आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जनशील समीक्षेचा पांथस्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले पूर्वकालीन आणि समकालीन यांच्याशी दभि सतत कनेक्ट होत राहिले. या दोन्ही सेतूंमध्ये त्यांनी खरोखरच ‘सेतू’ बांधला आणि त्यामधील संबंध-अनुबंधांचा आस्थेने शोध घेतला. ज्ञानेश्वर-तुकाराम, मर्ढेकर-जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनावर दभिंनी मनापासून प्रेम केले.

साहित्य व्यवहाराला कलास्वादाचे निकष लावत आस्वादक भूमिकेतून, पण संशोधकाच्या नजरेतून समीक्षेचा व्यापक पैस निर्माण करणारा बहुश्रुत समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. साहित्यावर मनस्वी प्रेम करणारा दुर्मिळ समीक्षक, असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. साहित्याइतकाच संगीत, चित्रकला, नाट्य, शिल्प, नृत्यकलांमध्येही दभिंना रस होता. सोबतीला हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि रशियन भाषेचा व्यासंग होता. त्यामुळे त्यांच्या समीक्षेने भाषेचे प्रांतिक अडसर कधीच मानले नाहीत. रशियन भाषेची पदविका त्यांनी १९७६ मध्ये प्राप्त केली होती, हा संदर्भ लक्षात घेतला, तर त्यांचे द्रष्टेपण सहज लक्षात येईल. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षापासून ‘आपली वाट समीक्षेची आहे,’ हे जाणून त्या वाटेवर चालण्यासाठी आवश्यक तो व्यासंग, अभ्यास आणि संशोधन त्यांनी जाणीवपूर्वक सुरू केले होते.

दभिंनी साहित्याच्या विविध प्रांतात मुशाफिरी केली. कथा, कविता, कादंबरी, ललितलेखन, वैचारिक लेखन, संशोधन प्रकल्प, वाङ््मयीन प्रकल्प, प्रस्तावना लेखन आणि अर्थातच समीक्षात्मक विपुल लेखन त्यांनी केले. समीक्षकाला आवश्यक असणाऱ्या प्राचीन वाङ््मयीन परंपरांचा त्यांचा व्यासंग अद्ययावत होता. त्यातून त्यांना पडणारे प्रश्न, जागे होणारे कुतूहल, वाटणारी जिज्ञासा यांतून त्यांनी घेतलेला साहित्यशोध समीक्षेच्या अंगाने कधी गेला, तर कधी संशोधनाच्या वाटेने गेला. कलेविषयीची आस्था आणि साहित्याचे ममत्व यांच्या अनुबंधातून दभिंचे साहित्यविश्व आणि ग्रंथविश्व साकारले. महाकाव्यापासून महाकथेपर्यंत, संतवाङ््मयापासून नवकवितेपर्यंत आणि कवितेपासून सौंदर्यशास्त्रापर्यंत त्यांच्या समीक्षेचे आभाळ विस्तारलेले होते.

उभरत्या गुणी प्रतिभेचा शोध आणि नवे सर्जनशील लेखन समजून घेण्याची उपजत ओढ दभिंपाशी असावी, कारण सुधाकर गायधनी, कृष्णा चौधरी, म. म. देशपांडे अशा अनेक उभरत्या कवी-लेखकांच्या प्रतिभा आविष्कारांना पहिली दाद दभिंनी आपल्या लेखनातून दिलेली दिसते. तेव्हा नवीन असणाऱ्या या आजच्या प्रसिद्ध कवींच्या रचनांचे सत्त्व सर्वप्रथम दभिंनी उलगडलेले आहे. सुमारे ५० वर्षे दभिंनी अध्यापनाचे कार्य केले, हेही लक्षणीय आहे. यानिमित्ताने त्यांचा विविध पिढ्यांतील तरुणाईशी सतत संबंध येत राहिला. दभिंच्या सर्व प्रकारच्या अद्ययावत असण्याचे श्रेय या पिढ्यांचेही आहे. आस्वाद आणि संशोधन यांना आत्मसात करणारी दभिंची सर्जनशील समीक्षा या परिप्रेक्ष्यातून पाहिली पाहिजे.

