आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघं शिवार जलयुक्त !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तारूढ होताच त्यांच्या पुढाकारातून राबविल्या गेलेल्या जलयुक्त शिवार या योजनेच्या यशापयशाबद्दल विरोधकांकरवी आता आरोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. मराठी प्रातांचं अवघं शिवार सिंचनाखाली आणतानाच तो सुजलाम् सुफलाम् करण्याचा धडाकेबाज कार्यक्रम हाती घेतला गेल्यानंतर पहिल्याच टप्प्यात बळीराजाला बऱ्यापैकी आबादीआबाद अनुभवता आली. कारण, दोन वर्षांपूर्वी दुष्काळाची जी भीषणता होती ती धुवाधार पर्जन्यमानामुळे कमी होऊ शकली. त्यामुळे राज्यावरील अवर्षणाचे संकट टळण्यास सरकारची जलयुक्त शिवार योजना नव्हे तर निसर्गकृपा हीच कारणीभूत आहे, असा युक्तिवाद आता विरोधकांकरवी केला जात असला अन् तो कालानुरूप तर्कसंगत असला तरी सत्ताधाऱ्यांच्या नशिबाचाही तो एक भाग मानायला हवा. 

सत्ताधारी वा विरोधक यांच्यातील वादावादीशी सर्वसामान्यांना  काहीही एक देणे घेणे नाही. पाणीटंचाईच्या काळात प्यायला घोटभर पाणी अन् शेतातील उभ्या पिकाला जीवदान देण्यासाठी पाण्याचे एखादे आवर्तन मिळाले तरी जनता खुश राहते. कलियुगातील देवेंद्रच्या अधिपत्याखालील सरकारला नेमकं हेच कोडं उलगडणे शक्य झाल्यामुळे सध्या तरी पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. कडाक्याचा उन्हाळा म्हटला की राज्याच्या कानाकोपऱ्यातून टँकरने पाणीपुरवठा सुरू अशा बातम्या यायला लागतात. गेल्या वर्षी मराठवाड्यातील लातूरची पाणीटंचाई दूर करण्यासाठी थेट रेल्वे सुरू करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात अजून तरी अशारीतीने टँकर वा रेल्वेने पाणीपुरवठा सुरू होऊ शकेल एवढी बिकट परिस्थिती उद्भवलेली दिसत नाही वा उदभवेलच असा दावाही करता येणे अवघड आहे. या मुद्याच्या मुळाशी जलयुक्त शिवारमुळे झालेली कामे हा एक प्रमुख आधार आहे. फडणवीसांच्या अगोदरच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनेदेखील याच राज्यात पाणी अडवा, पाणी जिरवा, कोल्हापूर टाइप बंधारे, अवर्षणग्रस्त भागात बांधबंदिस्तीच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे केलेले प्रयोग असो की स्वाध्यायी परिवाराने श्रमदानातून निर्मलनीर बंधारे उभारण्याचा फार पूर्वीच हाती घेतलेला उपक्रम असो या सगळ्या स्तुत्य उपक्रमांचा परिपाक म्हणजे राज्यातील बव्हंशी क्षेत्र सिंचनाखाली आले होते. मध्यंतरीच्या दुष्काळाने परिस्थिती पालटली हेही वास्तव नाकारता येणार नाही. एक मात्र खरे की, जलयुक्त शिवारची कामे जेवढ्या मोठ्या प्रमाणात अन् ज्या वेगाने हाती घेतली गेली त्यामुळे छोटी-मोठी धरणं, बंधारे वा कोरडी पडलेली नदी-नाले यातील पाण्याच्या साठवण क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ हा पुजलेलाच असायचा, पण गेल्या वर्षभराच्या कालावधीत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जी काही कामे झालीत त्यामुळे तेथील पाणीटंचाईच्या प्रश्नातील तीव्रताही आपसूक कमी झाली. ज्या धरणांमध्ये वा बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला लाखो मेट्रिक टन गाळ अजस्र यंत्रसामग्रीद्वारा उपसला गेल्याने तेथील साठवण क्षमता वाढू शकली त्याचाही परिणाम सिंचनक्षेत्र वाढण्यात झाला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार या योजनेबाबत मतभेद असू शकतात, पण जलयुक्तची कामे योग्य दिशेने व योग्यरीतीने झाल्याचेच हे द्योतक म्हणता येईल. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही जलयुक्त शिवार योजनेबाबत काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले आहेत. विधी मंडळाच्या चालू अधिवेशनातही या अनुषंगाने विरोधक मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जलयुक्त हा सर्वात मोठा उपक्रम असून त्यात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप मुंडे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला आहे. जलयुक्तच्या माध्यमातून जे पाणी अडलेलेच नाही, ते प्रत्यक्षात कागदोपत्री दाखविले जात असल्याचा संशय व्यक्त करतानाच ही योजना कंत्राटदारांच्या हातात गेल्याचाही आरोप त्यांनी केला. सुदैवाने यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे जलयुक्तचे यशापयश हे पुढे दिसेलच, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. खरं तर जलयुक्तच्या शुभारंभापासूनच मुख्यमंत्री फडणवीस व मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकारी पंकजा मुंडे यांच्यामध्ये योजनेच्या श्रेयावरून ठिणगी पडली होती. त्यानंतर देश व राज्य स्तरावरील काही जलतज्ज्ञांनीही त्याबाबत काहींनी प्रतिकूल तर अनेकांनी अनुकूल मतं नोंदविली होती. त्यानंतरही ही योजना धडाक्यात राबविली जात असून आजवर साडेबारा लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ झाल्याचा दावा सरकार करीत आहे. जलयुक्तमुळे गावाेगावच्या विहिरींमध्ये पाणी आल्यामुळे ते गरजू लोकांच्या पोहऱ्यात केव्हा येते त्यावरच खरं तर या योजनेच्या यशापयशाची मोजदाद होऊ शकेल. लौकिकार्थाने, अवघे शिवार जलयुक्त झाले असेही म्हणता येईल. 

-निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...