, असा एक वेगळा प्रवास सुरू झाला. यातील वैविध्य लक्षणीय होते. पौराणिक, ऐतिहासिक, संस्कृत साहित्यातील कलाकृती, अनुवादित नाटके, कॉमेडी...असे अनेक प्रकार त्यांनी सांगीतिकदृष्ट्या अर्थपूर्ण केले. या साºयाला नंतर पार्श्वसंगीताचाही सूर येऊन मिळाला. ‘महापूर’, ‘खेळिया’, ‘मृगया’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘चाफा बोलेना’, ‘वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा’, ‘उत्तररात्र’, ‘प्रेमाची गोष्ट..’ या सार्‍या नाट्यकृती मोडक सरांच्या संगीत मार्गदर्शनाने मूळ आशय गहिरा करणार्‍या ठरल्या.

नाटक, चित्रपट, मालिकांच्या विश्वात गुंतले असतानाही मोडक सरांनी आपली आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांशी प्रारंभापासून जुळलेली नाळ तुटू दिली नाही. 1976 मध्ये त्यांनी आकाशवाणीसाठी ‘बदकाचं गुपित’ ही संगीतिका केली. ती इतकी गाजली, की त्याचे स्वतंत्र 75 प्रयोग राज्यभरात झाले.

संगीतकार म्हणून चित्रपटांचा विशाल पट मोडक सरांना साद घालत होताच. ती संधी ‘22 जून 1857’ या नचिकेत-जयू पटवर्धन यांच्या चित्रपटामुळे मिळाली आणि मग यशस्वी चित्रपटांचा एक सिलसिलाच सुरू झाला. ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘दिशा’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘लपंडाव’, ‘दोघी’, ‘मुक्ता’, ‘तू तिथे मी’, ‘राजू’, ‘उरूस’, ‘फकिरा’, ‘बाईमाणूस’.. .वीस वर्षांच्या अवधीत मोडक सरांनी तब्बल 53 मराठी व हिंदी चित्रपटांना संगीताचा साज चढवला. चित्रपटांसाठी संगीत देतानाही त्यांनी कायम दर्जा जपला. निरर्थक शब्द आपल्या संगीतात शिरू दिले नाहीत. त्यांच्या या दर्जेदारपणाची दखल सहा वेळा राज्य पुरस्कार प्रदान करून सरकारी
पातळीवरही घेतली गेली. ‘कळत नकळत’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘रावसाहेब’, ‘राजू’ आणि ‘धूसर’ या मोडक सरांच्या संगीताने सजलेल्या चित्रपटांनी व्यावसायिक यशही मिळवले. याशिवाय फिल्मफेअर पुरस्कार (‘मुक्ता’, ‘सरकारनामा’, ‘तू तिथे मी’), अल्फा झी अवॉर्ड आणि मटा सन्मान (राजू) हे सन्मानही या वाटचालीत त्यांना भेटले.

अन्य संगीतकारांपेक्षा मोडक सरांचे एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे साहित्याची, शब्दांची, त्यातील सूक्ष्म अर्थांतरांची त्यांना असणारी विलक्षण जाण आणि हे सारे संगीत संरचनेत उतरवण्याचा त्यांचा आग्रह.. चित्रपटांसाठी त्यांनी चालीवरही शब्द लिहिले, पण त्यांचा मूळचा पिंड आधी कविता, मग चाल, हाच होता. ते स्वत: याचा वारंवार उल्लेख करत असत. बुजुर्ग सर्व कवींविषयी, कलाकारांविषयी विलक्षण आत्मीयता, आदर असणार्‍या मोडक सरांचे सूर सुधीर मोघे आणि अजित सोमण या मित्रवर्यांशी सर्वाधिक जुळलेले होते. काही वर्षांपूर्वी सोमण सरांचे, तर गेल्याच महिन्यात सुधीर मोघे यांचे निधन झाल्याचा धक्का मोडक सरांच्या मनातही सतत होता. माझ्या मित्रांविना मला चैन पडत नाही, असे ते म्हणत असत.

