आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आहे चतुर्भुज तरी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभर गाजलेलं घरकुल प्रकरण ताजं असताना आणि आमदार सुरेश जैन आपल्या म्होरक्यांसह गेल्या दीड वर्षापासून अटकेत असताना जळगाव महापालिकेची निवडणूक होते आहे. अशा परिस्थितीत खरं तर त्यांच्या विरोधकांसाठी ही निवडणूक एकतर्फीच व्हायला हवी होती; पण वस्तुस्थिती तशी नाही. आमदार सुरेश जैन समर्थक गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी त्यांच्या विरोधकांना नाही नाही ते मार्ग अवलंबावे लागताहेत. साम, दाम, दंड, भेद यांचा अवलंब करावा लागतो आहे आणि ते करूनही महापालिकेत सत्तांतर होईल याची शाश्वती देता येत नाहीये. अर्थात, यात आमदार जैन यांच्या यशापेक्षाही विरोधकांच्या मानसिकतेचाच वाटा मोठा आहे.

सन 2008 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरेश जैन यांच्या विरोधकांसाठी लढाई सोपी नव्हती. सत्ताधार्‍यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि चौकशी समितीचा अहवाल एवढीच आयुधं त्यांच्या हातात होती. त्या आयुधांसह एकनाथ खडसे यांना जी काही धडपड करावी लागली होती त्यात या वेळी तसूभरही फरक पडला आहे असं वाटत नाही. त्या वेळी खडसे केवळ आमदार होते. या वेळी ते राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत आणि राज्य सरकारवर, विशेषत: गृहमंत्रालयावर त्यांचा मोठा प्रभाव आहे; पण तो प्रभाव त्यांना मतदानात परिवर्तित करता येईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. ते घडावं यासाठी त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण तो यशस्वी झाला नाही आणि तिथेच सत्ताधारी सुरेश जैन यांच्या गटाचा अर्धा विजय झाला. ऐन निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गुलाबराव देवकर यांचं राज्यमंत्रिपद काढलं गेलं आणि ती बाबही जैन समर्थक गटासाठी लाभदायी ठरली. मंत्रिपद गेल्यामुळे देवकरांनी महापालिका निवडणुकीतून अंग काढून घेतलं आहे. कारण त्यांना आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत आणि ती निवडणूक जिंकायची असेल तर, सुरेश जैन समर्थकांमध्ये असलेल्या आपल्या जुन्या मित्रांची मदत त्यांना घ्यावी लागणार आहे. मंत्रिपद गेलं नसतं तर देवकर आणि खडसे आपली ताकद एकवटणार होते.

आतापर्यंत आमदार सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालीच जळगाव नगरपालिका आणि महापालिकेची सत्ता राबवली गेली आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या वेळचा अपवाद वगळता जैन यांच्या सत्तेला विरोधक सुरुंग लावू शकलेले नाहीत. जनतेतून नगराध्यक्ष निवडताना जळगावकरांनी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या उमेदवाराला त्या पदावर निवडून दिलं होतं. दोनच वर्षात ते नगराध्यक्ष लाच प्रकरणात अडकले आणि त्यातून भाजपचीच बदनामी झाली. पुढे ते निर्दोष सुटले खरे; पण त्या निकालाची तेवढी चर्चा झाली नाही. त्यामुळे जळगाववर राज्य करायचं तर सुरेश जैन यांनीच, असं समीकरण तयार झालं. सुरेश जैन आणि त्यांच्या आघाडीला कोणी हरवू शकत नाही, अशी लहानसहान विरोधकांचीही मानसिकता बनत गेली आणि त्याचा फायदा पुन्हा सुरेश जैन यांनाच होत गेला. घरकुल प्रकरण आणि त्यानंतर जैन आणि त्यांच्या म्होरक्यांना झालेली अटक लक्षात घेता या वेळी चित्र बदलेल, विरोधकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल असा अंदाज होता; पण विरोधकांमध्ये असलेला ऐक्याचा अभाव आणि सत्तेच्या काळात जैन यांनी बनवून ठेवलेली ‘व्यवस्था’ यामुळे यंदाही चित्र फारसं वेगळं असेल असं अजून तरी वाटत नाही. महापालिकेसाठीच्या मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याच्या चार दिवस आधी निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यात 67 हजार मतदारांची नावे होती; ज्यांची नोंद शहरात दिसते, पण प्रत्यक्षात ते दिलेल्या पत्त्यावर राहतच नाहीत, असं सर्वेक्षणात आढळून आलं आहे, असा दावा संबंधित अधिकार्‍यानी केला होता. ही सर्व नावे महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीतूनही वगळावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांनी प्रयत्न केले आणि नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी त्यात पुढाकार घेतला. त्यानंतर शिवसेना आणि सत्ताधारी खान्देश विकास आघाडी वगळता सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली. आता या सर्व मतदारांच्या नावांना चिन्हांकित करण्यात आले आहे आणि त्यामुळे बोगस मतदानाला काही प्रमाणात आळा बसणार आहे. वर्षानुवर्षे हे ठावठिकाणा नसलेले मतदार शहरात मतदान करीत आले आहेत ही यातून स्पष्ट झालेली बाब सत्ताधारी आघाडीच्या आणि सुरेश जैन यांच्या ‘अपराजया’चं गुपित सांगते आहे. या वेळी उघड झालेले हे बनावट मतदान रोखण्यात विरोधकांना किती यश येतं, यावरही विजयाचं बरंचसं गणित अवलंबून आहे.

जळगाव शहरातला मतदार जातीनिहाय लेवा, कोळी, मराठा आणि इतर अशा चार प्रभावी गटांत विभागलेला आहे. मतदार मतदान करताना जातीपातीचा विचार फारसा करत नाही हे खरं असलं तरी जातनिहाय पुढारी आपापल्या जातीचं कार्ड वापरत संकुचित राजकारण करण्यात मश्गूल झालेले दिसू लागले आहेत. त्यामुळे पक्ष आणि उद्दिष्ट यांचा फारसा विचार न करता एकमेकांना सांभाळून घेण्याचीच व्यूहरचना सुरू आहे. असेच आतापर्यंत होत आले आहे आणि असे व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही होत आले आहेत. आमदार सुरेश जैन यांच्या यशाचं तेही एक कारण आहे. त्याचीच पुनरावृत्ती या वेळीही सुरू असल्याने निवडणुकीच्या निकालांत फार मोठा बदल झालेला असेल, अशी शक्यता दिसत नाही. एक मात्र खरं की, आजपर्यंत वस्तुस्थिती खर्‍या अर्थाने जळगावकरांपर्यंत पोहोचत नव्हती, ती या निवडणुकीपूर्वी बर्‍यापैकी पोहोचली आहे. त्यामुळे जळगावकरांनी ठरवलं तरच महापालिकेत सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता आहे. तरीही जळगावकरांसमोर प्रश्न असणार आहे तो सत्तांतर करून सत्ता कोणाच्या हाती सोपवायची हा. विरोधक कोणताही सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय अजून तरी समोर ठेवू शकलेले नाहीत.