आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेच रस्त्यातील वृक्षांचा !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजात जशा विधायक अन् विघातक अशा दोन प्रवृत्ती असतात तद्वतच निसर्गाचा समतोल राखण्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वृक्षांबाबतही एक जीवदानी, तर दुसरी जीवघेणी अशी म्हणता येऊ शकेल. कालौघात देशासह महाराष्ट्राचा अन् पाठोपाठ दिवसागणिक प्रत्येक प्रमुख महानगरांचा कलाकलाने होत असलेल्या विस्ताराचा वेग लक्षात घेता त्या विकासाला पूरक ठरणाऱ्या रस्त्यांची उभारणी हीदेखील अपरिहार्य ठरते आहे.
 
या समीकरणाचा विचार करता मग आपल्याला रस्ते रुंद हवेत की अरुंद या मुद्द्यावरही गांभीर्याने चिंतन करावे लागेल. मुबलक पाणी हवे असेल तर धरणे वा बंधारे बांधावीच लागतील. रस्ते रुंद तसेच आपली दुचाकी-चारचाकी वाहने व्यवस्थित हाकायची असतील अन् संभाव्य अपघात टाळायचे असतील तर रस्त्याचा विस्तार ही काळाची गरज ठरते.  
 
शहराच्या विस्ताराबरोबरच लोकसंख्यावाढीचा वेगदेखील लक्षणीय आहे. लाख-दोन लाखांची लोकसंख्या असलेल्या गावांची जागा आता पाचपासून पंधरा लाखांपर्यंत लोकसंख्येने घेतली आहे. ही जी तफावत आहे ती लक्षात घेता रस्त्यात अध्येमध्येच उभी असलेली जीवघेणी झाडे तोडणे हीदेखील काळाची गरज ठरते. नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अशा जीवघेण्या जवळपास साडेतीनशेहून अधिक वृक्षांचे सर्वेक्षण पालिकेच्या यंत्रणेने केले होते. पण ही बाब न्यायप्रविष्ट झाल्यानंतरच्या गेल्या वर्ष-दोन वर्षांच्या काळात रस्त्यात मधोमध उभ्या असणाऱ्या या झाडांवर आदळून अनेकांना जीव गमावावा लागला. किती तरी अपघात झाले. या अपघातांमध्ये कुणाच्या तरी कुटुंबांतील कर्त्या पुरुषाचा वा हाताशी आलेल्या तरुण मुलाचा बळी गेला आहे. एखादा अपवाद सोडला तर अपघात हा नाशिककरांच्या पाचवीला पुजल्यागत आहे. या एकूण पार्श्वभूमीवर शहरात दोन मतप्रवाह होते की, रहदारीला अडथळा ठरणारी जीवघेणी झाडे मुळापासून हटवलीच पाहिजेत अन् दुसऱ्या प्रवाहानुसार या झाडांचे संवर्धन व्हायला हवे.

जीवघेण्या वृक्षांचे संवर्धन व्हावे, अशा मतप्रवाहातील वृक्षप्रेमींची संख्या तशी अत्यल्पच म्हणावी लागेल. पण, त्यांचा एक मुद्दा हा नजरेआड करून चालणारा नाही. त्याचा खरोखरीच प्रशासनाने गंभीर विचार करून त्यावर अंमल करायला हवा. नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाचे असो की मुंबई ते इंदूर या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण असो, त्या वेळीही विकासाला अर्थात मार्गात अडथळा ठरू पाहणाऱ्या हजारो वृक्षांची प्रचंड मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली. त्या वेळीदेखील पर्यावरणप्रेमींनी आग्रह धरला होता की, तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडामागे किमान दहा झाडे लावावीत अन् त्यांचे संगोपन करून त्यांची योग्य ती वाढ होईपर्यंत काळजी घ्यावी. त्यांची ही मागणी रास्तच होती. तिचे समर्थनही करायला हवे. किमान त्यांच्या या रेट्यामुळे नाशिक ते त्र्यंबकेश्वर
रस्त्यातील तीनशेहून अधिक वटवृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यातील बव्हंशी वृक्षांना जीवदान मिळतानाच त्यांची निगा अत्यंत योग्य रीतीने घेतली गेल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यात हेच वृक्ष कामी येत आहेत.  
 
हीच बाब मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणावेळी केली गेल्याने सुरुवातीला असणारा वृक्षप्रेमींचा विरोध नंतरच्या काळात ओसरला होता. येथे मात्र वृक्षप्रेमींच्या एका झाडामागे दहा नवीन झाडे लावण्याच्या मागणीचा संबंधित कंत्राटदारांनी तसेच या कामावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेतील घटकांनी बारकाईने लक्ष ठेवल्याचे दिसत नाही. कारण, हा मार्ग पूर्ण होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण रस्त्याच्या दुतर्फा किंवा रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर लावलेल्या झाडांचा ठावठिकाणा दिसत नाही. दोन वर्षे सरली, पण रस्त्याच्या दुतर्फा लावल्या गेलेल्या झाडांची साधी सावलीही वाटसरूंना नजरेस पडत नाही. त्यामुळे झाले काय, तर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. त्यात किती वेळ गेला वा जाऊ शकेल याचा अंदाज बांधता येऊ शकत नाही. आजही त्यापैकी अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असू शकतील. पण मध्यंतरी न्यायालयाने नाशिक महानगरातील जीवघेणी झाडे तोडण्यास परवानगी दिल्याने शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला होता. शहराच्या प्रमुख मार्गांत अडसर ठरणाऱ्या साडेतीनशेहून अधिक वृक्षांपैकी जवळपास अडीचशे झाडे तोडली गेली. महापालिकेच्या कारभाऱ्यांनी झाडे हटवण्यासाठी जेवढी तत्परता दाखवली तेवढीच नवीन वृक्षारोपणामध्येही दाखवायला हवी. असे झाले तरच वृक्षप्रेमी व यंत्रणा यांच्यातील तणाव कमी होण्यास मदत होईल. सामंजस्याची भूमिका घ्यावीच लागेल. रहदारीला अडथळा ठरू पाहणाऱ्या जीवघेण्या वृक्षांबाबतही पर्यावरणप्रेमींनी फारसा लळा दाखवला नाही तर हा रस्त्यातील वृक्षांचा पेच काही अंशी सुटू शकेल.
 
बातम्या आणखी आहेत...