संगीतकार म्हणून वैविध्य जपणारे, गाण्यातली कविता प्राणपणाने सांभाळणारे, संगीत संरचना हे टीमवर्क मानून प्रत्येकाला त्याचे क्रेडिट मनमोकळेपणाने देणारे, कुठेही सुरेल गाणे ऐकले की भरभरून दाद देणारे मोडक सर माणूस म्हणूनही अनेक दुर्मिळ गुणांचा समुच्चय होते. आपला मोठेपणा जराही जाणवू न देण्याचा गुण त्यापैकीच एक. ते स्कूटरवरही एकटे जात नसत. त्यांना ज्या बाजूने जायचे असेल त्या दिशेने जाणारा कुणीही त्यांच्यासोबत असे. तीच गोष्ट कार चालवू लागल्यानंतरही होती. गाडीत चार माणसे एकमेकांना संपूर्ण अनोळखीही असू शकत. निकष एकच, त्या सार्‍यांना एकाच दिशेने जायचे असायचे. मोडक सर सार्‍यांना ड्रॉप करत असत. त्यांचा हा चांगुलपणा फक्त संगीतापुरताच नव्हता. चांगले चित्र, चांगले व्याख्यान, चांगले पुस्तक, चांगले प्रदर्शन, चांगली मैफल, चांगला चित्रपट-नाटक, चांगला माणूस..हे सारे त्यांच्यासाठी कौतुकाचा, आस्वादनाचा विषय होते.

दाद द्या अन् शुद्ध व्हा, ही ओळ ते नेहमी ऐकवत असत. चांगल्या गोष्टीला दाद देण्याचे भान त्यांनी कायम जपले. तिथे वय, धर्म, जाती, देश अशा भिंती त्यांना कधीच आड आल्या नाहीत. कुठल्याही चांगल्या गोष्टीतलं सौंदर्य त्यांना नेमकं जाणवायचं आणि ते इतरांनाही समजावं, यासाठी मोडकांचा आटापिटा चालायचा. त्यांनी प्रयोगशीलता जपलीच, पण ती नावापुरती नसायची. त्या त्या ठिकाणी ती अनिवार्य वाटेल, असाच तिचा वापर असायचा. त्यामुळेच पाश्चात्त्य पद्धतीच्या सुरावटीत मधूनच पखवाजाचे बोलही ऐकू येत, किंवा रागदारी संगीतात कॉडसची किमया दिसायची. कोरसचा कल्पक वापर हे तर त्यांचे वैशिष्ट्यच होते. शब्द-लयीचं नाजूक नातं त्यांनी त्याच मोलानं कायम हाताळलं, जपलं आणि रेशमी सुरावटींतून रसिकांच्या हवाली केलं.

प्रयोगशीलता हा कुठल्याही कलेचा गाभा असतो, असे म्हणतात. हा गाभा जितका समृद्ध तितका कलाविष्काराचे आयाम विस्तारत जातात. संगीतकार आनंद मोडक हे अशा कलात्मक प्रयोगशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण होतं. चित्रपट, नाटक, मालिका, ध्वनिफिती, सीडी, रंगमंचीय कार्यक्रम, आकाशवाणी, दूरदर्शन..अशा सर्व माध्यमांमधून मोडक सर अखंड कार्यरत राहिले..त्यांच्या प्रयोगशीलता आणि प्रतिभेचं अतूट नातं घेऊन फक्त काम करत राहिले. जुन्या-नव्या-आधुनिक पिढीशी आणि तंत्रज्ञानाधिष्ठित माध्यमांशी त्यांनी आपले सूर सहज जुळवले. परंपरेचं पाथेय तर त्यांनी आत्मसात केलं होतंच, त्याविषयीचा नितांत आदर त्यांच्या मनात सतत होताच..स्मृती-विस्मृतीत गेलेल्या अनेकानेक कलाकारांविषयी माहिती जमवणं, त्यांच्या कामाचं कलात्मक आस्वादन करणं आणि ते आपुल्या जातीच्या मित्रपरिवारात खुमासदार शैलीत शेअर करणं, हा मोडक सरांचा सर्वात आवडता उद्योग होता.

कलाविष्काराचं कुठलंही माध्यम त्यांनी वर्ज्य मानलं नाही. गेल्या तीन पिढ्यांसोबत त्यांनी आपल्या सुरांचं विश्व वाटून घेतलं. लौकिक यशाची गणितं, त्यासाठीच्या कलेपासून लांब नेणाºया तडजोडी, आर्थिक हितसंबंध या सार्‍यांपासून मोडक सर खूप लांब होते. बँक ऑफ महाराष्ट्रमधली नोकरी सांभाळून मोडक सरांनी कित्येक वर्षांपासून मांडलेला हा सुरांचा पट आता अचानक विसकटला आहे.
(jayubokil@gmail)