Home | Editorial | Columns | Jayprakash pawar Write about Organ donation

होवो, अवयवांचे सत्पात्री दान!

जयप्रकाश पवार | Update - Oct 10, 2017, 03:00 AM IST

वैद्यकीय क्षेत्र अन् त्याच्याशी संबंधित ज्येष्ठ-कनिष्ठ डॉक्टर्स, नर्स, औषधं, रुग्णालयं तसेच त्यातील रुग्ण सेवा म्हणा की

 • Jayprakash pawar Write about Organ donation
  वैद्यकीय क्षेत्र अन् त्याच्याशी संबंधित ज्येष्ठ-कनिष्ठ डॉक्टर्स, नर्स, औषधं, रुग्णालयं तसेच त्यातील रुग्ण सेवा म्हणा की शुश्रूषा हा विषय खरं तर अतिसंवेदनशील अथवा गंभीर या संज्ञेत मोडणारा आहे. कारण, त्याचा थेट संबंध माणसाच्या जीवन-मरणाशी जोडला जातो. पाठोपाठ रुग्णाच्या कुटुंबाशी वा नातेवाइकांशीही भावना या नात्याने अधिक घट्ट होतो. परिणामी या क्षेत्राकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा गंभीरतेचाच असतो. नाशिकमध्ये जया जामकर या विवाहितेचा मेंदू मृत असल्याचे एका रुग्णालयाने घोषित करणे अन् तोच मेंदू जिवंत असल्याचे निदान दुसऱ्या रुग्णालयाकरवी झाल्याने प्रचंड मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या अवयवदान चळवळीचा चांगलाच गाजावाजा सुरू आहे. इच्छुकांकडून ठिकठिकाणी अवयवदान करण्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. राज्य शासनानेही याकामी पुढाकार घेत संपूर्ण राज्यात अवयवदानाची चळवळ सर्वदूर पसरवण्यास सुरुवात केली आहे. चळवळीचा उद्देश, त्यामागची अवयवदानाची भावना हे सर्व काही ठीक आहे. त्याच्या हेतूविषयी मुळीच शंका नाही.
  भले आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या गरजू रुग्णांना हृदय वा किडनीसारखे जीवनदायी अवयव या माध्यमातून दान होत असले तरी उपलब्धतेनुसार भविष्यात ते आर्थिक दुर्बलांनाही मिळू शकतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. एक मात्र खरे की, या चळवळीचा उद्देश पाहता त्यात लोकसहभागही लक्षणीय असाच आहे. त्याला नख लागावे, ती बदनाम व्हावी असा हेतू कुणाचाही असू शकत नाही. पण त्या नावाखाली म्हणजेच चांगल्या बाबींच्या आडून काही दुष्ट प्रवृती त्यात शिरकाव करत असतील तर त्यांना वेळीच ठेचले पाहिजे. स्वर्गीय जया जामकर यांच्या प्रकरणात नेमका दुष्ट प्रवृत्ती शिरकावाचा संशय आहे. कारण, एक मेंदूविकार तज्ज्ञ रुग्णाचा मेंदू मृत झाल्याचे निदान करतात अन् काही वेळानंतर तोच मेंदू जिवंत असल्याचे पतीला सांगितले जाते. एवढेच नाही, तर पुढील उपचारासाठी पैशाची मागणी केली जाते. या घटनाक्रमाच्या चौकशीतून पुढे जे काही यायचे ते यथावकाश येईल. संबंधित डॉक्टर्स दोषी आहेत की नाही याचाही उलगडा चौकशीतच होईल. रुग्णांलयांवर काय कारवाई करायची याचाही निर्णय शासन पातळीवर घेतला जाईल. आजघडीला सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. पण या प्रकरणातील रुग्णालये व संबंधित डॉक्टर्स यांच्या परस्परविरोधी खुलाशांमुळे संशयकल्लोळ वाढ जाऊन चळवळ बदनाम होत आहे. अवयवदानाशी संबंधित अवयव काढणे वा त्याचे रोपण करणे यासाठी नाशिकमध्ये एकाच रुग्णालयाला शासनमान्यता होती. अवयवदानातील ‘पोटेन्शियल’ लक्षात घेता कालौघात एकाच्या ऐवजी अजून तीन रुग्णालयांना मान्यता दिली गेली.
  आजघडीला चार रुग्णालयांकडे अशी मान्यता आली आहे. एकापेक्षा जास्त खेळाडू मैदानात उतरल्यानंतर निर्माण होणारी स्पर्धा ही जीवघेणी असू शकते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. या प्रकरणातही जयाच्या देहाची हेळसांड सुरू झाली ती ‘विजन’पासून साईबाबा मार्गे ‘ऋषीकेश’मध्ये जाऊन थंडावली. चळवळ बदनाम होऊ नये म्हणून मोफत उपचार केल्याचे बाहेर सांगितले जात असले तरी लोकांचा त्यावर कितपत विश्वास बसेल? कारण वैद्यकीय क्षेत्रातील एकेका कारनाम्यांमुळे या क्षेत्रातील ‘सेवाभाव’ केव्हाच रुग्णशय्येवर पोहोचला आहे.

  डॉक्टरच्या हातून घडलेली एखादी क्षुल्लक चूक वा निष्काळजीपणा रुग्णाच्या प्राणाला कारणीभूत ठरू नये अशीच व्यापकदृष्ट्या सामान्य जनतेची अपेक्षा असते. अशी अपेक्षा वा भावना असणे यात गैर अजिबातच नाही. नैसर्गिक मरण हे एक वेळ समजू शकते, पण चूक अन् तीही डॉक्टरच्या हातून म्हटल्यावर तिला माफी नाही, असा समज रूढ झाला आहे. कारण पुढच्या काही क्षणात होत्याचं नव्हतं होतं. कोणाचं तरी पितृछत्र हरपतं, कोणाच्या तरी कुटुंबाचा आधार अकाली निघून जातो. कुटुंबप्रमुखच काळाच्या पडद्याआड जातो. कधी कधी तर अख्ख्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते वा ते उघड्यावर पडते. त्यामुळे डॉक्टर हा घटक समाजाच्या दृष्टीने संवेदनशील होता अथवा यापुढेही राहणार आहे. पण, डॉक्टर अर्थात शल्यविशारद हादेखील माणूस आहे. त्याच्या हातूनही चूक होऊ शकते. ती चूक रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. या सर्व शक्याशक्यतांचा सर्वांगाने विचार जसा समाजाने करायला हवा तद्वत तो वैद्यकीय क्षेत्राकडून होणे अगत्याचे आहे. राहिला विषय अवयवदान चळवळीचा ही चळवळ फोफावणे ही काळाची गरज आहे. अवयवदानासाठी प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी पुढे यायलाच हवे. पण, कोणत्याही स्वरूपाचे दान हे जसे सत्पात्री असावे तद्वतच जे लोक मनोभावे आपल्या अवयवांचे दान जिवंतपणीच करतात त्यांच्या भावनांचीही कदर झाली पाहिजे. तसे व्हावे हीच माफक अपेक्षा !
  - जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक

Trending