आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिय प्रधानमंत्री...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तपत्रांतील तुमच्या भाषणांचे वृत्तांत आणि तुमच्या मुलाखती ज्या धडाक्याने सुरू आहेत, त्यांनी मी थक्क झालो आहे. आपल्या कृतींच्या समर्थनार्थ उठता-बसता काही ना काही सांगण्याची पाळी आपल्यावर येते, त्याच्या बुडाशी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे अपराधाच्या जाणिवेने त्रस्त झालेले मन आहे, हेच सिद्ध होते. वृत्तपत्रांची तुम्ही केलेली मुस्कटदाबी, मतभिन्नतेची तुम्ही वळलेली गठडी यामुळे तुम्हाला अवघे रान मोकळे सापडले आहे, अशा रीतीने लोकांना बनवता येईल आणि लोक आपल्या युक्तिवादाला फसतील, अशा भ्रमात तुम्ही वावरत असाल तर ते चूक ठरेल. तुमच्या गाण्याचे जे पालुपद मला समजले ते असे (अ) सरकारी कारभार ठप्प करण्याचा विरोधकांचा बेत होता. (ब) लष्करी आणि मुलकी दलांत अप्रीती निर्माण करण्याची धडपड एक मनुष्य करीत होता. सामाजिक लोकशाही भारतीय प्रकृतीला कितपत उपयुक्त ठरेल, याबद्दलही संभ्रम निर्माण करण्याचा तुमचा उद्योग उत्साहाने चालूच आहे. या सर्व घडामोडींत खलनायकाची भूमिका मी वठवली असा घोशा आपण लावलेला असल्याने काही गोष्टींबाबत एकदा स्पष्टीकरण देणे योग्य राहील. सरकारी कारभार ठप्प करण्याचा आरोप बिनबुडाचा आहे. तशी कोणतीही योजना आखण्यात आलेली नव्हती आणि ही गोष्ट तुम्हाला पक्की ठाऊक आहे.

जनता सरकार ह्या कार्यक्रमाकडे जरा बारकाईने पाहण्याची इच्छा तुम्ही बाळगली असतील, तर बव्हंश कार्यक्रम रचनात्मक आहे हे तुमच्या ध्यानी यायला हरकत नव्हती. सार्वजनिक वाटपाची नीट व्यवस्था करणे, प्रशासनात खालच्या पातळीवर शिरलेल्या भ्रष्टाचाराला अटकाव करणे, भूमीविषयक कायद्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून खटपट करणे, लोकांचे तंटेबखेडे समजूतदारपणाने व सल्लामसलतीने सोडवण्याच्या परंपरागत पद्धतीचे पुनरुज्जीवन करणे, दलितांशी माणुसकीने वागणे, हुंडा यांसारख्या दुष्ट रूढी निपटून काढणे, हे सगळे कार्यक्रम समाजाची नवरचना घडवणारे म्हणजे रचनात्मकच होते. आता या कार्यक्रमांना सरकार उलथवून टाकण्याचे कार्यक्रम म्हणायचे कोणी ठरवले तर त्यांचे तोंड कोण धरणार? इंग्रज सरकार ठप्प करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात असहकार आणि सत्याग्रह यांचा अवलंब करण्यात येत असे, तसाच प्रयत्न भ्रष्ट आणि लोकमत प्रतिबिंबित करण्याला अपात्र ठरलेल्या सरकारबाबत केला जात होता.