आपले पूर्वकालीन आणि समकालीन यांच्याशी दभि सतत कनेक्ट होत राहिले. या दोन्ही सेतूंमध्ये त्यांनी खरोखरच ‘सेतू’ बांधला आणि त्यामधील संबंध-अनुबंधांचा आस्थेने शोध घेतला. ज्ञानेश्वर-तुकाराम, मर्ढेकर-जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनावर दभिंनी मनापासून प्रेम केले..अगदी भक्ती केली, असे म्हटले तरी चालेल आणि त्याच वेळी एक प्राध्यापक म्हणून अध्ययन, अध्यापन, मनन, चिंतन, संशोधन यातून वाङ््मयाची मर्मदृष्टी शोधण्याचा प्रयत्न केला. दभि प्रामुख्याने कलावादी समीक्षक मानले जातात, पण म्हणून ते जीवनापासून दूर गेले नाहीत. जोडलेले राहिले. त्यातूनच नानाविध विषयांचा शोध घेणारी त्यांची समीक्षा सिद्ध झाली. त्यांच्या समीक्षेने मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
एरवी लेखक मंडळी वाङ््मयीन प्रकल्पांकडे दुर्लक्ष करताना दिसतात, पण इथेही दभिंचे वेगळेपण उठून दिसले. मराठी वाङ््मयाचा इतिहास खंड ४, मराठी वाङ््मयकोश आणि साहित्य समीक्षा परिभाषाकोश असे महत्त्वाचे वाड्मयीन प्रकल्प दभिंनी आपल्या योगदानाने मार्गी लावले. उभरत्या, नव्या प्रतिभेचे आविष्कार दभिंनी उत्सुक मनाने वाचले आणि योग्य त्या पद्धतीने त्या प्रतिभेचे त्यांनी कौतुकही केले. दभिंनी लिहिलेल्या प्रस्तावनांचा वेगळा ग्रंथ छापला जाणे, हेही त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे.
वयाच्या पंचविशीतच कवी यशवंतांची ‘आई म्हणुनी कोणी’ ही कविता शिकवत असतानाच माझ्यातला समीक्षक जागा झाला,’ असे दभिंनी स्वत:च म्हणून ठेवले आहे. या समीक्षकाला रुक्षता, कोरडेपणा यांचे शाप दभिंच्या बाबतीत कधीच नव्हते. त्यांची समीक्षा त्यांच्यातल्या आस्वादकाशी इमान राखणारी होती. आपल्या अभिरुचीचा आणि लेखकांच्या वाङ््मयकृतींचा - दोन्हीचाही सन्मान करणारी समीक्षा त्यांनी लिहिली. त्यातून आस्वाद आणि निर्मिती यांचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला.

दभिंच्या या वैशिष्ट्यांमुळेच ‘विवेकसिंधू’मधील वेदांत, ‘चक्रधरस्वामींचा द्वैतवाद’, अमृतानुभवातील प्रत्यभिज्ञादर्शन, दासबोधातील प्रपंचविज्ञान, आगरकरांचा विवेकवाद, राजवाड्यांचा राष्ट्रवाद..अशा ‘पुष्टीकारक’ अन्नावर त्यांची आस्वादकता पोसली गेली होती. कुठलीही संकुचितता त्यात नव्हती. जेवढ्या प्रेमाने त्यांनी कवितेवर लिहिले तेवढ्याच प्रेमाने नाटके, कादंबरी, ललितलेखन यावरही लिहिलेले दिसते.

नव्या पिढीमधील मंडळींचा बीजग्रंथांचा अभ्यास नसल्याने त्यांच्या आस्वादाला आणि समीक्षेलाही घनता नसते, हे आपले लाडके मत ते वारंवार उच्चारत असत. तरीही नव्या पिढीच्या प्रतिनिधींशी त्यांचे मैत्र होते. आपल्या वाङ््मयीन जडणघडणीचा सुंदर आलेख दभिंनी ‘अपार्थिवाचे चांदणे’ या ललितलेखसंग्रहात काढलेला दिसतो. अत्यंत काटेकोर, वस्तुनिष्ठ, शुद्ध वाङ््मयीन, कलाकृतीनिष्ठ, सुगम, लालित्यपूर्ण समीक्षेने दभिंनी मराठी साहित्यात अल्पावधीत नाव कमावले. त्यासाठी स्वत:वर केलेली ‘टिपण टीकाकार’ अशी टीका (ठणठणपाळ यांनी केलेली) खिलाडूपणे स्वीकारली. परंपरा आणि नवतेचा वाङ््मयीन सौंदर्यनिष्ठ असा समन्वय त्यांनी आपल्या समीक्षेत साधला. परंपरेची जाण आणि आधुनिकतेचे भान कायम राखले आणि समीक्षा क्षेत्रातही उत्तम लोकप्रियता मिळवली.
jayubokil@gmail.com