आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दशक्रिया, न्यूड, एस दुर्गा दुर्लक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील विविध देशांत राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वर्तुळात काय घडामोडी होत आहेत,  त्यांचे परिणाम सर्वसामान्यांवर  कसे होत आहेत त्याचे प्रतिबिंबही दिसत असते. त्यातील काही अपेक्षा यंदाच्या इफ्फीने पूर्ण केल्या.  

 

पणजीत २० नोव्हेंबरला सकाळी पोहोचलो तेव्हा हवा मस्त होती. ढगाळ, कुंद तरीही गारवा देणारी..कला अकादमी, आयनॉक्स आणि मॅकेनिझ पॅलेस ही इफ्फीची त्रिस्थळी असते. पण मांडवीचा किनारा, हॉटेलमधला फिल्म बझार, किनाऱ्यावर भरलेली स्थानिक खाद्यजत्रा, पाण्यावर झुलणारे महाकाय बोटींवरचे कॅसिनो, बीचवरचे  बार, डिस्को थेक...उद््घाटन आणि समारोपासाठी सजलेले शहरापासून बरेच लांब असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम.. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी डिस्प्ले केलेले इफ्फीचे मोराचे बोधचिन्ह....एरवी स्थानिक मंडळींसोबत नजरेला सवयीचे झालेले विदेशी नागरिक आणि खास इफ्फीसाठी गोव्यात आलेले देशभरातील चित्रपटरसिक.. असे चित्र पुढचे सलग नऊ दिवस कायम राहिले.  


कुठल्याही चित्रपट महोत्सवात उद््घाटनाचा चित्रपट हा उत्सुकतेचा विषय असतो. तसा तो या वेळीही होता. पण प्रचंड अपेक्षा असणाऱ्या ‘बियाँड द क्लाउड्स’ या चित्रपटाने रसिकांची निराशा केली, असे सार्वत्रिक मत होते. माजिद मजिदी यांच्यासारख्या जगप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या या पहिल्या भारतीय चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळे कला अकादमीच्या थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होती. पण आशय, मांडणी, संवाद, अभिनय.. कुठेच ‘मजिदी टच’ जाणवला नाही. ए. आर. रेहमानच्या संगीतातही ‘ती’ जादू नव्हती. माजिदी यांच्या विदेशी चाहत्याने ‘यू आर लकी यू मिस्ड इट’ अशी  कॉमेंट या चित्रपटाविषयी केली यातच खूप 
काही आले. संपूर्ण चित्रपटात माजिदी यांचे वैशिष्ट्य असणारी तरल उत्कटता नावालाही नव्हती.   
इफ्फीचे हे ४८ वे वर्ष होते. जवळपास २० ते २५ वर्षे इफ्फीशी संबंधित असणारे, सलग अनेक वर्षे इफ्फीच्या वाऱ्या करणारे जे रसिक भेटले त्यांनी उद््घाटन आणि समारोपाचे समारंभ आवर्जून टाळावेत, असा सल्ला दिला. त्यातील तोचतोचपणा कंटाळवाणा असतो. कुठलीही कल्पकता, नावीन्य यांना जणू मज्जाव असल्यासारखे हे कार्यक्रम असतात त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. शिवाय मुख्य शहरापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेले मुखर्जी स्टेडियम सर्वसामान्य रसिकांसाठी गैरसोयीचे आहे याचा अनुभवही घेतला.   


इफ्फीच्या निमित्ताने सर्वसामान्य रसिकांना त्यांचे आवडते सेलेब्ज पाहण्याची संधी मिळते. यंदा मात्र सेलिब्रिटींचा वावर कमी दिसला. उद््घाटनाला शाहरुख खान, श्रीदेवी, शाहिद कपूर आणि समारोपाला अमिताभ बच्चन  हे प्रमुख सेलिब्रिटीज फक्त दिसले. त्यांचा वावर महोत्सवात कुठेही नव्हता. इतर काही मंडळी मात्र प्रत्यक्ष महोत्सवात, फिल्म बझार, चित्रपट पाहण्यासाठीही दिसली. त्यात मृणाल कुलकर्णी, मधुर भांडारकर, सचिन खेडेकर, शेखर कपूर, नाना पाटेकर, अनुपम खेर, सुशांतसिंह राजपूत, श्रुती पेडणेकर, सतीश कौशिक, मनोज जोशी, दीप्ती नवल, पद्मिनी कोल्हापुरे, सोनाली कुलकर्णी, श्रद्धा कपूर..अशी मंडळी होती. त्यांनी उगाच नखरे न करता चाहत्यांसोबत संवाद साधला, सेल्फ्या काढल्या, पोज दिल्या.   