सरकार भ्रष्ट असेल आणि धडपणे राज्य करण्याला अपात्र असेल, तर त्याचा राजीनामा मागण्याचा सार्वभौम प्रजेला अधिकार लोकशाहीत पोहोचतो आणि असे सरकार चालू देण्याचा उद्योग विधानसभा करीत असेल तर ती विधानसभा बरखास्त करावी, अशी मागणी करण्यातही काहीच गैर नाही. पण सत्ता हेच ज्यांना शहाणपणाचे गमक वाटते त्यांना कोण काय सांगणार आणि जाहीरपणे ते सांगण्याचा अधिकार हिरावून घेतल्यानंतर कसे सांगणार? बिहारच्या विद्यार्थ्यांनी लहर लागली म्हणून गमतीखातर चळवळ सुरू केली नाही. त्यांनी एक प्रातिनिधिक परिषद घेऊन आपल्या मागण्यांचा मसुदा तयार केला. नंतर ते शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जाऊन भेटले. त्यांच्या अनेक बैठका झाल्या; पण भ्रष्ट आणि अपात्र बिहार सरकारला त्यातील गांभीर्य जाणवले नाही. मग विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घतला. विद्यार्थ्यांनी मंत्रिमंडळाच्या हकालपट्टीची किंवा विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केलेली नव्हती. त्यानंतर सरकारने अटका, लाठीमार, गोळीबार यांचे सत्र आठवडेच्या आठवडे सुरू ठेवले, ह्या ठिकाणी परिसीमा झाली.

उत्तर प्रदेशातही याचीच आवृत्ती निघाली. दोन्ही ठिकाणी वाटाघाटींनी प्रश्न सोडवण्याला सरकारतर्फेच नकार देण्यात आला आणि त्यांनी लोकांवर लढा लादला. या सर्व चळवळीचा केंद्रबिंदू भ्रष्टाचार हाच होता. सरकार आणि प्रशासन यात भ्रष्टाचाराचा झालेला बुजबुजाट लोकांना असह्य झाला होता. सरकारचे उच्चाटन करण्यासाठी मंडळी कटिबद्ध झाली होती, असा डांगोरा आपण खुशाल पिटा, पण तसे काही नव्हते. आपली स्वत:ची हुकूमशाही समर्थनीय ठरवण्याचा तुमचा तो सारा आटापिटा आहे.

नाही, प्रधानमंत्री महोदया, सरकार उलथून टाकण्याची कोणतीही योजना शिजलेली नव्हती. हो, योजना असलीच तर ती इतकीच साधी योजना होती की, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत चळवळ चालू ठेवायची. २५ जून १९७५ ला रामलीला मैदानावर नानाजी देशमुखांनी जाहीर केली ती योजना एवढीच साधी, सरळ होती. माझ्या त्या दिवशीच्या भाषणाचा विषयही तोच होता. काही निवडक मंडळींनीच तुमच्या निवासासमोर सत्याग्रह करायचा होता. सर्वोच्च न्यायालयाकडून अखेरचा निवाडा होईपर्यंत तुम्ही पंतप्रधानपद सोडावे, ह्या मागणीच्या समर्थनार्थ तो सत्याग्रह होता. हा कार्यक्रम दिल्लीत एक आठवडाभर चालणार होता. त्यानंतर इतर राज्यांत तो हाती घेण्यात येणार होता. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवडा होईपर्यंत तो चालायचा होता. यात सरकार उलथून टाकण्याचा किंवा घातपाताचा संबंध येतोच कुठे, हे मला समजत नाही.

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा अपहार कशासाठी? भारतीय वृत्तपत्रे बेजबाबदार आहेत, हे काही त्याचे कारण नव्हे. वृत्तपत्रे सत्यापलाप करणारी व सरकारविरोधी आहेत, असेही नाही. स्वातंत्र्य असतानाही इतक्या जबाबदारीने वागणारी वृत्तपत्रे दुसरीकडे क्वचितच दिसतील. त्यांची तर्कसंगत आणि उदार वागणूक राहिली आहे. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तुमच्या राजीनाम्याच्या प्रश्नाला त्यांच्यापैकी काहींनी हात घातला, म्हणून तुमचा क्रोध असा उसळून आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीकालीन न्यायमूर्तींच्या निवाड्यानंतर शहरातील एकजात सर्व वृत्तपत्रांनी, अगदी कचखाऊ टाइम्स ऑफ इंडियानेदेखील, तुम्हाला राजीनामा देण्याचा सल्ला देणारी संयुक्तिक अशी जोरदार संपादकीये लिहिली तेव्हा वृत्तपत्रीय स्वातंत्र्य पचवणे तुम्हाला असह्य झाले आिण मग तुम्ही बेदरकारपणे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. वृत्तपत्रीय स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही जीवनातील जणू प्राणवायू. पण पंतप्रधानांच्या व्यक्तिगत रागापायी स्वातंत्र्याचेच अपहरण करण्यात आले. कल्पनेपलीकडला हा सर्व प्रकार आहे.
सैन्य आणि मुलकी दलांत सरकारबद्दल अप्रीती निर्माण करण्याचा सफेद झूठ आरोप करण्यात येत आहे. त्याचा मी पुन:पुन्हा इन्कार केला आहे. सैन्य आणि मुलकी दलांतील मंडळींनी आपल्या कर्तव्याचे व जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, हेच तर मी वारंवार बजावले आहे. सैनिकी व पोलिसी कायदा, घटना आणि कायदा यांना धरूनच मी जे काही सांगितले ते सर्व सांगितले आहे.

