आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीपुरतेच दत्तक...!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राचे लाडके अन् नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी नाशिकला दत्तक घेतल्यामुळे आपसूक पालक झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सुटीच्या दिवशी नाशिकच्या दौऱ्यावर येऊन गेले. राज्याचा प्रमुख आपल्या शहरात येतो म्हटल्यावर भोळ्याभाबड्या जनतेच्या काही ना काही अपेक्षा असणारच, पण त्याहीपेक्षा ज्या पक्ष कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये मतांचं दान मागताना मुख्यमंत्र्यांचा चेहरा मतदारांच्या समोर धरला होता त्यांची मात्र दौऱ्यावेळी मोठी पंचाईत झाली हे नक्की. कारण या अर्ध्या दिवसाच्या दौऱ्यात मुख्यमंत्री महोदयांनी ना कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन दिले, ना कोणतीही योजना जाहीर केली, ना समृद्धी मार्गावरच्या आंदोलकांना सामोरे गेले, ना कपाटाचा गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रश्नांचा तिढा सोडवण्यासंबंधी आश्वासक दोन शब्द बोलले, ना महापालिकेच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळू शकेल असे मार्गदर्शन केले, ना आमच्या महापौर मॅडमच्या स्वप्नातील मेट्रो प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला. सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे नाशिककरांच्या अंगाने विचार करता फलित काय तर नाशिककरांच्या हाती मिळाला भोपळा. एक मात्र खरे की, स्वच्छतेच्या बाबतीत नाशिकचा क्रमांक वरच्या दहामध्ये निश्चित आणण्याचा प्रयत्न करू, असे दिलासादायक दोन शब्द का होईना महोदयांनी उच्चारल्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात नाशिककरांवर थोड्याफार प्रमाणात दोन-चार थेंबांचा शिडकावा झाल्याची प्रचिती आली असणार. साधारणपणे आजवर चालत आलेल्या या परंपरेनुसार मुख्यमंत्री ज्या पक्षाचा त्या पक्षाचे स्थानिक नेते वा कार्यकर्ते, त्यांच्या अखत्यारीतील संस्था, संघटना, मंडळं यांच्या पातळीवर उत्साहाचे वातावरण असते. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आलेली अन् तीदेखील फडणवीस यांच्याच कार्यकाळात, त्यामुळे स्थानिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांबरोबरच उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यवसायिक, त्यांच्या औद्योगिक संघटना या सर्वांच्याच आशा पल्लवित झालेल्या. पण मुख्यमंत्र्यांनी कशालाही भुलून न जाता केवळ बघू, करू, प्रयत्न करू, तुम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवा, मग विचार करू, अशी निव्वळ सरकारी छापाची आश्वासनं दिली. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीतून नाशिककरांच्या हाती भोपळा मिळाल्याची सार्वत्रिक भावना होणे स्वाभाविकच आहे. पण त्यांच्या या एका  कृतीतून फडणवीसांच्या कार्यशैलीतील वेगळेपणही दाखवून दिले. सहज मागितले की मिळते म्हटल्यावर त्याची किंमत समोरच्याला राहत नाही, याची पुरेपूर जाणीव मुख्यमंत्र्यांना असणार. त्यांनी ऐन तरुणपणात नागपूरचे महापौरपद सांभाळले होते. त्यामुळे महापालिकेच्या प्रमुख मागण्या काय असतात, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत काय असतात, त्या उत्पन्नातून कोणती समाजोपयोगी कामे अग्रक्रमाने हाती घेता येऊ शकतात, या सगळ्याच बारीकसारीक बाबींचा अभ्यास असल्यामुळे त्यांची दिशाभूलदेखील करता येऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांनी पालिकेच्या कारभाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले असणार की, प्रथम तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. काटकसर करा. शहर वाहतुकीसाठी लागणाऱ्या बसेस नव्याकोऱ्या घेण्याऐवजी सेकंडहँड वापरा व तोट्यातील बससेवा नफ्यात आणा, ज्या ठिकाणी कमी पडेल वा फारच उणीव भासेल तेथे सरकार म्हणून दायित्व निभावेल, असेही एकप्रकारे त्यांनी सांगून टाकले. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या समृद्धी मार्गाबाबतही ठाम भूमिका घेत हा प्रकल्प होणारच, असा दृढविश्वास व्यक्त केला. कारण, या मार्गातील बव्हंशी अडथळे या आधीच दूर करण्यात यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले आहे. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृद्धीच्या मार्गावर नेण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्या अजेंड्यावरील प्राधान्याचा आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील काही गावांमधून या मार्गाला कडवा विरोध केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून संभाव्य प्रकल्पग्रस्तांनी फास शेतातील झाडांना टांगून ठेवले आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांची भेट घेणे मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यामध्ये खुबीने टाळतानाच, मात्र हा मार्ग झाला नाही तर भविष्यात नुकसान तुमचेच होणार आहे, असेही ठणकावून सांगण्यास ते विसरले नाहीत. नाशिक ते मुंबई या द्रुतगती मार्गाचा कटू अनुभव नाशिककरांच्या गाठीशी आहेच. त्यामुळे फडणवीसांच्या गर्भित इशाऱ्याचा काय तो अर्थ लवकर काढलेला बरा, असे वाटते. असो, देवेंद्र फडणवीसांनी नाशिक निवडणुकीपुरतेच दत्तक घेतले असले तरी मुख्यमंत्री म्हणून नाशिकचा विकास हेही दायित्व त्यांचेच असणार आहे. 

- निवासी संपादक, नाशिक
 
बातम्या आणखी आहेत...