मांडवीच्या तीरावर गोव्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामुळे तिथे अर्थातच सतत गर्दी होती. सामिष आणि शाकाहारी अशा दोन्ही पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला. मत्स्याहारींची तर चंगळ होतीच, पण गोव्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या बचत गटातील काही महिलांनी गोव्यातल्या रानभाज्या आणि अस्सल पारंपरिक चवीच्या शाकाहारी पाककृतींनी जाणकारांची दाद मिळवली. पहिल्या चार दिवसांतच त्यांचा स्टॉक संपला होता. त्यांना पुन्हा पुन्हा सगळा माल मागवावा लागत होता, यावरून हे स्टॉल किती चविष्ट असतील याचा अंदाज केलेला बरा..  इफ्फीसाठी गोवा हे कायमस्वरूपी केंद्र बनून आता आठ वर्षे झाली तरी आयोजनातील प्राथमिक स्वरूपाच्या त्रुटी चित्रपट रसिकांना अद्याप सहन कराव्या लागत आहेत. जे चित्रपट चर्चेत आहेत (इंटरनेटच्या कृपेने चाणाक्ष रसिक किती माहीतगार झाले आहेत याची आयोजकांना कल्पना नसावी हे दुर्दैव) त्या चित्रपटांचे एकापेक्षा अधिक खेळ लावणे आयोजकांना सहज शक्य असते, नेमके हेच इफ्फीमध्ये घडत नाही. अन्य महोत्सवांमध्ये  उद््घाटन, समारोपाचे चित्रपट तसेच रसिकांच्या पसंतीचे चित्रपट महोत्सवात अधिक वेळा दाखवले जातात. यंदा उद््घाटन, समारोपाचे चित्रपट आणि शेल्टर, फँटॅस्टिक वुमन, आय ड्रीम इन अनदर लँग्वेज, मिसेस हाइड, द स्क्वेअर..असे ‘मोस्ट वाँटेड’ चित्रपट एकाच स्क्रीनपुरते मर्यादित  राहिले आणि शेकडो रसिकांची निराशा झाली.   


इफ्फीदरम्यान इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांविषयी महोत्सवापूर्वीच वादंग झाल्याने वातावरण नरमगरम असेल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात ज्या चित्रपटांवरून वाद झाले त्या ‘दशक्रिया’, ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ या चित्रपटांविषयी सर्वसामान्य रसिकांमध्ये फारशी चर्चा जाणवली नाही. स्थानिक वृत्तपत्रांनीही या वादविषयांना फारसे महत्त्व दिल्याचे दिसले नाही. इफ्फीच्या काही वारकऱ्यांनी मात्र राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाला इफ्फीत थेट एन्ट्री असते, या संकेताला धरून जर ‘कासव’ दाखवला जातो, तर त्याच न्यायाने ‘दशक्रिया’ का दाखवला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.   


केरळ उच्च न्यायालयाने बहुचर्चित ‘एस. दुर्गा’ चित्रपट इफ्फीत प्रदर्शित करावा, असे आदेश महोत्सवापूर्वीच दिले होते. पण आयोजकांनी शेवटपर्यंत टाळाटाळ केली. अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘न्यायालयाचा अवमान करत असल्याची याचिका दाखल करण्याचा इशारा’ दिल्यावर केवळ ज्युरींसाठी या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले.   


इफ्फीमधील लघुपट-माहितीपट विभागात दाखवण्यात आलेल्या  अजय कुरणे दिग्दर्शित ‘बलुतं’ हा लघुपट अनपेक्षितपणे रसिकांची दाद मिळवून गेला. अवघ्या २६ मिनिटांत गावातील परंपराप्राप्त व्यवसाय नाकारणाऱ्या महिला नाभिक शांता यादव यांची कथा आणि संघर्ष रसिकांनी वाखाणला.  इफ्फीच्या निमित्ताने रसिकांना जागतिक पातळीवर संवेदनशील, सर्जनशील मने कशा पद्धतीने चित्रपटातून व्यक्त होत आहेत याचे दर्शन घडत असते. जगातील विविध देशांत राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वर्तुळात काय घडामोडी होत आहेत त्यांचे परिणाम सर्वसामान्यांवर कसे होत आहेत याचे प्रतिबिंबही दिसत असते. त्यातील काही अपेक्षा यंदाच्या इफ्फीने पूर्ण केल्या असे नक्कीच म्हणावे लागेल. जगातील अनेक ठिकाणी गे आणि लेस्बियन समूह ज्या चळवळी करत आहेत त्याविषयीचे काही चित्रपटही लक्षणीय होते. ज्या अपेक्षा उपेक्षित राहिल्या त्यांच्याविषयी ‘गोडी अपूर्णतेची..’ असे म्हणत चित्रपट रसिक पुढच्या महोत्सवाची वाट पाहणार हे नक्की...  

 

- जयश्री बोकील, विशेष प्रतिनिधी,
jayubokil@gmail.com  

 

बातम्या आणखी आहेत...