राष्ट्रापेक्षा लोकशाही महत्त्वाची नाही, असे तुम्ही म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पंतप्रधान महोदया, हा आपला युक्तिवाद किती तकलादू आहे. जणू काही अवघ्या राष्ट्राची काळजी करण्याचा ठेका आपल्याकडे आहे, अशा तऱ्हेचे हे विधान आहे. आपण आज ज्यांना विनाचौकशी तुरुंगात डांबले आहे, त्यापैकी कित्येकांनी आपल्यापेक्षा किती तरी अधिक खस्ता या राष्ट्रासाठी खाल्ल्या आहेत. हे सगळे तुमच्याइतके तरी खासच राष्ट्रभक्त आहेत. तेव्हा राष्ट्रभक्तीबद्दल प्रवचने झोडून आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचा उद्दामपणा तरी कृपा करून करू नका.

सध्या वृत्तपत्रांचे रकाने घोषणाबाजीने भरलेले असतात. गेल्या नऊ वर्षांतील तुमच्या अमलात जे घडवण्यात तुम्हाला अपयश आले, ते पुसून टाकण्यासाठी हा सारा देखावा उभा केला जात आहे; परंतु तुमच्या दहा कलमांची जी वाट लागली, त्यापेक्षा काही वेगळे या वीस कलमांच्या ललाटी लिहिले आहे, असे मानण्याचे काही कारण अजून तरी दिसत नाही, बाईसाहेब, स्वार्थलंपट आणि पाठीला कणा नसणारे होयबा काँग्रेसवाले काही कर्तबगारी दाखवतील, असे समजणे म्हणजे भकड गाईचे दूध मिळण्याइतकेच दुरापास्त आहे.

कर्तव्य कठोर असते आणि म्हणूनच मला कडक शब्दांत सत्य सांगावे लागले आहे. आपल्या राष्ट्रनिर्मात्यांच्या मालिकेत तुमच्या थोर वडिलांचाही अंतर्भाव आहे. जो पाया त्यांनी घातला तो उद्ध्वस्त करू नका. तुम्ही जो रस्ता चोखाळला आहे, त्यावर चालताना लोकांच्या वाट्याला छळ आणि कष्टच काय ते येतील. केवढी महान मूल्ये आपल्याला मागे ठेवली आहे. हे सर्व उद्ध्वस्त झालेले पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला आणू नका. पुन्हा ते तुकडे एकत्र करण्याला फार काळ लागेल. ते पुन्हा एकत्र केले जाईल, या बाबतीत मात्र मी नि:शंक आहे.

देश वाहवत चालल्याचा गवगवा तुम्ही चालवला आहे; पण त्याला काय मी जबाबदार होतो की विरोधी पक्ष जबाबदार होते? तुमच्यातलीच निर्णयाबाबतची द्विधावृत्ती त्याला कारणीभूत आहे. ना निश्चित दिशा, ना अंमलबजावणीसाठी उठाठेव तुम्ही केली. तुमचे स्वत:चे आसन धोक्यात आले म्हणजे मग तुमच्यातली तत्परता जागी होते आणि नाट्यपूर्ण निर्णय तुम्ही करता. एकदा आसन सुरक्षित झाले की तुमचे वाहवत जाणे पुनरपि सुरू होते. इंदिराजी, कृपा करा आणि स्वत:ला राष्ट्र समजू नका. परमेश्वर तुम्हाला सद‌््बुद्धी देवो.

जयप्रकाश नारायण
बातम्या आणखी आहेत...