आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरवं उधाण विसावलं..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसांच्या जगातराहून, निसर्गाच्या चित्रलिपीचं गूढ उकलण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या, वयापलीकडचे मैत्र साऱ्यांशी जपणाऱ्या नलेश पाटील यांच्या अकाली निधनाचा चटका प्रत्येक संवेदनशील मनाला नेहमीच जाणवत राहील.

खरे तर निसर्गाचं प्रेम व्यक्त करणाऱ्या असंख्य कवितांनी मराठी कवितेचं दालन समृद््ध आहेच. पण निसर्गाकडे नलेश पाटील यांच्या ‘नजरे’तून पाहणं फारसं कुणालाच जमलेलं नाही, असं म्हणावं लागेल इतका निराळ्या पद्धतीनं, आगळ्या शब्दकळेनं निसर्ग पाटील यांच्या कवितेत प्रकट होत आला आहे. मुख्य म्हणजे अशी वेगळ्या वाटेवरची कविता लिहीत असूनही पाटील यांच्या कवितेनं सहजतेचा, सुगमतेचा रस्ता कधीच सोडलेला नाही. अगम्य शब्दकळा, कुणाला पत्ता लागणार नाही असं गूढ..त्यांनी कवितेतून मांडलंच नाही..त्यांनी जे लिहिलं, ते प्रत्येकाला सहज समजणारं, भावणारं होतं आणि तरीही ते खास ‘नलेश पाटील टच’ घेऊन येत असे, हे त्यांच्या मित्रपरिवारात कुणीही सांगू शकेल. ‘घन आभाळीचा तडकावा, मातीस मिळावा शिडकावा, झाडावरती पुन्हा नव्याने, रंग हिरवा फडकावा..’ असं भन्नाट काही ते सहज, साध्या शब्दांत लिहून जात असत आणि त्यांच्या कवितांचे चाहते, ती कविता जन्मभरासाठी उराशी कवटाळून बसत असत. ग्रामजीवनातले कित्येक संदर्भ, हळवे क्षण पाटील यांच्या कवितांमधून रसिकमनात कायमचे वस्तीला आले आहेत. निसर्गकवी अशी उपाधी भले कुणी त्यांना दिली नसेल, पण निसर्गाचा अस्सल रंग त्यांच्या कवितांमधून मुक्त उधळण करत आला आहे. हिरव्यागार गवताला, सूर्यानं आपले अंग घासले, पिवळे पिवळे ऊन फासले, तुम्हाला ते उगीचच वाळलेले भासले..अशी अनपेक्षित शब्दरचना त्यांची कविता सहज आपलीशी करत आली.
संगीत क्षेत्रात कलेच्या श्रेष्ठतेचा ‘अनपेक्षित आनंद’ असाही एक निकष मानला जातो. या निकषावर तर नलेश पाटलांची कविता शंभर टक्के उतरते. अनपेक्षितपणे गायकाने गाठलेली सम संगीतविश्वात जाणकारांसाठी पर्वणी ठरते, तशाच पर्वणीचे हक्कदार पाटील यांनी आपल्या कवितेतून हयातभर मिळवले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सकारात्मकता हा पाटील यांच्या कवितेचा आणखी एक विशेष पैलू आहे. कुठलेही रडगाणे त्यांनी मांडलेले आढळणार नाही. यामुळेच विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांच्यानंतरच्या पिढीचे ते वारसदार ठरतात. आपल्या हिरव्या बोलीचे अत्तर पाटील यांनी जवळपास ३५ वर्षे कवितांच्या माध्यमातून रसिकमनांवर शिंपडले. जे रंग सर्वसामान्य मनांना सहसा जाणवणारही नाहीत, ते त्यांच्या रसिकतेच्या कक्षेत आणण्याचे, त्यांचा आनंद सर्वसामान्यांना मिळवून देण्याचे अनोखे श्रेयही नलेश पाटलांचेच आहे. अतिप्राचीन काळी पृथ्वीवर वावरणाऱ्या मानवांनी निसर्गाची विविध हितकारी, भयकारी रूपे अनुभवली आणि त्यांची पूजा बांधली. ऋग्वेदातल्या ऋचा हे अशा निसर्गदेवतांचेच तर कवन आणि स्तवन आहे. अनाघ्रात सौंदर्याने ओथंबलेली, सहज स्फुरलेली, स्वाभाविक उमटलेली अशी ऋग्वेदातील कविता आणि नलेश पाटलांची निसर्गकविता यामध्ये एक आंतरिक धागा जुळला असावा, अशी शंका येत राहते.
ऋग्वेदातील रचनांचे कर्ते विविध ऋषी आहेत, असे परंपरा मानते. या ऋषींना ऋचांचा साक्षात्कार झाला, ऋषींना ऋचा स्फुरल्या..असे मानले जाते. तद्वत नलेश पाटलांनाही असे साक्षात्कारी प्रतिभेचे देणे लाभले असावे, असे त्यांची कविता वाचताना जाणवते. ‘सहजच जे प्रार्थनेत जुळती’, अशीच त्यांची कविता आहे. सहजता हा तिचा स्थायीभाव आहे आणि राहील. त्यांच्या कवितेच्या या वैशिष्ट्यामुळेच पाटलांची कविता समजावून द्यावी लागली नाही आणि तिची पारंपरिक समीक्षाही झाली नाही. इतकेच काय, पण एखाद्या संग्रहापुरती ती मर्यादितही झाली नाही. त्या कवितांना पुरस्कारांचे, सन्मानाचे टिळे लागले नाहीत. तथाकथित व्यासपीठीय कवितांप्रमाणे ती घणाघात करत राहिली नाही. रानातल्या रानफुलांनी बहरलेल्या वाटेवरून एखादी निर्व्याज ऋषिकन्यका बागडत निघावी, तशी नलेश यांची कविता रसिक मनांच्या संवेदनशील वाटांवरून हलक्या पावलांनी रमतगमत निघालेली वाटते. तिचे स्वत:चे असे सौंदर्य आहे, स्वत:ची चाल आहे, लय आहे, छंद आहे आणि त्या कवितेचे निसर्ग हेच प्राणतत्त्व आहे. ही निसर्गधून गुणगुणत स्वत: नलेश पाटीलही आपल्याला अज्ञात अशा गावाच्या प्रवासाला निघून गेले असले तरी त्यांची लोभस, वेधक निसर्गकविता मात्र कायमची आपल्या मनात झंकारत राहील, यात शंका नाही. त्यांच्या कवितेचा हा निसर्गगंध रसिकमनाच्या कुपीत गंधालीसारखा दरवळत राहील.
(पुणे,प्रतिनिधी)

बातम्या आणखी आहेत...