आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँड नाशिक !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील १० महानगरपालिका अन् तब्बल ११ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा प्रचार रविवारच्या पूर्वसंध्येला थंडावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही निवडणुकांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पायाभरणी करण्याचे काम करवून घेतल्यागत संपूर्ण राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवून दिला, त्याशिवाय एकप्रकारे 
 
मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीच्या ‘केआरए’ अर्थात ‘की रिझल्ट एरिया’तील मुद्दे राज्यातील तमाम जनतेसमोर मांडण्याचाही प्रभावी प्रयत्न केला. कारण, भाजपच्या निवडणूक प्रचार माेहिमेचा प्रमुख नेता अन् स्टार प्रचारक अशा दोन्ही भूमिकांत केवळ अन् केवळ देवेंद्र फडणवीसांचाच चेहरा जनतेच्या नजरेसमोर झळकत होता. 
 
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अशा जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या मोजक्या वा प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा वा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या बैठकादेखील या रणधुमाळीत झाल्या. 
 
खरं तर महानगरपालिका असो की जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रचाराचे कार्यक्षेत्र हे स्थानिक अन् प्रत्येक ठिकाणच्या प्रचाराच्या मुद्द्यांना स्थानिक संदर्भ असले तरी राज्यस्तरीय प्रत्येक नेत्यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी नाशिकच राहिले. किंबहुना नाशिक या एकमेव मुद्द्याभोवती गेल्या पंधरवड्यापासून राज्यातील दहा महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार घुटमळत राहिला. 
 
वास्तविक पाहता सिंहस्थ कुंभमेळ्यातील तीन प्रमुख पर्वण्या, त्यानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व नाशिकला अनुक्रमे शैव व वैष्णव साधूंचे पार पडलेले शाही स्नान अन् त्यातही एक तपानंतर नागा साधूंचे घडणारे दर्शन आदी विविधांगी कारणांमुळे नाशिकचे ब्रँडिंग अवघ्या जगाच्या पाठीवर होत असते.
 
 कुंभमेळ्याचा अपवाद सोडला तर नाशिकची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या अर्थाने होणे जवळपास थांबले होते. पण, महानगरपालिकांच्या निवडणुकीचा हंगाम सुरू झाला तसे नाशिकच्या नावाला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त झाली. त्याची सुरुवात झाली ती खऱ्या अर्थाने राज यांच्याकरवी मुंबई - पुण्याच्या जाहीर सभांमधून नाशिक शहराशी संबंधित कासकामांच्या प्रेझेंटेशनने. 
 
शहर मग ते कुठलेही असो, त्याची ओळख ही तेथील चालीरीती, परंपरा, त्याला असणारी पौराणिक- ऐतिहासिक- धार्मिक, राजकीय पार्श्वभूमी, खाद्य संस्कृती अन् तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांची वर्तणूक यावर त्या त्या शहराचा चेहरामोहरा बऱ्याच अंशी अवलंबून असतो. उदाहरणार्थ, पुणे असो की भटिंडा, या शहराशी संबंधित अनेक किस्से आजही सर्वसामान्यांमध्ये चर्चिले जातात. पण, राज्यातील महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या चालू हंगामामध्ये नाशिकचे ब्रँडिंग जबरदस्त रीतीने झाले आहे.
 
 मनसेच्या कार्यकाळात नाशिकमध्ये तब्बल ५१० किलोमीटर रस्त्यांची उभारणी झाल्याचा दावा पक्ष प्रमुखांनी करतानाच त्याच्या पुराव्यापोटी प्रेझेंटेशनच सादर केले. रस्त्यांसोबतच वनौषधी उद्यान अन् त्यासाठी रतन टाटांची मिळालेली साथ याचेही चांगले मार्केटिंग केले गेले. मराठी सिनेसृष्टीतील तारे-तारकांची नाशिक भेट हादेखील एक चर्चेचा विषय राहिला.
 
राज अन् उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ नाशिकवर विशेष प्रेम दाखवले गेले ते थेट मुख्यमंत्र्यांकरवी. उत्तर प्रदेश निवडणुकीतील पंतप्रधानकृत दत्तकविधानाचा फंडा मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जाहीर सभेत वापरत नाशिककरांच्या साक्षीने नाशिक दत्तक घेत असल्याची घोषणा करून टाकली.
 
या दत्तकविधानामुळे नाशिककर मंडळी तर काही काळापुरती नक्कीच हरखून गेली असणार. साक्षात राज्याच्या प्रमुखांच्या अधिपत्याखाली नाशिकच्या विकासासोबतच सर्वसामान्य नाशिककरांच्या आशा-आकांक्षांचीही पूर्ती होणार असेच एकूण चित्र प्रत्यक्ष मतदानापूर्वीच उभे राहिले.
 
 असो, घोडा-मैदान जवळच आहे. येत्या २३ तारखेला निवडणूक निकाल बाहेर येईल त्या वेळी नाशिककरांनी त्यांच्या मतांचे दान नेमके कोणाच्या पारड्यात टाकले आहे याचा उलगडा होईलच. एक मात्र खरे की, राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने नाशिकचे जोरदार ब्रँडिंग झाले आहे. 
 
देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो की उपराजधानी नागपूर वा सांस्कृतिक राजधानी पुणे असो, त्या तिन्ही राजधान्यांच्या तोडीस तोड नाशिकचेही ब्रँडिंग अत्यंत जोरकसपणे झाले आहे हे निर्विवाद. राष्ट्रवादी नेत्यांच्या कृत्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काळवंडलेली नाशिकची प्रतिमा या निवडणुकीच्या अनुषंगाने बव्हंशी उजळून निघाली, हेही नसे थोडके ! 
 
- निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...