आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षिततेलाच सुरुंग !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय लष्करातील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे फारशी बाहेर पडत नाहीत. कारण तेथे करड्या सुरक्षिततेचा अथवा अतिसंवेदनशीलतेचा एक पोलादी पडदा आहे. एवढे टॉप सिक्रेट लष्कराच्या अर्थात सैन्यांच्या सूक्ष्मातील सूक्ष्म हालचालींबाबतही पाळले जाते. त्यामुळेच कदाचित असे म्हटले जात असावे की, ‘जहाँ चिडिया भी पर नहीं मार सकती,’ तेथे ‘आत’मध्ये काय चालते वा काय चालले असावे याचा अंदाज बांधणे सर्वसामान्य माणसांच्या अर्थात सिव्हिलियनच्या आकलनाबाहेर असते. 

सैन्याचा तळ ज्या ठिकाणी असतो तेथील शस्त्रधारी सैनिक अन् त्याची करडी शिस्त पाहिली की त्या परिसरातून जायचे म्हटले तरी उरात धडकी भरते. लष्करासंबंधी जनसामान्यांमध्ये असलेल्या प्रतिमेमुळे एवढे सगळे स्पष्ट करण्याचे कारण एकच की, एवढ्या प्रचंड मोठ्या सुरक्षिततेनंतरही सैन्यातील नागरी पदांच्या भरतीचे पेपर फुटले आहेत. परिणामी देशातील प्रमुख केंद्रावरील परीक्षा रद्द करावी लागली.
 
तत्पूर्वी पुणे व नागपूर अन् शेजारच्या गोव्यातही पोलिसांनी धडक कारवाई करत पेपर फोडणाऱ्या टोळीतील अठरा दलालांना अटक केली. त्यासोबतच लाखो रुपयांमध्ये पेपर खरेदी करणाऱ्या तीनशेहून अधिक उमेदवारांचीही चौकशी सुरू झाली आहे. हा सर्व प्रकार केवळ धक्कादायक या संज्ञेत मोडणारा नक्कीच नाही, तर तो देशाच्या सुरक्षा यंत्रणेलाच सुरुंग लावणारा आहे. कारण ही भरती लष्करातील नागरी पदांसाठी असली अन् त्या पदावर कार्यरत व्यक्तींचा थेट देशाच्या सीमेशी संबंध येत नसला तरी सुरक्षिततेशी संबंधित गोपनीय बाबींच्या जवळपास त्यांचा वावर असू शकतो. 

त्याही पलीकडे जाऊन घटकाभर असा विचार केला की, गोपनीयतेच्या कामकाजाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी ज्या परिसरात गोपनीय रीतीने कामकाज चालते तेथे अशा व्यक्तींचा शिरकाव होणे ही बाबदेखील देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यास तत्कालिक कारण ठरू शकते.  देशांतर्गत प्रमुख लष्करी तळांवर केल्या जाणाऱ्या  सैन्य भरती वेळी बाहेर पडणारे किस्से असंख्य असतात. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता अन् शारीरिक क्षमता हे प्रमुख निकष हा अशा भरतीचा मूळ पाया असला तरी अधिकाऱ्यांशी असलेले ‘ऋणानुबंध’ हा कायम चर्चेतला विषय असतो. त्याचे मुख्य कारण असे - आजवर जेव्हा केव्हा सैन्य भरतीची चर्चा बाहेर येते त्या वेळी ‘वशिला’ हा मुद्दा हमखास त्याच्या केंद्रस्थानी असतो. वास्तवात खरे काय अन् खोटे काय हे भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांकरवीच स्पष्ट होऊ शकते.  
 
एवढ्या प्रचंड अशा कडक सुरक्षेमध्ये सैन्याची असो की सैन्यातील नागरी पदांची भरती.. त्यातून घोटाळ्याची प्रकरणे चव्हाट्यावर येत असतात. हे तेव्हाच शक्य असते, जेव्हा त्याच यंत्रणेतील एक तरी धागा म्हणा की घटक हा अशा घोटाळ्यात एक तर थेट संबंधित असतो किंवा तो जो कोणी पडद्यामागे असतो तोच सूत्रधाराची भूमिका वठवत असतो. त्याशिवाय अशी प्रकरणे घडूच शकत नाहीत. सैन्य भरतीच्या निमित्ताने उघड झालेला आताचा पेपरफुटीचा घोटाळा हा काही पहिल्यांदाच झालेला घोटाळा नाही. याअगोदरही नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे सैन्यात भरती झाल्याचे गंभीर प्रकरण चव्हाट्यावर आले होते. 

उपरोक्त मुद्द्याला पुष्टी देणाराच हा प्रकार असल्याचे कटू सत्य त्यातून स्पष्ट दिसते. लष्करी तळात प्रशिक्षणासाठी दाखल होताना चौघांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे चौकशीत उघड झाले होते. ते चौघेही राजस्थानचे रहिवासी होते. पोलिसांनी त्याही वेळी केलेल्या सखोल चौकशीमध्ये घोटाळ्याच्या पडद्यामागील सूत्रधार हा लष्करातून निवृत्त झालेला एक जवान होता. तो सध्या गजाआड आहे. या काही मोजक्या प्रकरणांवरून एक बाब स्पष्ट होते की सैन्यासारख्या भरतीतही घोटाळेबाजांचा नुसताच शिरकाव झाला असे नव्हे, तर त्यांचे बऱ्यापैकी बस्तानही बसल्याचे दिसते आहे.
 
यंत्रणेच्या गाफीलपणामुळे एखाद्या ठिकाणी पेपरफुटीची चूक घडू शकते, पण वारंवार अशी प्रकरणे चव्हाट्यावर येत असतील अन् अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये लष्कराशी संबंधित आजी-माजींचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड होत असेल तर ही बाब निश्चितच काळजी करायला लावणारी आहे. काश्मीर असो की पठाणकोट.. येथे आजवर झालेल्या लष्करी तळांवरील हल्ल्यात असंख्य अधिकारी व जवान शहीद झाले आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे वा कुणाच्या तरी वशिल्याने सैन्यात भरती झालेले जवान हे देशाच्या शत्रूंना फितूर असतील वा होणारच नाहीत याची ग्वाही कुणीही देऊ शकत नाही. ‘घर का भेदी लंका ढाये’ यालाच म्हणतात. 

 
बातम्या आणखी आहेत...